ताज्या बातम्याधार्मिक

मॉरिशसचा १०८ फूटी मंगल महादेव


हिंदूंची सर्वाधिक संख्या असलेल्या नेपाळ आणि भारताप्रमाणेच मॉरिशस या आफ्रिकेतील देशांत देखील भगवान शंकराची शंभर फुटांपेक्षा मोठ्ठी मूर्ती तयार करण्यात आलेली आहे.

मॉरिशस मधील सावन्ने जिल्ह्यांत ‘गंगा तलाव’ नावाचा अतिशय विशाल तलाव किंवा सरोवर आहे. या तलावाच्या दर्शनी भागांत भगवान शंकराची ३३ मीटर म्हणजेच १०८ फूट उंचीची भव्य मूर्ती आहे. जगातल्या सर्वांत मोठ्या शिवमुर्तीमध्ये या शिव मुर्तीची गणना केली जाते. दोन हातांची त्रिशूलधारी भगवान शंकरांची ही उभी असलेली मूर्ती पाहण्यासाठी केवळ मॉरिशस मधील भारतीय नाही तर परदेशातील पर्यटक देखील मोठ्या संखेने येतात.
जगातल्या उंच व मोठ्या शिव मुर्तींत समाविष्ट असलेली भगवान शंकरांची ही मूर्ती अर्थातच मॉरिशस मधील देखील सर्वांत मोठी शिव मूर्ती आहे. मॉरिशस मधील हिंदू भाविकांना भारताने दिलेली ही अनोखी भेट आहे. मॉरिशस मधील या शिवमूर्तीचे नाव आहे -मंगल महादेव! या मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे गुजरात मधील वड़ोदरा येथील भगवान शिवाच्या मुर्तीची ही हुबेहूब प्रतिकृती आहे असे म्हणतात.

गंगा तलावाचे मूळ नाव ‘ग्रॅन्ड बॅसिन’ असे होते. या विशाल जलाशयाच्या काठावर मंदिरांचे एक विशाल संकुल तयार करण्यात आले आहे. मंदिर समुहाच्या दर्शनी भागांत भगवान शंकरांची ३३ मीटर उंच भव्य मूर्ती आहेत. भगवान शंकराची ही मूर्ती २००७ साली तयार करण्यात आली आणि २००८ सालच्या महाशिवरात्रीच्या दिवशी मंगल महादेव मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

मंगल महादेव हे मॉरिशसमधील अतिशय पवित्र धार्मिक ठिकाण आहे. मॉरिशसची काशी असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही इतके हे ठिकाण पवित्र आहे. भगवान शिवाच्या मंगल महादेव नावाच्या १०८ फूटी उंच मूर्ती प्रमाणेच येथे सिंहासनाधिष्ठित दुर्गा देवीची देखील १०८ फूट उंच मूर्ती आहे. त्याच प्रमाणे या परिसरांत महालक्ष्मी, हनुमान आणि गणेश यांचीही मोठी मंदिरं आहेत. शिव मूर्तीच्या एका बाजूला भलामोठ्ठा नंदी असून दुसर्या बाजूला माता पार्वती, कार्तिकेय आणि श्रीगणेश यांच्या सुबक आणि प्रसन्न मूर्ती आहेत. महाशिवरात्र हा येथील वार्षिक उत्सवाचा प्रमुख दिवस. या दिवशी भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. विशेष म्हणजे अनेक भाविक आपल्या घरांपासून मंगल महादेवाच्या मूर्ती पर्यंत पंढरपुरला जाणार्या वारकर्यांच्या श्रद्धेने अनवाणी पायांनी दर्शनाला जातात.

गंगा तलावाभोवतीचा हा संपूर्ण परिसर अतिशय काळजीपूर्वक विकसित करण्यात आला आहे. सिमेंट कॉन्क्रीटचे लांबच लांब दुहेरी रस्ते. सगळा परिसर अतिशय स्वच्छ आणि देखना आहे. पार्किंग साठी प्रशस्त जागा आहे. परिसरांत प्रवेश केल्यावर मंगल महादेव आणि दुर्गा देवीच्या उंच मूर्ती चारी दिशांनी नजरेस पडतात. इथली मंदिरं नुकताच रंग दिल्या सारखी फ्रेश दिसतात. मंदिरांना काचेचे दरवाजे आणि खिडक्या आहेत तसेच येथील मंदिर एखाद्या कॉर्पोरेट ऑफिस सारखे चकाचक दिसते.

भगवान शिवाची पिंड इथले पूजा करण्याचे प्रमुख स्थान आहे. मोठ्या हॉल सदृश गाभार्यात शिवपिंड स्थापन केलेली आहे. पिंडी भोवती सर्वत्र पांढर्या स्वच्छ टाईल्स बसविलेल्या आहेत. इथली स्वच्छता प्रशंसनीय आहे. शिव पिंडीवर दुधाचा सतत अभिषेक केला जातो त्यासाठी पिंडी भोवती स्टीलच्या पन्हाळी (उघडया पाईप लाईन्स) बसविलेल्या आहेत. त्यातुन भाविक बाहेरून पिंडीवर दुधाचा अभिषेक करू शकतात. भाविकांनी पिंडीवर वाहिलेली पाने, फुले, पुजारी सतत काढून बाजूला ठेवतात व नवीन पाने,फुले पिंडीवर वाहतात.

पिंडीवर पाने, फुले, दूध आणि पाणी यांचा सतत अभिषेक होत असुनही इथली शिव पिंड नेहमी निर्मळ आणि प्रसन्न दिसते.
याच मंदिरांत हनुमान,गायत्री माता,अन्नपूर्णा माता,संतोषी माता, श्रीगणेश, कार्तिकेय, कालीमाता, भैरव यांच्या संगमरमरी देखण्या मूर्ती आहेत. प्रत्येक मूर्तीमागे संस्कृत भाषेत श्लोक लिहिलेले आहेत. या मंदिरा पासून जवळच ३० मीटर उंच पहाडावर हनुमान मंदिर आहे. घनदाट झाड़ीनी नटलेला हा पहाड २०० पायर्यांच्या मदतीने चढ़ता येतो. येथे भरपूर माकड असतात. भाविकांच्या हातातल्या पिशव्या,वस्तू ते हिसकावून घेतात. गंगा तलावाचे पाणी नितळ व स्वच्छ आहे. येथे भाविक माशांना खाद्य टाकतात त्यावेळी अक्षरश शेकडो मासे तेथे जमा होतात.ते पाहून थक्क व्हायला होतं.

मंगल महादेव मंदिराचा हा सगला परिसर अतिशय रम्य आणि पवित्र आहे. एखाद्या धार्मिक तीर्थस्थळी आल्याचा अनुभव भाविकांना येतो. १८६६ साली पंडित संजिबनलाल यांनी पाहिलेले ‘ग्रॅन्ड बॅसिन’ या तलावाचे ‘गंगा तलाव’ नावाच्या धार्मिक स्थानांत रूपांतर करण्याचे स्वप्न आज साकार झालेलं पहायला मिळतं.खुद्द मॉरिशसच्या पंतप्रधान रामगुलाम यांनी १९७२ साली थेट हिमालयातील गंगोत्रीचे पाणी ‘ग्रॅन्ड बॅसिन’च्या पाण्यात टाकुन त्याचे नामांतर ‘गंगातलावा’ त केले. १९९८ साली हा संपूर्ण परिसर हिंदूचे पवित्र धार्मिक स्थल म्हणून मॉरिशस मध्ये लोकमान्य व राजमान्य झाला आहे. मॉरिशसची यात्रा मंगल महादेवमंदिराचे दर्शन घेतल्याशिवाय सुफल संपूर्ण होत नाही, असे म्हणतात!

विजय गोळेसर
मो. ९४२२७६५२२७


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *