गेल्या काही वर्षात वैद्यकीय क्षेत्रात झालेली प्रगती थक्क करणारी आहे. आताही डॉक्टरांना असेच एक मोठे यश प्राप्त झाले आहे. डॉक्टरांनी डुकराची किडनी (Pig’s Kidney) मानवी शरीरात प्रत्यारोपित केली असून, ती यशस्वीपणे कार्यरत आहे.किडनी प्रत्यारोपणाची ही यशस्वी शस्त्रक्रिया 57 वर्षीय ब्रेन डेड व्यक्तीवर करण्यात आली आहे. वैद्यकीय जगताच्या या कामगिरीमुळे किडनी रुग्णांना आशेचा नवा किरण दिसू लागला आहे. न्यूयॉर्क लँगोन हेल्थ येथील शल्यचिकित्सकांनी बुधवारी (16 ऑगस्ट, 2023) अहवाल दिला की, ब्रेन डेड माणसामध्ये प्रत्यारोपित केलेल्या अनुवांशिकरित्या सुधारित डुकराचे मूत्रपिंड 32 दिवस यशस्वी काम करत होते.
या यशस्वी प्रत्यारोपणाकडे प्राण्यांच्या अवयवांचे मानवांमध्ये संभाव्य प्रत्यारोपण करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून पाहिले जाते. वॉशिंग्टन पोस्टच्या बातमीनुसार, डॉक्टरांनी सांगितले की, प्रत्यारोपणानंतर काही मिनिटांतच मानवी शरीराने डुकराची किडनी स्वीकारली.
सामान्यतः झेनोट्रान्सप्लांटेशन (प्राण्यांपासून मानवांमध्ये अवयवांचे प्रत्यारोपण) बाबतीत होते तशी कोणतीही समस्या या प्रकरणात उद्भवली नाही. डॉक्टरांनी नोंदवले की, डुकराच्या मूत्रपिंडाने मूत्र तयार करण्यास सुरुवात केली आणि मानवी मूत्रपिंडाची कार्ये ताब्यात घेतली. मात्र, ‘हा एका प्राण्याचा अवयव खरोखरच मानवी अवयवाप्रमाणे काम करेल का?’ असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी केला. याला उत्तर देताना न्यूयॉर्क लँगोन ट्रान्सप्लांट संस्थेचे संचालक डॉ. रॉबर्ट मॉन्टगोमेरी यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले, ‘आतापर्यंत तरी असेच दिसत आहे की, हा अवयव व्यवस्थित कार्य करत आहे.’
बुधवारी देखील, बर्मिंगहॅम हेरसिंक स्कूल ऑफ मेडिसिन येथील अलाबामा विद्यापीठातील संशोधकांनी, या वर्षाच्या सुरुवातीला दोन डुक्कर किडनी प्रत्यारोपण केलेल्या ब्रेन डेड रुग्णाची अशीच एक केस स्टडी प्रकाशित केली होती. या डुकरांमध्ये 10 अनुवांशिक बदल करण्यात आले. या प्रकरणात देखील मानवी शरीराने डुकराची किडनी स्वीकारली आणि ही किडनी 7 दिवस सामान्यपणे कार्य करत होती.
आताचे प्रत्यारोपण अद्याप प्रायोगिक अवस्थेत असले तरी, एक महिन्यापेक्षा जास्त काळ मूत्रपिंड सामन्यपणे कार्य करत असल्याने वैद्यकीय शास्त्रज्ञ या नवीन यशाबद्दल उत्साहित आहेत. जगभरात किडनीच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे, ज्यांच्यासाठी ही एक नवी आशा आहे. हे लक्षात घेऊन प्राण्यांच्या अवयवांचा उपयोग मानवी जीव वाचवण्यासाठी कसा करता येईल, यासाठी जगभरात प्रयोग केले जात आहेत.