नवी दिल्ली : हैदराबाद मुक्ती दिनाला 75 वर्षे झाल्याच्या निमित्ताने हैदराबादला देशातील चार प्रमुख राजकीय पक्षांचे वेगवेगळे कार्यक्रम होत आहे. यामुळे हैदराबादला उद्या, रविवारला राजकीय आखाड्याचे स्वरुप येणार आहे.
17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद राज्य भारतात विलीन झाले होते. या घटनेला 75 वर्षे पूर्ण होत आहे. येत्या काही महिन्यात तेलंगणात विधानसभा निवडणुका असल्याने या घटनेचा राजकीय फायदा उचलण्याचा चंग सर्व राजकीय पक्षांनी लावला आहे. काँग्रेस पक्षाची सीडब्ल्यूसीची बैठक आजपासून हैदराबादला सुरू झाली आहे.
उद्या, रविवारी काँग्रेसने हैदराबाद पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या टुकुगुडा या गावात रॅली आयोजित केली आहे. या रॅलीत तेलंगणाच्या मतदारांना सहा हमी दिल्या जाणार आहेत. या रॅलीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासहसर्व दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त सरकारी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा उद्या हैदराबादमध्ये राहणार आहेत. हैदराबाद मुक्ती दिनाचा कार्यक्रम परेड ग्राऊंडवर होणार आहे. या कार्यक्रमात भाजपचे वर्चस्व राहणार आहे.
तेलंगणात सत्तेत असलेल्या बीआरएस पक्षाने उद्या, राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा करणार आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव या कार्यक्रमात आपली शक्ती दाखविणार आहेत. काँग्रेस पक्षाला हैदराबाद येथे मैदान मिळू नये, यासाठी काँग्रेसला हैदराबादपासून दूर असे मैदान देण्यात आले आहे.
तेलंगणातील चौथा महत्त्वाचा राजकीय पक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वातील एमआयएम पक्षाने उद्या, राष्ट्रीय कौमी एकता दिन साजरा करण्याचे ठरविले आहे. या चारही पक्षांच्या राजकीय कार्यक्रमामुळे तेलंगणाचा प्रचाराचा बिगुल फुंकलं जाणार आहे. यामुळे हैदराबाद मुक्ती दिनाला राजकीय आखाड्याचे स्वरुप येणार आहे.