आरोग्यजनरल नॉलेजताज्या बातम्या

डेंग्यूवरील पहिली भारतीय बनावटीची लस


देशामध्ये डेंग्यूबाधित रुग्णांचा आलेख उंचावत असताना सर्वसामान्य रुग्णांसाठी एक दिलासादायक वृत्त पुढे आले आहे. कोरोना काळात भारतीय समाज जीवनासह संपूर्ण जगभरात मोठा दिलासा देणार्‍या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित केलेल्या डेंग्यूवरील पहिल्या वहिल्या भारतीय बनावटीच्या ‘डेंग्यूसील’ या लसीचा प्रवास अंतिम टप्प्याकडे निघाला आहे.

या लसीच्या ऑस्ट्रेलियामध्ये घेण्यात आलेल्या पहिल्या क्लिनिकल चाचणीमध्ये आश्चर्यकारक असे परिणाम दिसून आले आहेत. लवकरच त्याच्या दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील चाचण्यांना प्रारंभ होत असून या लसीची पहिल्या टप्प्यातील परिणामकारकता लक्षात घेता, ही लस भारतीयांच्या सेवेत लवकरच दाखल होईल. त्याहीपेक्षा सर्वसामान्यांना परवडणार्‍या दरामध्ये ही लस उपलब्ध करण्याचे कंपनीचे प्रयत्न सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त असल्याने डेंग्यूपासून बचावासाठी एक नवे कवच उपलब्ध होणार आहे.

भारतामध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. 2021 या एका वर्षामध्ये देशात 1 लाख 93 हजार डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याची आणि 346 जणांना या रोगाने आपला जीव गमावण्याची वेळ आल्याची सरकारी दप्तरी माहिती उपलब्ध आहे. सरकारी दप्तराचा विस्कळीतपणा आणि खासगी रुग्णालयांचा शासनाकडे माहिती न देण्याचा कल लक्षात घेता ही आकडेवारी त्याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचे बोलले जात आहे.

भारतामध्ये डेंग्यूचा आजार हा सवयीचा झाला आहे आणि रुग्णांच्या रक्तामध्ये त्याला प्रतिकार करणारी प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने लसीची अचूक परिणामकारकता तपासून पाहण्यासाठी जेथे डेंग्यूचा प्रादुर्भावच नाही, अशा ऑस्ट्रेलियाची पहिल्या क्लिनिकल ट्रायलसाठी निवड केली होती. तेथे 18 ते 45 वयोगटातील 60 स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये लसीची सुरक्षितता आणि उपयुक्तता या आघाडीवर कमालीचे निष्कर्ष पुढे आल्याने डेंग्यूविषयीची चिंता लवकरच कमी होण्याचा मार्ग दिसतो आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही लस डेंग्यूच्या डेन-1, डेन-2, डेन-3, डेन-4 या चारही प्रतिरूपांपासून संरक्षण देण्यास सज्ज असल्याचे एका प्रतिष्ठेच्या नियतकालिकामध्ये प्रसिद्धही झाले आहे.

ऑस्ट्रेलियामधील या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांच्या उत्साहवर्धक निष्कर्षानंतर भारतात या लसीच्या पहिल्या व दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील चाचण्यांना प्रारंभ होणार आहे. त्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेचा (आयसीएमआर) सहयोग घेतला जाणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *