ताज्या बातम्या

तालिबान्यांनी गोळ्या घालून २०० अधिकारी ठार मारले


इस्लामाबाद – अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता हातात घेतल्यापासून आतापर्यंत त्यांनी पूर्वीच्या सरकारमधील दोनशेहून अधिक अधिकाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारले असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.तालिबानने लष्कर, पोलिस आणि गुप्तचर विभागांतील माजी अधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याचेही अहवालात म्हटले आहे.

 

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात अफगाणिस्तानमध्ये १५ ऑगस्ट २०२१ ते जून २०२३ या कालावधीत मानवाधिकारांचा भंग झाल्याच्या ८०० घटनांची नोंद घेण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर या संघटनेच्या तथाकथित सैनिकांनी अनेक जणांना ताब्यात घेतले होते. यातील काही जणांना नंतर ठार मारण्यात आले.

 

यापैकी काहींना तुरुंगात, तर काहींना दूर मैदानात नेऊन गोळी घालण्यात आली. हे करताना तालिबानने लष्कर, पोलिस दल आणि गुप्तचर विभागात काम केलेल्या अधिकाऱ्यांना लक्ष्य केले होते. बेकायदा पद्धतीने अशा दोनशेहून अधिक अधिकाऱ्यांना तालिबानने मारल्याचे अहवालात म्हटले आहे.

 

कोणालाही लक्ष्य केले जाणार नाही आणि मानवाधिकारांच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन केले जाईल, असे सत्ता ताब्यात घेतल्यावर तालिबानने जाहीर केले होते. मात्र, त्यांनी या आश्‍वासनाचा धडधडीतपणे भंग केला असल्याचा आरोपही संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात करण्यात आला आहे.

 

तालिबानने मात्र अहवालातील आरोप नाकारले आहे. आमच्या सत्ताकाळात मानवाधिकार भंगाची एकही घटना घडलेली नाही, असे तालिबानच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *