निवडणुकीआधीच नाशिकमध्ये मनसेला हादरा! राज ठाकरे समर्थक माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
98
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांतील नाराजी नाट्य समोर येऊ लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर राज ठाकरे यांच्या मनसेलादेखील ठिगळं पडायला सुरुवात झाली आहे.

राज ठाकरे यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनसेच्या माजी आमदाराने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

माजी आमदार नितीन भोसले मनसे सोडून शरद पवार गटात प्रवेश करत आहेत. काही दिवसांपुर्वी शिर्डी मतदार संघाच्या प्रमुख संपर्क पदावरून हटवल्यामुळे नाराज झालेले बबनराव घोलप यांनी शिवसेना पक्षाचा उपनेते पदाचा राजीनामा दिला होता. या पार्श्वभूमीवर आता मनसेतही नाराजी नाट्य सुरु असल्याचे बोलले जात आहे.

माजी आमदार नितीन भोसले यांनी थेट राष्ट्रवादीचे शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. यामुळे मनसेला मोठा हादरा बसला आहे. आगामी निवडुकीच्या पार्श्वभूमीर मनसेने राज्यभरात मोर्चे बांधणी सुरु केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच मनसे नेते अमित ठाकरे यांचे राज्यभरात दौरे सुरु आहेत. मनसेने मुंबई-गोवा महामार्गाचा मोठा मुद्दा हाती घेतला. राज्यातील विविध प्रश्न सोडवण्यात मनसे अग्रभागी दिसतेय. सरकारविरोधी भूमिका घेतानाही दिसत आहे. अशावेळी मनसे आमदार पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करुन इतर पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत.

मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांचा यशवंतराव चव्हाण सभागृहात पक्षप्रवेश झाला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोजके नेते आणि नितीन भोसलेंचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. नितीन गे गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक शहरातील मनसेच्या राजगड कार्यालयापासून दूर होते. ते मनसेच्या कोणत्याही कामकाजातही पुढाकार घेत नव्हते.

मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नितीन यांनी आपली भूमिका मांडली आहे. पक्ष कामकाजात सुधारणा होत नाही हे बघून मी भविष्यातील परिस्थितीचा वेध घेऊन शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे नितीन यांनी सांगितले. राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर नाशिकमधील मोठा गट अजित पवारांसोबत गेला. अशावेळी शरद पवार गटाला तिथे एका मुख्य नेत्याची गरज होती. हे पाहता नितीन भोसले राष्ट्रवादी शरद पवार गटात महत्वाची भूमिका बजावू शकतील असे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here