दोन्ही मुली झाल्या म्हणून पतीने तिचा विहिरीत ढकलून केला खून


सांगली : एकीकडे देशात बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान सुरू करण्यात आले. मात्र, तरीसुद्धा आज काही ठिकाणी मुलगा आणि मुलीमध्ये भेद मानला जातो. काही लोक आजही मुलींचा जन्म झाल्यानंतर आनंदी नसतात.
पुरोगामी महाराष्ट्रात याबाबतची धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन्ही मुली झाल्या म्हणून विवाहित महिलेचा विहिरीत ढकलून खून करण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण – सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील कोळी मळा परिसरातील विवाहित महिलेसोबत हा धक्कादायक प्रकार घडला. दोन्ही मुलीच झाल्याच्या कारणातून पतीने तिला विहिरीत ढकलून देत खून केल्याचे उघडकीस आले.

ही घटना रविवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. राजनंदिनी कौस्तुभ सरनोबत (वय 29) असे खून करण्यात आलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मृत विवाहित महिलेचे नातेवाईक मिलिंद नानासाहेब सावंत (वय 26, रा.

रमण मळा, कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन पती कौस्तुभ कृष्णराव सरनोबत (वय 31, कोळी मळा, इस्लामपूर) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राजनंदिनीला पहिल्या दोन्ही मुली झाल्या.

त्याचा राग कौस्तुभच्या मनात होता. या रागातूनच त्याने रविवारी पहाटे फिरायला जाण्याचा बहाणा केला आणि पत्नी राजनंदिनीला आपल्या दुचाकीवरून कापूसखेड रस्त्यावरून घेऊन गेला. तो तिला कापूसखेड गावच्या हद्दीत रस्त्यापासून 30-40 फूट अंतरावर असलेल्या शेतात सोबत घेऊन गेला.
आणि याठिकाणी पोहोचल्यावर तेथे त्याने पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत राजनंदिनीला ढकलून दिले. तिला पोहता येत नव्हते. त्यामुले तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here