सोलापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागातील गोंधळ काही केल्या संपत नाही. तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी पदभार सोडल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांच्यामार्गे हा पदभार महिला व बालकल्याणचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांच्यावर येऊन थांबला आहे.प्राथमिकचा विषय मार्गी लागल्यानंतर आता माध्यमिक शिक्षण विभागामध्ये रजासत्र सुरू झाले आहे.
शिक्षणाधिकारी फडके यांनी ‘लाँग लिव्ह’ तर उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी ‘शॉर्ट लिव्ह’ मागितली आहे. या अधिकाऱ्यांच्या रजा मागणीवर सीईओ मनीषा आव्हाळे यांनी काहीच निर्णय दिला नसल्याचे समजते. १ ऑगस्ट २०२३ रोजी मारुती फडके हे माध्यमिक शिक्षण विभागाचे पूर्णवेळ शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले.
रुजू होताच त्यांच्या खांद्यावर प्राथमिकच्या प्रभारीची जबाबदारी पडली. शालार्थ आयडी नसल्याने वेतन मिळत नसल्याने सोलापुरातील अनुदानित शाळेतील शिपायाने आत्महत्या केली. तेव्हापासून ते शालार्थ आयडी देण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यापर्यंतच्या घडामोडीत माध्यमिक शिक्षण विभाग आघाडीवर राहिला आहे.
माध्यमिकचे शिक्षणाधिकारी फडके यांना आरोग्याची समस्या भेडसावू लागल्याने त्यांनी एक महिन्यांची वैद्यकीय रजा मागितली आहे. या संदर्भातील अर्ज त्यांनी सीईओ आव्हाळे यांच्याकडे पाठविला आहे. उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनीही दोन दिवसांच्या रजेची मागणी केली आहे. माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी रजेची मागणी केली. परंतु, रजा मान्य की अमान्य याबाबत ठोस निर्णय झाला नसल्याचे समजते.
पुन्हा प्रश्न पदभाराचा…
आरोग्याच्या कारणास्तव शिक्षणाधिकारी फडके रजेवर गेलेच तर माध्यमिकचा पदभार द्यायचा कोणाकडे? हा प्रश्न समोर येऊ शकतो. उपशिक्षणाधिकारी अंधारे व योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांची नावे पुन्हा एकदा चर्चेत येऊ शकतात. शिक्षक आमदार जयंत आसगावकर व शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शालार्थ आयडीचा विषय प्राधान्याने हाती घेतला आहे. टप्पा अनुदानातील घोळ निस्तारण्यापासून ते शालार्थ आयडीचा किचकट विषय सुटसुटीत करण्याची जबादारी कोणाच्या खांद्यावर येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.