ताज्या बातम्या

‘ड’ जीवनसत्त्व – निरोगी आयुष्याचा पाया


सध्याच्या काळात ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता, हे अगदी सर्वसामान्य लक्षण झाले आहे. खरेतर एखाद्या साथीच्या रोगाप्रमाणे ही कमतरता सर्वत्र पसरत आहे. जवळपास निम्मे जग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेने ग्रासले गेलेय. अनेक व्यक्तींमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे निदान होत असून, यात किशोरवयीनांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या व्यक्तींचा समावेश आहे. ‘ड’ जीवनसत्त्व म्हणजे नेमके काय, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते, ते त्यामुळेच. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप इंग्रजीतील व्हिटॅमिन (जीवनसत्त्व) हा शब्द ‘व्हायटल’ आणि ‘अमिनो’ या दोन शब्दांपासून तयार झालाय. अत्यंत महत्त्वाचे असे अमिनो आम्ल, असा व्हिटॅमिनचा अर्थ आहे. शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी जीवनसत्त्व नावाचे रसायन आवश्‍यक असते. जर्मन रसायनशास्त्रज्ञ अडॉल्फ विंडौस यांनी १९२०मध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा शोध लावला. या महत्त्वपूर्ण शोधाबद्दल त्यांना १९२८मध्ये नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले. सूर्यप्रकाश, मूत्रपिंड आणि यकृताच्या एकत्रित समन्वयाने तयार होणारे हे एकमेव जीवनसत्त्व आहे. रक्तात कॅल्शियमचे केंद्रीकरण होण्यास ते मदत करते. शरीरातील अनेक कार्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्व महत्त्वपूर्ण आहे. हाडांच्या विकासातही त्याची महत्त्वाची भूमिका आहे. जीवनसत्त्वांचे चरबीमध्ये विरघळणारी आणि पाण्यात विरघळणारी अशा दोन गटांत वर्गीकरण केले जाते. सूर्यप्रकाश थेट ‘ड’ जीवनसत्त्व देतो काय?  सूर्यप्रकाश आपल्याला थेट ‘ड’ जीवनसत्त्व देत नाही. या जीवनसत्त्वाच्या निर्मितीमध्ये सूर्यप्रकाश भूमिका बजावतो. शरीराला गरज असलेल्या ‘ड’ जीवनसत्त्वाच्या सक्रिय स्वरूपाला ‘कॅलसिट्रिओल’ किंवा ‘क्‍टिव्हिटेड व्हिटामिन डी ३’ म्हटले जाते. फक्त ‘ड’ जीवनसत्त्व असे त्याचे नाव नाही. या जीवनसत्त्वाच्या निर्मितीचा प्रवास त्वचेखाली सुरू होतो आणि किडनीमध्ये संपतो. साध्या भाषेत सांगायचे, तर हा तीन टप्प्यांतील प्रवास आहे. पहिल्या टप्प्यात त्वचेमध्ये नैसर्गिक स्वरूपात ‘ड’ जीवनसत्त्व तयार होते. कोलेस्टेरॉलच्या ‘७ – डिहायड्रोकोलेस्टेरॉल’ या सर्वत्र उपलब्ध असलेल्या स्वरूपातून याची निर्मिती होते. तुम्ही सूर्यप्रकाशात असता तेव्हा सूर्यप्रकाशातून ‘युव्हीए’ आणि ‘युव्हीबी’ अशी दोन प्रकारची अतिनील किरणे तयार होत असतात. यांपैकी युव्हीबी हे कोलेस्टेरॉलचे त्वचेखाली ‘कोलेकॅल्सिफेरोल’ किंवा ‘ड ३’ या जीवनसत्त्वात रूपांतर करते. त्यानंतर या ‘ड ३’ जीवनसत्त्वाचा पुढील प्रवास सुरू होतो. ते यकृतात पोचते. आपल्या शरीरातील यकृतामध्ये पाण्याबरोबरच्या रासायनिक अभिक्रियेतून त्याचे विभाजन होते. याचाच अर्थ ‘ड’ जीवनसत्त्व ‘२५ – हायड्रोक्‍झिव्हिटामिन डी’ किंवा ‘२५ (ओएच) डी बनण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्व ऑक्‍सिजन आणि हायड्रोजनचे अतिरिक्त रेणू ग्रहण करते. त्यानंतर, हे २५ (ओएच) डी किडनीच्या आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रवासाची सुरुवात करते. किडनीमध्ये ते ऑक्‍सिजन आणि हायड्रोजनच्या रेणूची अंतिम जोडी मिळविते. त्यातून ते १.२५ डिहिड्रॉक्‍झिव्हिटामिन डी बनते. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या १.२५ (ओएच ) डी यालाच साध्या भाषेत ‘कॅलसिट्रिओल’ किंवा सक्रिय ‘ड’ जीवनसत्त्व असे म्हणतात. हाडांचा विकास आणि जीवनसत्त्व  शरीरातील हाडांचा विकास आणि कॅल्शियमचे प्रमाण योग्य राखण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्वाची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची असते. आपल्या आहारातून कॅल्शियम शोषण्यासाठी शरीराला ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज असते. कॅल्शियम हाडांसाठीचा मुख्य पाया तयार करते. याउलट ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेतून आहारातून कॅल्शियमचे अपुरे शोषण होते. या परिस्थितीत शरीराला हाडांमध्ये साठलेले कॅल्शियम वापरावे लागते. त्यामुळे अस्तित्वात असलेली हाडे कमकुवत तर होतातच, शिवाय नवीन हाडांच्या निर्मितीलाही प्रतिबंध होतो.  अभाव आणि नैराश्‍य  ‘ड’ जीवनसत्त्वाच्या नैराश्‍यातील भूमिकेबद्दल फारसे माहीत नाही. हे जीवनसत्त्व रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या आणि आणि मेंदूत न्यूरोट्रान्समीटर सोडणाऱ्या जनुकांचे नियमन करते. न्यूरोट्रान्समीटर मेंदूत संदेशांची देवाणघेवाण करतात. त्यांचा मेंदूच्या कार्याबरोबरच मनःस्थिती आणि त्याच्या विकासावर प्रभाव असतो. मेंदूतील एकाच भागातील मोजक्‍या पेशीवरील ‘ड’ जीवनसत्त्वांचे चेतातंतूचे टोक (रिसेप्टर्स) नैराश्‍याशी संबंधित असल्याचे संशोधकांना आढळले आहे. मनुष्यामधील नैराश्‍य आणि ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमी पातळीच्या दुव्यावर अनेक संशोधनांतून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. कमतरता कशामुळे?  ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे एक प्रमुख कारण म्हणजे सूर्यप्रकाशात अपुरा वेळ घालविणे. सध्याची जीवनशैली धावपळीची आहे. यात कार्यालयीन कामासारख्या बंद खोलीतील कामांमुळे सूर्यप्रकाशाशी फारसा संपर्क येत नाही. यकृत किंवा किडनी ‘ड’ जीवनसत्त्वाचे शरीरात त्याच्या सक्रिय स्वरूपात रूपांतर करू शकत नाही किंवा शरीर अन्नातून पुरेसे ‘ड’ जीवनसत्त्व शोषण्यास सक्षम नसणे, हे दुसरे कारण होय. शरीरात ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता होण्यामागे त्याचे अपुरे सेवन हे तिसरे कारणही आहे. याव्यतिरिक्त काही विशिष्ट औषधांचा वापर, वय, अंडरएक्‍टिव्ह पॅराथाइरॉइड ग्लॅंडस आदी कारणांमुळेही ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते. जीवनसत्त्व आणि आहार रोज प्रौढ व्यक्तीला ६०० युनिट ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज असते. केवळ आहाराचाच विचार केल्यास शाकाहारात ‘ड’ जीवनसत्त्वाचे पर्याय खूपच कमी प्रमाणात आहेत. बहुतेक कोणत्याही भाजीमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व आढळत नाही. शाकाहारात उपलब्ध असलेला ‘ड’ जीवनसत्त्वांचा स्रोत म्हणजे मशरूम आणि अधिक पोषणद्रव्ये असलेले पदार्थ होय. या पदार्थांत जीवनसत्त्वाची गरज पूर्ण करण्यासाठी नैसर्गिकरीत्या नसलेल्या पोषकद्रव्यांची भर टाकली जाते. ‘ड’ जीवनसत्त्व असलेल्या वनस्पतींमध्ये ‘डी ३’ नव्हे, तर इरगोकॅल्सिफेरॉल किंवा ‘ड २’ हे जीवनसत्त्व असते. त्यामुळे, शाकाहारी व्यक्तींसमोर ‘ड’ जीवनसत्त्वांची भर टाकलेले पदार्थ खाणे, हाच पर्याय उरतो. प्राणिजन्य पदार्थांमधील ‘ड’ जीवनसत्त्व ‘ड ३’ म्हणून ओळखले जाते. ते रक्तातील ‘ड’ जीवनसत्त्वाची पातळी उंचावण्याच्या दृष्टीने अधिक सक्षम असते. मांसाहारी पदार्थामध्ये मासे हा त्याचा सर्वोत्तम स्रोत आहे. एकवेळच्या माशांच्या  आहारामुळे ‘ड’ जीवनसत्त्वाची दिवसभराची गरज भागू शकते. माशाव्यतिरिक्त एका मोठ्या अंड्यातूनही दिवसभराच्या गरजेच्या नऊ टक्के ‘ड’ जीवनसत्त्व मिळू शकते. त्याचप्रमाणे इंजेक्‍शन आणि गोळ्यांमधूनही ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज भागवता येते. डॉक्‍टर गरजेनुसार त्यांची शिफारस करू शकतात. शरीरातील ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज भागविण्यासाठी रोज सकाळी दहा ते तीस मिनिटांच्या सूर्यप्रकाशाची शिफारस केली जाते. यापेक्षा अधिकचा सूर्यप्रकाश किंवा दिवसाच्या इतर वेळेतील प्रखर सूर्यप्रकाश त्वचेच्या किंवा इतर समस्या निर्माण करू शकतो. जीवनसत्त्व अधिक झाल्यास…  या अवस्थेला ‘हायपरव्हिटॅमिनोसिस डी’ असे म्हटले जाते. सामान्यत: ही अवस्था सूर्यप्रकाश किंवा नैसर्गिक खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे निर्माण होत नाही. ही दुर्मीळ स्थिती असली तरी गंभीर आहे. खूप प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व घेतल्याने ती ओढवू शकते. सर्वसाधारणपणे ते औषधांच्या स्वरूपात घेतल्यावर असे घडते. अधिक प्रमाणातील ‘ड’ जीवनसत्त्वामुळे रक्तात कॅल्शियमची असामान्य वाढ होते. त्यामुळे हाडे, ऊती व इतर अवयवांवरही विपरीत परिणाम होतो. त्यातून हाडांचे नुकसान होण्यासह उच्च रक्तदाबाला निमंत्रण मिळू शकते. शिवाय वेळेवर उपचार न घेतल्यास मूत्रपिंडाचेही नुकसान होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *