पुणे : पुण्यात कधी काय होईल याचा नेम नाही. कधी हौस म्हणून आवडीच्या बाईकची चोरी करण्यात येते तर कधी मोठ्या प्रमाणात चपलांची चोरी केली जाते. मात्र आता एक नवा प्रकार समोर आला आहे.कोणताही गुन्हा घडल की गुन्हेगारांकडून मुद्देमाल जप्त करण्यात येतो. पुण्यातील मुद्देमाल विभागात अनेक गुन्हेगारांकडून जप्त केलेला दस्तावेज आहे. त्यासोबतच पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्याकडून जप्त केलेल्या गाड्या आहेत. मात्र पुण्यातील चोरांनी या पोलीस ठाण्याच्या आवारातूनच डी. एस. कुलकर्णी यांच्याकडून जप्त केलेल्या गाड्याचे लोगो गायब केले आहेत.
पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातून या महागड्या गाड्यांचे लोगो गायब झाले आहे. मोठ्या आणि महागड्या कंपनीच्या लोगोला महत्व आहे. तर अनेकदा हे महागड्या गाड्यांचे लोगो विकलेदेखील जातात. त्यामुळे चोरांनी हे लोगो गायब केले असावेत असा अंदाज आहे. आतापर्यंत रस्त्यांवरुन अशा प्रकारची चोरी होतानाच्या घटना घडल्या आहेत. मात्र थेट मुद्देमाल विभागाच्या पोलीस ठाण्याच्या परिसरातूनच हे लोगो गायब झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
अनेक गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी यांना अटक केल्यानंतर त्यांच्या एकूण 16 आलिशान मोटारी आणि एक स्पोटर्स बाईक जप्त करण्यात आली होती. जप्त झालेल्या या गाड्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आल्या आहे. पोलीस ठाण्यात असलेल्या पोर्शे बीएमडब्लू टोयोटा अशा आलिशान गाड्यांचे लोगो मात्र गायब आहेत. बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी ऊर्फ डी. एस. कुलकर्णी हे सध्या जामिनावर आहेत. सदनिकांच्या मालकी हक्कासंदर्भात महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स अॅक्ट अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात हा जामीन देण्यात आला आहे.
काय होतं प्रकरण? ना जास्त पैशाचं आमिष दाखवून पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके यांनी हजारो गुंतवणूकदारांना 2 हजार 43 कोटींना फसवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. याप्रकरणी त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, भाऊ मकरंद, पुतणी, जावई यांच्या विरोधातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.