आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यभरातील तालुकाप्रमुखांशी संवाद साधणार आहेत. येत्या 2 सप्टेंबर रोजी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात तालुकाप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.त्या मेळाव्यात उद्धव ठाकरे हे तालुकाप्रमुखांशी संवाद साधून प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
2 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता होणाऱया या मेळाव्याला राज्यातील सर्व तालुकाप्रमुखांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने निवडणुकीची तयारी करावी यासंदर्भात या मेळाव्यात मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे आणि पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या निवडणूकपूर्व आढावा बैठकीची माहितीही यावेळी देण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्या मुद्दय़ांवर लोकांमध्ये जाऊन प्रचार आणि प्रसार करावा याबाबतही या मेळाव्यातून तालुकाप्रमुखांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुकाप्रमुखांच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामधून ही माहिती देण्यात आली.