तरुणाचा शेतातील आखाड्यावर जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

लातूर : तालुक्यातील भाेईसमुद्रा येथील एका तरुणाचा शेतातील आखाड्यावर जळालेल्या अवस्थेत १९ डिसेंबर २०२१ राेजी मृतदेह आढळून आला हाेता.
याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात प्रारंभी अकस्मात मृत्यूची नाेंद केली हाेती. दरम्यान, या संशयास्पद घटनेचा पाेलिसांनी महिन्यात उलगडा केला असून, दाेघांना अटक केली आहे. आराेपींनी पेट्राेल टाकून जिवंत जाळल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी आता खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर तालुक्यातील भाेईसमुद्रा येथील ऋषिकेश रामकिशन पवार (२९) हा एकुलता एक मुलगा हाेता. १९ डिसेंबरच्या पहिल्या रात्री मयत ऋषिकेश पवार याचा मेहुणा रणजीत विजयकुमार देशमुख आणि चुलत भाऊ गाेविंद नागाेराव पवार यांनी शेतातील आखाड्यावरच पार्टी केली. दरम्यान, तिघांनीही एकत्रितपणे मद्य प्राशन केले हाेते. नशेत असलेल्या मेहुणा आणि चुलत भावाने तू माझ्या भावजयीला माेबाईलवर का बाेलताेस?, अशी विचारणा केली. यातूनच दाेघा आराेपी आणि मयतामध्ये बाचाबाची झाली. गाेविंद पवार याने मयताच्या डाेक्यात शेतीचे औजार घातले. या मारहाणीत ऋषिकेश पवार हा बेशुद्ध पडला. त्यानंतर आराेपी गाेविंद पवार आणि मेहुणा रणजीत देशमुख याने त्यास खाटेवर झाेपवून पेट्राेल टाकून पेटवून दिले. घटनेनंतर ते पायी घराकडे गेले. याप्रकरणी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात प्रारंभी अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली. या घटनेचा तपास पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पाेउपनि. संदीप कराड, पाेलीस नाईक दरेकर, पाेलीस नाईक वायगावकर, मालवदे, बेल्लाळे, राजपूत, जाधव, ओगले यांच्या पथकाने केला.

गावात याबाबत तर्क-वितर्क आणि चर्चा सुरु हाेती. गाेपनीय माहिती संकलित करुन, सीसीटीव्ही फुटेज, माेबाईल चॅटिंग, माेबाईल लाेकेशन, काॅल्सची तपासणी केली. यातूनच या संशयास्पद घटनेचा उलगडा झाला. अशी माहिती अप्पर पाेलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी दिली. यावेळी परिविक्षाधीन पाेलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे उपस्थित हाेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here