ठाणे : कळव्यातून बेपत्ता झालेल्या एका १६ वर्षीय मुलीचा अवघ्या दोन तासांमध्ये शोध घेण्यात कळवा पोलिसांना यश आले आहे. आई वडिलांच्या माराच्या भीतीने तिने दोन दिवसांपूर्वी घर सोडले होते.याप्रकरणी अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नवी मुंबईतील तुर्भे भागातून तिचा शोध घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कळव्यातील न्यू शिवाजीनगर भागात ही मुलगी वास्तव्याला आहे. तिचे आई वडिल हे मुंबईतील रे रोड भागात बिगारीचे काम करतात. याच कामासाठी ते १९ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या या आजारी मुलीला घरात ठेवून गेले होते. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ते जेंव्हा घरी परतले, त्यावेळी घरातून मुलगी बेपत्ता झाली होती. परिसरात तसेच नातेवाईकांकडे त्यांनी त्यांनी तिचा शोध घेतला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तिचा शोध लागलाच नाही. अखेर मुलीचे अपहरण झाल्याच्या शक्यतेने तिच्या पालकांनी याप्रकरणी २० आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
अपहरणाचा गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी तिच्या शोधासाठी दोन पथकांची निर्मिती केली. या पथकांनी तिच्या मोबाईलवरील लोकेशनच्या आधारे नवी मुंबईतील तुर्भे भागातून तिचा शोध घेतला. त्यावेळी ती एका ओळखीतल्या मुलाबरोबर आल्याची माहिती समोर आली. आई वडिल क्षुल्लक बाबीवरुन मारतात, ओरडतात, याचा आपल्याला राग येतो. याच रागातून आपण घर सोडल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मुलीला विश्वासात घेत तिचे समुपदेशन करण्यात आले. तरीही तिने आई वडिलांकडे जायचेच, नसल्याचा पवित्रा घेतला. अखेर तिची बालसुधारगृहात रवानगी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
केवळ मोबाईलसाठी किंवा अभ्यासासाठी आई वडिल रागावतात. शिस्तीसाठी ओरडतात, अशा तक्रारी मुलांच्या असतात. पण यात मुलांचे किंवा मुलींचेच हित असते. हे मुलांनी लक्षात घेतले पाहिजे. अगदी किरकोळ गोष्टीवरुन मुलांना ओरडून किंवा मारहाण करण्यापेक्षा त्यांना विश्वासात घ्या. त्यांच्याशी संवाद साधा, असा सल्ला वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिला आहे.