मुंबई :- वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांची मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सारवासारव केली आहे. संघात नवोदितांना जास्त संधी देण्याची आमची योजना होती मात्र, पराभवानंतर लगेचच त्याचे समिक्षण करण्याची गरज नाही.नवोदितांना जास्त वेळ देणे गरजेचे आहे, असेही द्रविड यांनी म्हटले आहे.
काही वेळा एकाच वेळी क्रिकेटच्या तीनही प्रकारात यशस्वी कामगिरी करणे कठीण जाते. आम्ही कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केली. टी-20 मध्येही आम्ही 2 सामने गमावल्यानंतर चांगले पुनरागमन करू शकलो, परंतु आम्हाला अपेक्षेप्रमाणे मालिका जिंकता आली नाही.
पहिल्या 2 सामन्यात आणि पाचव्या सामन्यात आम्ही भरपूर चुका केल्या, त्यामुळे आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यांमध्ये आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात चांगली कामगिरी करू शकलो नाही, परंतु हा युवा संघ आहे ज्यात सातत्याने सुधारणा होत आहे, त्यांना आणखी वेळ देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
आम्हाला या मालिकेत युवा खेळाडूंना संधी द्यायची आहे. आम्ही काही संघ समतोलही होतो का ते पाहिले. आमच्यासाठी काही सकारात्मक गोष्टीही घडल्या. काही गोष्टींमध्ये बदल करण्याची पुरेपुर संधी मिळाली नाही, मात्र आम्ही भविष्यीतील सामने लक्षात घेऊन काही क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. यामध्ये आम्हाला टी-20 मध्ये आमच्या फलंदाजीत अधिक खोली आणायची आहे. मग यात कशी सुधारणा करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे, पण गोलंदाजी आक्रमण कमकुवत न करता संघात दोन्ही बाजूंचा समतोल दिसला पहिजे, असेही त्यांनी सांगितले.
शेवट कडू झाला…
भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचा शेवट अपेक्षेप्रमाणे झाला नाही. टी-20 मालिकेतील पाचव्या सामन्यात संघाला 8 गडी राखून पराभूत करत वेस्ट इंडिजने तब्बल 17 वर्षांनंतर भारतीय संघाविरुद्धची मालिका जिंकली. वेस्ट इंडिज संघाला अशाच एका मालिका विजयाची गरज होती. त्यांना एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेची पात्रता मिळवता आलेली नाही त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. आता टी-20 मालिका जिंकल्यामुळे पुढील काळात होत असलेल्या स्पर्धांमध्ये ते सरस व सातत्यपूर्ण कामगिरी करतील, असा विश्वासही द्रविड यांनी व्यक्त केला.