विधानसभेची निवडणूक मी अजितवर सोपवली – शरद पवार

0
240
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

पुणे : आगामी विधानसभा निवडणुक आपण अजित पवार यांच्यावर सोपवली आहे, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याचे अतिशय स्पष्ट संकेत दिले आहेत.

राष्ट्रवादीमध्ये फूट पडून खा. शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दोन गट पडले गेले आहेत. पुढील सन २०२४ मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खा. शरद पवार गट व अजित पवार गट काय भूमिका घेणार आणि निवडणुकीमध्ये कोणते धोरण अवलंबविणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच राष्ट्रवादी शरद पवार यांनी हा एक वेगळा गौप्यस्फोट केला आहे.

खा.सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातील पत्रकारांचा माध्यमांचा दिल्ली येथे दौरा आयोजित केला होता. यावेळी दिल्ली येथे खा.शरद पवार, खा.सुप्रिया सुळे व खा.श्रीनिवास पाटील यांच्या समवेत ६ जनपथ रोडवर या खा.शरद पवार यांच्या निवासस्थानी दौंड तालुक्यातील पत्रकारांशी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दौंड तालुक्यातील स्थानिक राजकीय स्धिती संबंधित प्रश्न विचारला असता खा.पवार यांनी वरील विधान केले.

दौंड तालुक्यात विद्यमान भाजप आ. राहुल कुल व माजी आ. रमेश थोरात यांचे गेली अनेक वर्षांपासून राजकीय युद्ध सुरु असून हे दोन्ही परस्पर विरोधी राजकीय नेते आज उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गटात एकत्रित आले आहेत. त्यामुळे आजच्या परिस्थितीला खा.शरद पवार यांच्याकडे दौंड तालुक्यात राष्ट्रवादीचा एकमेव चेहरा हे अप्पासाहेब पवार हेच आहेत. त्यामुळे दौंड तालुक्यात आपण तिसऱ्या चेहऱ्याला विधानसभेसाठी संधी देणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता शरद पवार यांनी ‘आपण ही निवडणूक अजित पवार यांच्यावर सोपवली आहे ‘असे सांगितले.

दौंड मध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार हे तळागाळातील लोकांना सामावून घेऊन काम करणारा कार्यकर्ता असून त्यांना कुठल्याही प्रकराचा गर्व नाही असे सांगत, दुसरी कडे शरद पवार यांनी आपण राज्यातील विधान सभेची निवडणूक ही अजित पवार यांच्याकडे सोपवली आहे असेही म्हणाले खा. शरद पवार यांच्या नुसार उपमुख्यमंत्री अजित पवार जर आगामी विधानसभा निवडणूकीची
धुरा राज्यात सांभाळणार असतील तर मग हे दोन्ही गट शेवटच्या क्षणाला एकत्रित येण्याचे एक्यता नाकारता येत नाही असेच सध्या तरी दिसून येत आहे.

खा.शरद पवार यांच्या म्हणण्यानुसार अजित पवार हे सांगतील तोच चेहरा हा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दिला जाऊ शकतो का ? असा प्रश्न चिन्ह यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे खा.शरद पवार यांनी दौंड तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार यांच्या कामाबाबत काढलेले उदगार लक्षात घेता खा.शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्रित बसून दौंड तालुक्याचा पेच नेमका कसा सोडविणार याकडे लक्ष केंद्रित झाले आहे. कारण आज उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडे माजी आमदार रमेश थोरात हे असून खा.शरद पवार यांच्याकडे अप्पासाहेब पवार हे गेले आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकीत हा पेच कसा सोडविला जाणार हे पाहणे महत्वपूर्ण असणार आहे.

निवडणुकीत दोन्ही गट एकत्र कार्यकर्त्यांना मिळणार दिलासा

आज दोन्ही गट वेगळे झाल्याने अनेक कर्यकर्ते हे दोघांना मानणारे आहेत, त्यांची आज मोठी गोची झाली आहे. अजून अनेकात संभ्रम अवस्था आहे. मात्र खा. शरद पवार यांच्या संकेतनुसार असे घडले तर निश्चितच दोन्ही गटाच्या कर्यकर्त्यांना दिलासा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here