सीपीआरमध्ये आता कॅन्सरची मोफत तपासणी होणार; हसन मुश्रीफांच्या हस्ते सेवेचा शुभारंभ

0
112
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

कोल्हापूर : सीपीआरमध्ये मोफत कॅन्सर तपासणी होणार असून ओपीडीतून गोरगरिबांना चांगली सुविधा मिळेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. सीपीआरमध्ये बाह्यरुग्ण विभाग इमारतीत मोफत होमिओपॅथिक तपासणी आणि कॅन्सर तपासणीचे उद्घाटन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

सोमवार ते शुक्रवार दुपारी 3 ते 5 या वेळेत रूग्णांची तपासणी करून मोफत औषध दिली जाणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी सांगितले.

मुश्रीफ म्हणाले की, सद्यस्थितीत विविध प्रकारच्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात सुविधा नसल्याने कर्करोगी रूग्णांना उपचारासाठी जिल्ह्याबाहेरील पुणे, मुंबई व चांगल्या सुविधा मिळणाऱ्या खर्चिक ठिकाणी उपचारासाठी जावे लागते. त्यामुळे याठिकाणी सर्वसामान्यांना कॅन्सर प्रकारातील तोंड, घसा, फुफ्फुस, स्तन, गर्भाशय, आतडे, किडणी आणि मुत्राशय कर्करोग यावरील उपचारांचा लाभ मिळणार आहे. कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या कार्यकारी संचालिका डॉ. रेश्मा पवार यांनी कर्करोगावर सीपीआरमध्ये कॅन्सर तज्ज्ञांमार्फत मोफत तपासणी नियमित सुरू राहून महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत कॅन्सर उपचारासह निदान करून रूग्णास जीवदान देण्यात येणार असल्याचे सांगितले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी अशा रुग्णांनी नियमित शिजवलेले अन्न खावे आणि नियमित व्यायाम करून आजारांना दूर करावे असे सांगितले. कर्करोगाच्या सर्वसाधारण लक्षणांवर दुर्लक्ष झाल्यास गंभीर आजार उद्भवतो म्हणून वेळेत तपासणी आणि निदान करावे असे पुढे सांगितले.

सीपीआरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातीलतसेच इतर शेजारी जिल्ह्यातील विविध आजाराचे रुग्ण येत असतात. सद्यस्थितीत विविध प्रकारच्या कर्करोग रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या आजारावर उपचाराची सुविधा सीपीआरमध्ये उपलब्ध नव्हती. तसेच या आजाराचा खर्च गोरगरिब रुग्णांना परवडणारा नाही. यासाठी ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. या विभागास भेट देणाऱ्या रुग्णांची आवश्यक ती तपासणी झाल्यानंतर रुग्णास गरजेनुसार आवश्यक त्या शस्त्रक्रिया कॅन्सर तज्ज्ञांमार्फत सीपीआर शस्त्रक्रियागृहामध्ये मोफत केल्या जातील. यासाठी कोल्हापूर कॅन्सर सेंटर, कोल्हापूर यांच्याकडील कॅन्सर तज्ज्ञ मानद सेवेद्वारे उपलब्ध होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here