उजव्या हाताला बसले, उजवा हातच होते; तरीही पवारांनी वळसे घेत त्यांना टाळले!

0
128
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार गटाच्या आणि सध्या सहकारमंत्री म्हणून कार्यरत असलेल्या दिलीप वळसे पाटील यांच्याकडे लक्ष न देणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पसंत केले.

तब्बल दीड तास व्यासपीठावर एकत्र असलेल्या आणि शेजारीच उजव्या हाताला बसलेल्या दिलीप वळसे पाटील यांच्याशी शरद पवार यांनी केवळ एकदाच संवाद साधला. त्याचवेळी डाव्या हाताला बसलेले राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी मात्र ते वारंवार संवाद साधत होते.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शनिवारी (दि. १२) झालेल्या कार्यक्रमात हे चित्र पाहायला मिळाले. मंचावर एकत्रित असूनही शरद पवारांनी वळसे यांच्याशी बोलणे टाळले. या दोघांमधील अबोला राज्यातील साखर कारखानदारांना चांगलाच जाणवला. तसेच अवघडलेपण उपस्थितांनाही जाणवत हाेते. याबद्दल वळसे पाटील यांना विचारले असता, तसे काही नाही, असे सांगून त्यांनी प्रश्नाला बगल दिले.

शरद पवार यांचे स्वीय सहायक म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या वळसे पाटील यांनी शरद पवार यांचे बोट धरूनच राजकारणात प्रवेश केला हाेता. शरद पवारांची सावली म्हणूनच ते काल-परवापर्यंत त्यांच्यासोबत होते. कॅबिनेट मंत्र्यासह विधानसभा अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. मात्र, गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रवादीतील राजकीय बंडानंतर वळसे पाटील यांनी अजित पवार यांची साथ पत्करली. त्यामुळे नाराज झालेले शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमात दिलीप वळसे यांच्याशी अंतर ठेवून होते. वळसे पाटील यांच्या शेजारी राजेश टोपे हे देखील बसलेले होते. मात्र, त्यांच्यातही कोणताही संवाद झाला नाही. कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी जयंत पाटील व राजेश टोपे एकत्रित सभागृहात आले, ते वळसे पाटील यांना टाळूनच. मात्र, वळसे पाटील हे शरद पवार यांच्यानंतर व्यासपीठावर दाखल झाले. हे देखील अनेकांच्या नजरेतून सुटले नाही.

हे चर्चासत्र तांत्रिक होते. साखर कारखानदारांना पडणाऱ्या प्रश्नांबाबत पवार स्वतः पुढाकार घेत होते. त्याचवेळी वळसे पाटील मात्र शांतपणे सर्व पाहत होते. चर्चासत्र संपल्यानंतर वळसे पाटील बोलण्यापूर्वीच शरद पवारांनी व्यासपीठावरून निघून जाणे पसंत केले. त्यावेळीही त्यांनी वळसे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष केले. पवार निघून गेल्यानंतर जयंत पाटलांनीही जाण्याचे ठरवले. त्याचवेळी वळसे पाटील उभे राहिले आणि त्यांना नमस्कार केला. जयंत पाटील यांनीही त्यांना हात जोडून नमस्कार केल्यावर केवळ अर्धा मिनिटांमध्ये त्यांची चर्चा झाली व पाटील कार्यक्रम सोडून निघून गेले. कार्यक्रमानंतर पत्रकारांनी वळसे पाटील यांना या अवघडलेल्या प्रकाराबाबत विचारले असता, ‘तसे काहीही नाही’ असे सांगत उत्तरादाखल फारसे न बोलण्याचे कटाक्षाने टाळले. कार्यक्रमापूर्वी आमच्यात संवाद झाला. मात्र, तो व्हीएसआयच्या संदर्भात होता एवढेच त्यांनी सांगितले.

…का हा अबोला?
मुळात वळसे पाटील हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे संस्थेमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांना शरद पवार उपस्थित असताना वळसे पाटील यांना येणे अपेक्षितच आहे. मात्र, यापूर्वीच्या कार्यक्रमांमध्ये बहुतांशवेळा वळसे पाटलांशी चर्चा करणारे शरद पवार आजच्या कार्यक्रमात मात्र अबोला धरूनच होते. भाजपसोबत गेल्यानंतर शरद पवारांच्या मनातील नाराजी त्यांनी अशा पद्धतीने व्यक्त केली आहे, याची चर्चा सभागृहामध्ये होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here