देशभरात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने वातावरण अल्हाददायक झालं असून, वाढलेल्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या देशातील बहुतांश राज्यांत पाऊस सुरू आहे.
राजधानी दिल्लीतही गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे दिल्लीतील नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज (11 सप्टेंबर) उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
राजधानी दिल्लीत कसं असेल हवामान?
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सोमवारी (11 सप्टेंबर) दिल्लीतील हवामान सामान्य राहील, केवळ काही भागात आज पावसाची शक्यता आहे. याशिवाय 12 ते 16 सप्टेंबरपर्यंत राजधानी दिल्लीत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. 9 सप्टेंबरच्या सकाळपासून 10 सप्टेंबरच्या सकाळी 8.30 वाजेपर्यंत दिल्लीत 38.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 1.3 मिमी पावसाची नोंद झाली.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि इतर बाजूच्या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या वेळी लोकांना सावध राहण्याचं आवाहन देखील हवामान खात्याने केलं आहे.
उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
उत्तर प्रदेशात पावसानंतर हवामानात बदल दिसून आला. राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांमधील लोकांचं टेन्शन वाढवलं. रस्त्यांचं रुपांतर नद्यांमध्ये झाल्याने उत्तर प्रदेशमधील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात 12 सप्टेंबरपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.
उत्तराखंडमध्ये पावसाचा यलो अलर्ट
उत्तराखंडमध्ये देखील आज पावसाचा अंदाज आहे. डेहराडून, बागेश्वर, पिथौरागढ आणि नैनिताल जिल्ह्यांत हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय पुढील चार दिवस उत्तराखंडमध्ये वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने डोंगराळ जिल्हे आणि उधम सिंह नगरच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही मुसळधार पाऊस
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मध्यप्रदेशात 12 सप्टेंबरपर्यंत आणि छत्तीसगडमध्ये 14 सप्टेंबरपर्यंत हवामान खराब राहणार आहे. काही ठिकाणी वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे.