ताज्या बातम्या

अमेरिका खंडाची माहिती


अमेरिका, दक्षिण: आकारमानाने जगातील चौथ्या क्रमांकाचे खंड. क्षेत्रफळ सु. १,७८,१७,५३० चौ.किमी. लोकसंख्या सु. १९ कोटी (१९७०). उ. अक्षांश १२ २८’ ते द. अक्षांश ५५ ५९’ आणि प. रेखांश ३४ ४७’ ते ८१ २०’. उत्तरेस कोलंबियामधील पॉइंट गायीनासपासून दक्षिणेस केप हॉर्न बेटापर्यंत त्याची लांबी सु. ७,६४५ किमी. आहे. मुख्य भूमीवरील अगदी दक्षिणेकडील ठिकाण फ्रोवर्ड केप (५३ ५४’ द.) हे मॅगेलनच्या सामुद्रधुनीवरील ब्रंझविक द्वीपकल्पावर आहे. पूर्वेस ब्राझीलमधील पेद्रास पॉइंट ते पश्चिमेस पेरूमधील पारीन्यास पॉइंटपर्यंत त्याची रुंदी सु. ५,१५० किमी. आहे. किनारा सु. ३९,८८५ किमी. लांब आहे. जगातील एकूण भूमीचा सु. आठवा हिस्सा या खंडाने व्यापलेला आहे. याचा सु. २/३ हून अधिक प्रदेश उष्णकटिबंधात आहे. उत्तरेस कॅरिबियन समुद्र, ईशान्येस व पूर्वेस अटलांटिक महासागर, दक्षिणेस अंटार्क्टिक समुद्र व पश्चिमेस पॅसिफिक महासागर आहे. सु. ६४ किमी. रुंदीच्या पनामा-संयोगभूमीने ते उत्तर अमेरिकेशी जोडले गेले आहे. या संयोगभूमीवरून आता अटलांटिक व पॅसिफिक महासागर जोडणारा पनामा कालवा झाला आहे. दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकापासून अंटार्क्टिका खंड सु. १,००० किमी. दूर आहे. या खंडात अर्जेंटिना, बोलिव्हिया, ब्राझील, चिली, कोलंबिया, एक्वादोर, गुयाना, पॅराग्वाय, पेरू, व्हेनेझुएला व यूरग्वाय ही ११ स्वतंत्र प्रजासत्ताक राष्ट्रे आणि फ्रेंच गियाना व डच गियाना किंवा सुरिनाम या दोन यूरोपीय वसाहती आहेत. हे खंड विषुववृत्ताजवळ सर्वांत रुंद असून दक्षिणेकडे अगदी निमुळते होत गेले आहे. एक्वादोरमधील कीटो व ॲमेझॉन नदींच्या मुखावरील मकॅपा यांच्या अगदी जवळून विषुववृत्त जाते. चिलीमधील आंतोफागास्ता व ब्राझीलमधील साऊँ पाउलू यांच्या अगदी जवळून मकरवृत्त जाते.

भूरचना : व्हेगेनरच्या खंड-विप्लव-मीमांसेप्रमाणे सु. वीस कोटी वर्षांपूर्वी उत्तर व दक्षिण अमेरिका खंडे युरेशिया व आफ्रिका खंडांपासून अलग होऊन पश्चिमेकडे वाहत गेली. दक्षिण अमेरिकेचा सर्वांत प्राचीन गाभ्याचा प्रदेश म्हणजे ब्राझीलचा ढालप्रदेश व गियानाचा उंच प्रदेश. त्यांच्या खाली कॅम्ब्रियनपूर्व नाइस व शिस्ट यांचा जटिल भाग असून तो काही ठिकाणी उघडा पडलेला आहे. काही ठिरकाणी त्यावर बहुशः पुराजीव महाकल्पातील गाळखडकांचे थर आहेत. या मूळच्या प्राचीन प्रदेशाचे क्षरण होऊन, शेजारच्या समुद्रात त्याची भर पडून, दक्षिण अमेरिकेचा बाकीचा भूप्रदेश बनला असावा व त्याचे अनेक वेळा उत्थान व अवपतन झाले असावे. गाळाचे प्रचंड थर त्यावर बसून खंडाचे आकारमान वाढत गेले असावे. या खंडाच्या पश्चिम व उत्तर भागात एक विस्तीर्ण भूद्रोणी होती. ती मध्यजीव महाकल्पात हजारो मी. जाडीच्या गाळाच्या थरांनी भरून गेली. या थरांच्या प्रचंड वजनामुळे क्रिटेशियस कालखंडात भूकवचात अस्थिरता निर्माण झाली. यामुळे थरांना वळ्या पडून मग त्या वर उचलल्या गेल्या. ही क्रिया सर्व तृतीययुगात चालू राहिली व अँडीज पर्वताची निर्मिती झाली. याच वेळी त्यात मधूनमधून शिलारस घुसला व विस्तृत प्रमाणावर ज्वालामुखीक्रिया झाली. आजही अँडीजमध्ये अनेक सुप्त व जिवंत ज्वालामुखी असून ज्वालामुखीक्रिया हे अँडीजचे एक वैशिष्ट्यच आहे. ब्राझील व पॅराग्वाय यांतील पाराना खोऱ्यासारख्या प्राचीन भागात ज्युरॅसिक काळात विस्तीर्ण भागावर लागोपाठ बॅसास्ट लाव्हारसाचे थर पसरून त्याखाली ती भूमी झाकली गेली. कार्बोनिफेरस व प्लेइस्टोसीन या दोन वेगवेगळ्या भूवैज्ञानिक काळात दक्षिण अमेरिकेत हिमानीक्रिया झालेली आहे. कार्बोनिफेरस काळात तिचे मुख्य केंद्र दक्षिण ब्राझीलमध्ये व प्लेइस्टोसीन काळात ते दक्षिण अँडीजमध्ये असावे.

भूवर्णन : दक्षिण अमेरिकेत पश्चिमेकडील उंच पर्वत, पूर्वेकडील कमी उंचीचा डोंगराळ प्रदेश आणि या दोहोंच्या दरम्यानची सखल मैदाने हे भूविशेष आहेत. स्वाभाविक रचनेच्या दृष्टीने दक्षिण अमेरिकेचे चार विभाग पडतात : (१) पॅसिफिक किनारपट्टी, (२) अँडीज पर्वत, (३) मध्यवर्ती मैदाने, (४) पूर्वेकडील डोंगराळ प्रदेश.

 

(१) पॅसिफिक किनारपट्टी : ही बहुतेक ८० किमी.पेक्षा कमी रुंद आहे. काही ठिकाणी तर ती केवळ आठ किमी. रुंद आहे. पूर्व किनाऱ्यापेक्षा हा पश्चिम किनारा अधिक तीव्र उताराचा आहे. ५ ते ३५ द.च्या दरम्यान या किनाऱ्याजवळ समुद्रबूड-जमीन तयार झालेली नाही. तो समुद्रकिनाऱ्याला समांतर असलेल्या खोल सागरी गर्तांपर्यंत एकदम उतरत जातो. २६ द. जवळ, किनाऱ्यापासून ८० किमी. दूर असलेल्या ‘रिचर्ड्स डीप’ची खोली ७,६०० मी. पेक्षा अधिक आहे. पॅटागोनियन द्वीपसमूहाच्या उत्तरेला पॅसिफिक किनारा जवळजवळ सरळच आहे. त्यावर नैसर्गिक बंदरे नाहीत. ४१ द. ते केप हॉर्न पर्यंतचा पॅसिफिक किनारा बेटे, खाड्या व फ्योर्ड यांनी भरलेला आहे. तो हिमानीक्रिया व अवपतन यांचा परिणाम होय. ४१ द. चे उत्तरेस समुद्र व अँडीज पर्वत यांमधील अंतर ६० ते ८० किमी. आहे. दक्षिण व मध्य चिलीत किनाऱ्याला समांतर असलेल्या एका दरीच्या पश्चिमेस एक किनारी पर्वत-रांग आहे. तिची उंची उत्तरेकडे वाढत जाते. उत्तरचिली- चा किनारा उंच, उभ्या कड्यांचा असून त्यांच्या मागे अंतर्गत द्रोणींची एक रांगच आहे. पेरू, एक्वादोर व कोलंबिया येथे किनारी पर्वत बहुतेक नाहीतच.

(२) अँडीज पर्वत : दक्षिण अमेरिकेच्या सर्व पश्चिम बाजूस किनाऱ्याला समांतर पसरलेली ही पर्वतश्रेणी जगातील सर्वांत अधिक लांबीची (७,२०० किमी.) आहे. हिमालयाशिवाय दुसरी कोणतीही पर्वतश्रेणी तिच्या- पेक्षा अधिक उंच नाही. तिच्यातील ५० हून अधिक शिखरे ६,००० मी.पेक्षा अधिक उंचीची आहेत. ॲकन्काग्वा (७,०३५ मी.) हे प. गोलार्घातील सर्वोच्च शिखर होय. काही शिखरे जिवंत ज्वालामुखींची तोंडेचे आहेत. भूकंपही वारंवार होतात. १९७० मधील भूकंपाने पेरूमध्ये खूपच नुकसान झाले. पुष्कळ दऱ्यांतून, विशेषतः दक्षिण भागात, हिमनद्या समुद्राकडे वाहत जातात. ही पर्वतश्रेणी बहुतेक भागात ३२५ किमी. पेक्षा रुंद नाही. बोलिव्हियात मात्र ती ७०० किमी.पेक्षाही रुंद आणि ३,८०० मी.पेक्षा उंच पठाराच्या स्वरूपाची आहे. चिलीत तिची रुंदी फक्त ३२ किमी. आहे. दक्षिणेकडे तिची एकच रांग आहे परंतु २८ द. अक्षवृत्ताच्या उत्तरेस तिची जटिल संहती तयार होते. पेरूमध्ये तिच्या पुष्कळ समांतर रांगा आहेत. एक्वादोरमध्ये दोन समांतर रांगा आहेत. कोलंबियात तीन रांगा पंख्यासारख्या पसरल्या आहेत त्यांतील दोन कॅरिबियन समुद्रापर्यंत जातात. सर्वांत पूर्वेकडील रांग उत्तर व्हेनेझुएलामधून त्रिनिदादमध्ये जाते. कोलंबिया व व्हेनेझुएलाचा बराच प्रदेश अँडीजच्या दऱ्याखोऱ्यांचाच आहे. हिमाच्छादित शिखरे, खडकांचे उभे कडे, दाट अरण्ययुक्त उतार, तृणयुक्त पठारे व दऱ्याखोरी अशी अँडीजची विविध वैशिष्ट्ये दिसून येतात.

(३) मध्यवर्ती मैदाने: द. अमेरिकेचा तीन पंचमांश भाग व्यापणारा हा प्रदेश अँडीजच्या पूर्वेस आहे. तो मुख्यतः खंडाच्या अंतर्भागातच आहे. फक्त ॲमेझॉनच्या मुखाजवळ व रीओ दे ला प्लाता जवळ किनाऱ्यालगत सखल प्रदेश आढळतात. सखल प्रदेशांची जास्तीत जास्त रुंदी अंतर्भागातच आढळते. कोलंबिया व व्हेनेझुएलामधील ओरिनोकोच्या खोऱ्यातील अँडीज पर्वत व गियानाचा उंच प्रदेश यांमधील सांरचनिक द्रोणी भागातील लानोझचे मैदान, ब्राझीलमधील ॲमेझॉन खोऱ्यातील सेल्व्हाची उष्णकटिबंधीय सखल वर्षावने, अर्जेंटिना व पॅराग्वायमधील ग्रान चाको हा अंशतः अरण्यांचा व झुडुपांचा प्रदेश आणि अर्जेंटिना व यूरग्वाय येथील शेतीचा आणि चराऊ कुरणांचा पँपास प्रदेश असे याचे चार ठळक विभाग पडतात. अँडीजची विलक्षण झीज करणाऱ्या प्रवाहांनी आणून टाकलेल्या जलोढ गाळाच्या भरींमुळे ओरिनोको नदी लानोझच्या मध्यभागातून न वाहता गियाना उंच प्रदेशाच्या पायथ्याजवळून वाहते. ॲमेझॉन खोऱ्याचा उतार फारच सौम्य आहे. मुखापासून मानाऊसचे हवाई अंतर ५०० किमी. असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची फक्त सु. ४० मी. आहे. मुखापासून २,७३५ किमी. दूर असलेल्या ईकीटॉसची उंची फक्त सु. १०७ मी. आहे. तथापि मोठ्या प्रवाहांच्या पूररेषेपेक्षा बहुतेक भाग उंच असल्यामुळे सर्व भाग पूरव्याप्त होत नाहीत. ॲमेझॉन खोऱ्याच्या सर्वांत रुंद भागातून उत्तरेस ओरिनोकोच्या द्रोणी प्रदेशात किंवा दक्षिणेस पॅराग्वायच्या खोऱ्यात फक्त सु. ३०० मी. उंचीचा जलविभाजक प्रदेश ओलांडून जाता येतो. पाराना-पॅराग्वाय भूद्रोणीची सुरुवात उत्तरेस माटू ग्रोसूच्या पश्चिम भागातील मोठ्या दलदलीच्या प्रदेशाने व बोलिव्हिया, पॅराग्वाय आणि अर्जेंटिनाच्या ग्रान चाकोने होते. ग्रान चाको पँपासमध्ये विलीन होते व माटू ग्रोसूच्या दलदलीसारखाच दुसरा प्रदेश अर्जेंटिनाच्या मेसोपोटेमियात दिसतो.

(४) पूर्वेकडील डोंगराळ प्रदेश: हा अँडीजपेक्षा पुष्कळच कमी उंचीचा आहे. गियानाचा उंच प्रदेश, ब्राझीलचा उंच प्रदेश व पॅटागोनियाचे पठार असे याचे तीन भाग पडतात. गियानाचा उंच प्रदेश सु. १,५२५ मी. उंच आहे. त्यावरून वाहणाऱ्या प्रवाहांवर उंच धबधबे व द्रुतवाह तयार झालेले आहेत. गुयाना, व्हेनेझुएला व ब्राझील यांच्या सीमेवरील मौंट रॉराइमा २,८५० मी. उंच असून गियाना उंच प्रदेशातील सर्वोच्च ठिकाण आहे. ब्राझीलच्या उंच प्रदेशातील सर्वोच्च प्रदेश पिको द बांदीरा हा टेबललँड व ऊर्मिल टेकड्यांनी युक्त असून त्याचा उतार किनाऱ्याच्या विरुद्ध बाजूला आहे. येथील स्फटिकी खडकांना पुष्कळ पावसाच्या भागात विदारणामुळे वैशिष्ट्यपूर्ण घुमटांसारखा आकार आला आहे. उदा., रीओ दे जानेरोजवळचा ‘शुगर लोफ’ डोंगर. पॅटागोनिया ही ओसाड पठारांची एक मालिकाच आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे वालुकाश्माचे समांतर थर व मधूनमधून सर्वत्र पसरलेले लाव्हारसाचे उंच भाग.

 पूर्व किनारा : हा पश्चिम किनाऱ्याहून पुष्कळसा भिन्न आहे. केप साऊँ रॉके व रीओ ग्रँडे डो सूल यांच्या दरम्यान किनारा ब्राझील पठाराच्या कडेच्या अनुरोधाने जातो. या भागात रेसीफे, सॅल्व्हादॉर, व्हितोरिया, रीओ दे जानेरो, फ्लोरिआनोपोलिस इ. जगातील काही सुंदर नैसर्गिक बंदरे आहेत. त्याच्या दक्षिणेस रीओ दे ला प्लाता हे दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावरील सर्वांत मोठे खाडीमुख आहे. पाराना-यूरग्वाय नदीसंहतीची समुद्रात बाहेर पडण्याची ती वाट आहे. त्याच्या उत्तर तीरावर माँटेव्हिडिओ व दक्षिण तीरावर ब्वेनस एअरीझ ही बंदरे आहेत. पॅटागोनियाच्या किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे नाहीत, उपसागर आहेत परंतु उथळ पाणी, किनाऱ्यावरील उभे कडे व मोठी भारती-ओहटी यांमुळे ते फारसे उपयुक्त नाहीत.

बेटे :पूर्व किनाऱ्याजवळ बेटे कमी आहेत. व्हेनेझुएलाजवळ त्रिनिदाद व ॲमेझॉनच्या मुखाजवळ माराझो यांशिवाय बहुतेक सर्व लहान आहेत. त्रिनिदाद पारीआच्या आखाताने मुख्य भूमीपासून अलग झाले असून तेथील पर्वतरांग व्हेनेझुएलातील कुमाना रांगेचाच पुढचा भाग आहे. या बेटाच्या दक्षिण भागात जगातील प्रसिद्ध ॲस्फाल्टचे सरोवर आहे. त्रिनिदादच्या पश्चिमेस व उत्तरेस व्यापारी व ऐतिहासिक महत्त्वाची टोबॅगो, मार्गारीटा, टॉर्टुगा व कुरासाऊँ द्वीपसमूह इ. पुष्कळ लहान-लहान बेटे आहेत. केप साऊँ रॉकेपासून सु. ३७० किमी. वरील फर्‌नँदो द नरोन्या या ज्वालामुखी-द्वीपसमूहापैकी मुख्य बेटाचे क्षेत्रफळ  अवघे १८ चौ. किमी. आहे. मुख्य भूमी व हे बेट यांमध्ये सु. ४,००० मी. खोलीची खाडी असली, तरी ते खरोखर खंडाच्या जलमग्न कोपऱ्यावरच उभे आहे. फॉकलंड बेटेही (५१ द.) समुद्रबूड जमिनीवरच उभी आहेत. तेथील प्राणी व वनस्पती यांवरून ती केव्हातरी मुख्य भूमीचाच भाग होती हे दिसून येते. पश्चिम किनाऱ्याजवळ व्हॅलपारेझोच्या पश्चिमेस वान फर्नांदेझ, पेरूच्या मुख्य भूमीजवळ ग्वानो बेटे, विषुववृत्तावर गालॅपागस बेटे व ग्वायाकीलजवळ ग्वायास नदीच्या त्रिभुजप्रदेशाची बेटे आहेत. टिएरा डेल फ्यूगो हा भाग मुख्य भूमीच्या दक्षिण टोकापासून मॅगेलनच्या सामुद्रधुनीने अलग झालेला आहे.


मृदा : अर्जेंटिना व यूरग्वाय देशांतील पँपासमध्ये वाऱ्याने व पाण्याने वाहून आणलेल्या मातीचे प्रेअरी मृदा हजारो चौ. किमी. क्षेत्रावर पसरलेली आहे. ही जगातील एक अत्युत्कृष्ट शेतजमीन आहे. अँडीजच्या दऱ्या, चिलीची किनाऱ्याला समांतर असलेली दरी, पश्चिम किनाऱ्यावरील दऱ्याखोरी, एक्वादोरचा ग्वायास सखल प्रदेश, कोलंबियातील कौका नदीचे खोरे या भागांतील जमीनही अशीच सुपीक आहे. पारानाच्या खोऱ्यात बॅसाल्ट खडकांच्या विदारणाने तयार झालेल्या टेरारोझा नावाच्या तांबूस जांभळ्या रंगाच्या समृद्ध मृदेचे जाड थर आहेत. ही जमीन व कोलंबियातील ज्वालामुखीजन्य जमीन कॉफीच्या उत्पादनाला विशेष चांगली आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यात काही ठिकाणी सुपीक जमीन आहे, परंतु ती पुराच्या वेळी पाण्याखाली जाते बाकी बहुतेक सर्व जमीन निकृष्ट प्रकारची आहे. अतिशय पावसामुळे तिच्यातील क्षार वाहून जातात किंवा खालच्या थरात मुरतात. नापीकपणा व अतिअम्‍लता यांमुळे अशी जमीन शेतीला जेमतेमच उपयोगी ठरते. चुना किंवा खते यांच्या साहाय्याने ती फारशी सुधारताही येत नाही.

खनिजे: दक्षिण अमेरिकेत पेट्रोलियम भरपूर आहे. सु. १/४ जमिनीखाली गाळाचे थर असून त्यात तेलयुक्त थर असणे शक्य आहे. १९६५ पर्यंत अँडीजपासून सु. ५०० किमी. दूरवरच्या, अँडीजच्या फाट्यांदरम्यानच्या खोलगट भागात, मुख्यतः कॅरिबियनच्या परिसरात काही ठिकाणी तेल काढले जात असे. १९६३ च्या अखेरीस व्हेनेझुएलामध्ये माराकीबोच्या आखातात दक्षिण अमेरिकेतील सर्वांत मोठा तेलसाठा असल्याचे सिद्ध झाले होते. पश्चिम गोलार्धात त्याचा क्रमांक अमेरिकेच्या खालोखाल दुसरा व जगात अमेरिका, मध्यपूर्वेतील चार देश व रशिया यांच्या खालोखाल सातवा होता. अर्जेंटिना, पेरू, कोलंबिया व बोलिव्हिया या देशांतही तेलाचे मोठे साठे आहेत. नैसर्गिक वायूही आहे, परंतु तो लोकवस्तीच्या केंद्रांपासून दूर सापडत असल्यामुळे त्याच्या उपयोग होत नव्हता. आता व्हेनेझुएलामध्ये त्याचा वापर होऊ लागला आहे. त्याचा अधिक उपयोग पॅटागोनियातील कोमोदोरो रिव्हादाव्हिया क्षेत्रापासून १,६०० किमी. लांबीच्या नळांनी आणल्यामुळे ब्वेनस एअरीझच्या वाढत्या वस्तीला होत आहे. दक्षिण अमेरिकेत कोळसा मात्र कमी मिळतो. अँडीजमध्ये काही ठिकाणी आणि कोलंबिया, चिली व ब्राझील येथे कोळशाचे थोडे उत्पादन होते. ब्राझीलच्या कोळशाला राख फार असल्यामुळे तो दुसऱ्या, आयात केलेल्या चांगल्या कोळशाशी मिसळून वापरावा लागतो. गियानाचा उंच प्रदेश आणि ब्राझीलचा ढालप्रदेश या प्राचीन खडकांच्या भागांत मात्र लोखंडाचा फार मोठा साठा आहे. तेथे उच्च दर्जाच्या लोहधातुकाची विस्तीर्ण क्षेत्रे आढळली असून ते पृष्ठभागाखाली जवळच आणि उघड्या खाणींतून सहज प्राप्त होण्याजोगे आहे. संयुक्त संस्थानांच्या भांडवलामुळे व्हेनेझुएलामधील लोखंडाचे उत्पादन १९५३–६० या काळात एकदम वाढले परंतु नंतर अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे ते कमी झाले. ओरिनोकोची उपनदी कारोनी हिच्या खोऱ्यात लोखंडाच्या खाणी आहेत. जलवाहतुकीच्या सोयीमुळे ते स्वस्त पडते. ब्राझीलमधील लोखंडाचे साठे मोठे असूनही जलवाहतुकीच्या दृष्टीने सोयीच्या ठिकाणी नाहीत. ते मीनाझेअराइस प्रदेशाच्या अंतर्भागात आहेत. चिली आणि पेरू देशांत भूवैज्ञानिक दृष्ट्या अलीकडील काळात तयार झालेल्या अँडीज पर्वताच्या मध्य रांगांत तांबे सापडते. उत्तर अमेरिका व मध्य आफ्रिका येथील खाणींच्या खालोखाल येथील खाणींचा क्रमांक आहे. बोलिव्हियात पूर्वी चांदी सापडत असे. तेथे आता कथिलाच्या खाणी आहेत. तेथे पश्चिम गोलार्धातील सर्वांत मोठा कथिलाचा साठा असून खाणी अँडीजच्या उंच भागात आहेत. आग्नेय आशिया व विषुववृत्तीय आफ्रिकेच्या खालोखाल त्यांचा क्रमांक लागतो. ब्राझीलमधील माटूग्रोसूच्या नैर्ऋत्य भागात जगातील सर्वांत मोठ्या मँगॅनीजच्या साठ्यांपैकी एक साठा आहे. यांपेक्षा लहान पण सहज उपलब्ध साठा ॲमेझॉनच्या मुखाच्या उत्तरेस ॲमापा येथे आहे. रशिया व भारत यांच्या बरोबरीने जगातील मँगॅनीजचा उत्पादक म्हणून ब्राझीलची गणना होते. याशिवाय गियाना व त्याशेजारच्या ब्राझीलच्या भागात बॉक्साइट, कोलंबियात प्लॅटिनम, पेरू व बोलिव्हिया येथे थोडीफार चांदी आणि चिलीमध्ये नायट्रेट ही खनिजे मिळतात.

नद्या, सरोवरे, धबधबे इ.: दक्षिण अमेरिकेत पाच मोठ्या नदी-संहती आहेत : ॲमेझॉन, रीओ दे ला प्लाता, मॅग्डालीना-कौका, ओरिनोको व साऊँ फ्रँसीश्‌कू. ॲमेझॉन, ओरिनोको व ला प्लाता (पाराना, पॅराग्वाय, यूरग्वाय) यांचे बहुतेक सर्व जलवाहनक्षेत्र सखल प्रदेशातच आहे. ॲमेझॉन व ओरिनोको यांच्या उगमाकडील प्रवाह अँडीजमधून येतात. तेथे त्यांनी खोल दऱ्या बनविल्या आहेत. ला प्लाताचे उगमप्रवाह ब्राझीलच्या उंच प्रदेशात आहेत. या तीन नद्या मिळून सु. ९६ लक्ष चौ. किमी. क्षेत्राचे जलनिःसारण करतात. एकट्या ॲमेझॉनचे जलनिःसारणक्षेत्र सु. ७० लक्ष चौ. किमी. आहे. ती पेरूधील अँडीजमध्ये उगम पावून अटलांटिक महासागरास मिळते. तिच्या उगमापासून अँडीजच्या दुसर्‍या बाजूस फक्त १६० किमी. अंतरावर पॅसिफिक महासागर आहे. ही नाईलच्या खालोखाल लांब असून बाकी सर्व दृष्टींनी ती जगातील सर्वांत मोठी नदी आहे. मुखापासून ३,७०० किमी, अंतरावरील ईकीटॉसपर्यंत ही नदी सागरगामी नौकांसही उपयोगी आहे. हिच्या बऱ्याच उपनद्या १,६०० किमी.हून अधिक लांबीच्या आहेत. उत्तरेकडून रीओ नेग्रो व दक्षिणेकडून झूर्वा, पुरूस, मादीरा, तापाझोस, शिंगू, टोकँटिन्स या महत्त्वाच्या उपनद्या तिला मिळतात. दक्षिण व्हेनेझुएलाची नदी कासीक्यारे हिने ॲमेझॉन नदीसंहती ओरिनोको नदीसंहतीशी जोडलेली आहे. ओरिनोको ही अँडीजमध्ये उगम पावून २,५६० किमी. वाहत जाऊन अटलांटिक महासागराला मिळते. ती कोलंबिया व व्हेनेझुएलाच्या द्रोणीप्रदेशातील लानोझ या सखल मैदानी तृणप्रदेशातून वाहते. तिला ग्वाव्ह्यारे, मेटा, कारोनी या प्रमुख उपनद्या मिळतात. एस्क्वीबो ही सु. ९६० किमी. लांबीची उत्तरवाहिनी नदी गुयानाची मुख्य नदी आहे. मॅग्डालीना व तिची प्रमुख उपनदी कौका या कोलंबियातील अँडीजच्या उंच रांगांमधून वाहत जाऊन कॅरिबियन समुद्राला मिळतात. कोलंबियाचा बराच व्यापार या नद्यांमार्गे चालतो. पाराना ब्राझीलमध्ये उगम पावून सु. ३,९५० किमी. दक्षिणेकडे वाहत जाऊन अटलांटिक महासागरास मिळते. तिची प्रमुख उपनदी पॅराग्वाय ही २,४०० किमी. लांब आहे. यूरग्वाय ही ब्राझीलमध्ये आग्नेय डोंगराळ भागात उगम पावलेली नदी १,६०० किमी. वाहत येऊन पारानाला मुखाजवळ मिळते. तेथे रीओ दे ला प्लाता ही विस्तीर्ण खाडी तयार झाली आहे. ला प्लाता किंवा पाराना–पॅराग्वाय संहतीतून दक्षिण अमेरिकेच्या मध्यमैदानाच्या फार मोठ्या भागाचे जलनिःसारण होते व त्या भागाचा व्यापार या संहतीतून चालतो. ही नदीसंहती ॲमेझॉनसंहतीच्या खालोखाल विस्ताराची आहे परंतु तिच्यापेक्षा व्यापारी दृष्ट्या अधिक उपयोगी आहे. म्हणूनच अर्जेंटिना, बोलिव्हिया, ब्राझील, पॅराग्वाय व यूरग्वाय ह्या देशांनी १९७० मध्ये एक करार करून या नदीसंहतीच्या विकासात सहभागी होण्याचे ठरविले आहे. पील्कोमायो, ईग्वास, बर्मेहो, सालादो इ. अनेक उपनद्या या सहंतीत आहेत. साऊँ फ्रँसीश्कू ही पूर्व ब्राझीलची प्रमुख नदी सु. २,९०० किमी. लांबीची असून तिच्या उप- नद्यांसह ती दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन व पाराना यांच्या खालोखाल मोठ्या क्षेत्राचे जलवाहन करते. तिच्यावर द्रुतवाह व धबधबे असले, तरी ते टाळून ब्राझीलमध्ये अंतर्भागात जाण्यास ती उपयोगी आहे. दक्षिण अर्जेंटिनात कोलोरॅडो, नीग्रो व चुबुत या पूर्ववाहिनी नद्या आहेत. पश्चिम किनारपट्टीवर अँडीजवरून येणारे प्रवाह पुष्कळ असले तरी मोठी अशी नदी नाही.

दक्षिण अमेरिकेत मोठी अशी सरोवरे थोडीच आहेत. व्हेनेझुएलाचे माराकायव्हो हे सर्वांत मोठे सु. १६,३०० चौ.किमी. विस्ताराचे आहे परंतु वास्तविक ते अरुंद तोंडाचे कॅरिबियनचे आखातच आहे. त्याचे पाणी मचूळ आहे. पेरू व बोलिव्हियामधील ८,२८८ चौ.किमी. विस्ताराचे तितिकाका हे जगातील सर्वांत अधिक उंचीवरील (३,८०२ मी.) सरोवरे असून त्यावर आगबोटी चालतात. पोओपो या बोलिव्हियातील २,५१२ चौ. किमी. विस्ताराच्या सरोवरात तितिकाकाचे पाणी येते. अँडीजच्या पूर्व पायथ्याशी हिमानीक्रियेमुळे झालेली सरोवरे आहेत. ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्यावरील मीरीं हे खारकच्छ आहे. ते लॅगोआ डास पॅटॉस या उत्तरेकडील खारकच्छाशी कालव्याने जोडलेले आहे.

दक्षिण अमेरिकेत धबधबे पुष्कळ आहेत. व्हेनेझुएलातील कारोनी नदीवरील एंजेल धबधबा सु. ९८० मी. उंचीवरून सरळ खाली पडतो. अशा प्रकारचा हा जगातील सर्वांत उंच धबधबा आहे. गुयाना–व्हेनेझुएला सीमेवरील कूकनाम व व्हेनेझुएला–गुयाना–ब्राझील सीमेवरील रॉराइमा हे प्रत्येकी सु. ६१० मी. उंचीवरून खाली येतात. साऊँ फ्रँसीश्कू नदीवर पॉलोआफॉन्सो, ब्राझील–अर्जेंटिना सीमेवरील ईग्वासू हे व इतर पुष्कळ धबधबे आहेत. नद्यांवर द्रुतवाह पुष्कळ ठिकाणी आढळतात.

हवामान: दक्षिण अमेरिकेत कोणत्याच भागात अतिउष्ण व अतिथंड हवामान आढळत नाही. फक्त अँडीज पर्वताच्या उंच शिखरांवरच काय ते नेहमी बर्फ असते. आशिया व संयुक्त संस्थानांच्या मानाने येथील हिवाळा व उन्हाळा सौम्य असतो.

ॲमेझॉन-खोऱ्यातून विषुववृत्त जात असले, तरी तेथे वार्षिक सरासरी तपमान फक्त २७ से. असते. त्यात ऋतूंप्रमाणे फारसा फरक पडत नाही. एक्वादोरची राजधानी कीटो विषुववृत्ताच्या दक्षिणेस फक्त २४ किमी.वर आहे. त्याची उंची २,८५० मी. असून त्याचे प्रत्येक महिन्याचे सरासरी तपमान सु. १३ से. असते. वार्षिक सरासरी तपमानकक्षा अक्षांशाबरोबर वाढते. ईशान्य पॅटागोनियात ती सर्वांत जास्त, १८ से. असते. टिएरा डेल फ्यूगो, पॅटागोनिया, मध्यचिलीचा दक्षिण भाग, अर्जेंटिनातील पँपास या भागांत काही ठिकाणी

हिवाळ्यात तपमान ०० से.पर्यंत उतरते. ब्राझीलच्या पठारावर ३०० ते ६०० मी. उंचीवर ०० से.पर्यंत येते. पॅसिफिकमधील हंबोल्ट किंवा पेरू हा उत्तरेकडे जाणारा थंड प्रवाह असून तो किनाऱ्यापासून दूर जातो, तेव्हा सागरतळाचे थंड पाणी वर येते त्यामुळे पॅसिफिक किनाऱ्यावर विषुववृत्तापर्यंतही हवामान थंड राहते. फॉकलंड-प्रवाहामुळे अर्जेंटिनाचा किनारा थंड राहतो. इतरत्र किनाऱ्याजवळ ऊबदार पाणी असते. दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह ब्राझीलच्या पूर्वेकडील केप सांऊ रॉकेमुळे दुभंगतो. दक्षिणेकडे ब्राझील प्रवाह हा ऊबदार प्रवाह जातो व उत्तरेकडे किनाऱ्याकिनाऱ्याने कॅरिबियनपर्यंत ऊबदार पाणी वाहते. विषुववृत्तीय प्रतिप्रवाहामुळे पश्चिम कोलंबिया व एक्वादोर यांच्या किनाऱ्याजवळचे पाणी ऊबदार असते. अर्जेंटिनाच्या ग्रान चाकोमध्ये सर्वांत जास्त तपमान आढळते. तेथे वर्षातून एकदा तरी ते ४३-४४० से.पर्यंत जाते. दक्षिण अमेरिकेच्या अँडीजच्या पूर्वेकडील उष्णकटिबंधीय भागास अटलांटिकवरून ईशान्य, पूर्व व आग्नेय दिशांनी येणारे आर्द्र वारे वर्षभर पाऊस देतात. हा पाऊस बहुधा अभिसरण पर्जन्य असतो. ॲमेझॉन खोऱ्याच्या मुखाकडील भागात २२५ ते ३०० सेंमी. पाऊस पडतो. वरच्या, उगमाकडील भागातही २२५ सेंमी. किंवा काही ठिकाणी ३७५ सेंमी.सुद्धा पाऊस पडतो. मध्य खोऱ्यात मात्र तो १५०–१७५ सेंमी. इतकाच असतो. गियानाच्या किनाऱ्यावर- ही वर्षभर सु. २५० सेंमी. पाऊस पडतो. ब्राझीलच्या दक्षिण पठारी भागात–विशेषतः अंतर्भागात–पाऊस बराच कमी पडतो. क्वचित अवर्षणही येते. लानोझ व गियानाचा उंच प्रदेश येथे ५० ते १५० सेंमी. पर्यंत पाऊस पडतो. वायव्य भागात पावसाचे प्रमाण वर्षातून दोनदा वाढते. कोलंबिया व एक्वादोर यांच्या पॅसिफिक किनाऱ्यावर सु. २०० सेंमी. पाऊस पडतो. ग्वायाकील आखातापासून दक्षिणेकडे पेरू व उत्तर चिलीचा रूक्ष प्रदेश लागतो. येथील आटाकामा वाळवंट हे जगातील अत्यंत कोरड्या भागांपैकी एक आहे. हंबोल्ट थंड प्रवाहामुळे तपमान सौम्य झाले, तरी पाऊस पडण्यास प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. किनाऱ्यावरील ईकीक येथे सबंध वर्षात फक्त ०·१३ सेंमी. पाऊस पडतो. अंतर्भागातील कित्येक ठिकाणी वीस वीस वर्षांत पावसाची नोंद होत नाही. ३३० द. अक्षांशाच्या दक्षिणेस पश्चिम किनाऱ्यावर पावसाचे प्रमाण दक्षिणेकडे ५० ते २०० सेंमी. पर्यंत वाढत जाते. पश्चिमेकडून येणाऱ्या आवर्तांमुळे मध्य व दक्षिण चिलीत वादळी पाऊस हे वैशिष्ट्य झाले आहे. दक्षिण-मध्य चिलीतील व्हॅल्डीव्हिया येथे २७५ सेंमी. पाऊस पडतो. दक्षिणेकडील फ्योर्ड किनाऱ्यावर पावसाचे प्रमाण याहीपेक्षा जास्त आहे. अर्जेंटिनातील पॅटागोनिया अँडीजच्या पर्जन्यछायेत आहे. तो बहुतेक स्टेप प्रदेशासारखा व काही ठिकाणी मरुभूमीसारखा आहे. अर्जेंटिना, यूरग्वाय, दक्षिण ब्राझील येथील पँपास व इतर तृणक्षेत्रांत ६० ते १३५ सेंमी. पाऊस पडतो. तो वर्षभर समप्रमाणात पडतो. पॅराग्वायच्या पूर्व भागात १२५ ते १९० सेंमी. पाऊस पडतो. परंतु चाको विभागात फक्त ५० ते १०० सेंमी. पडतो. तो उन्हाळ्यात पडतो.

वनस्पती: सर्वांत मोठा आणि सलग वनस्पतिप्रदेश म्हणजे ॲमेझॉनचे खोरे व त्याला लागून असलेल्या गियानाचा व पूर्वमध्य ब्राझीलचा किनारा. येथे वनस्पतींची वाढ फार दाटीवाटीने होते. प्रकाश मिळविण्यासाठी झाडे उंच उंच वाढतात, त्या मानाने त्यांची खोडे फार जाडीची नसतात. दाट वेली, बांडगुळे व दुसऱ्या झाडांवर वाढणाऱ्या परंतु त्यांचा जीवरस न शोषणाऱ्या अशा वनस्पती इ. वैशिष्ट्ये या वर्षावनांत आढळतात. येथे वनस्पतींच्या हजारो जाती असून त्यांची व ऑर्किड्स वगैरेंची संपूर्ण गणना अद्याप झालेली नाही. येथे ५० मी. उंच वाढणारे ब्राझील नटचे झाड, उंच नेचे, रबराच्या झाडाच्या अनेक जाती, मॉहॉगनी, एबनी, रोजवुड, ग्रीनहार्ट इ. अनेक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहेत. ही अरण्ये सदाहरित असून या प्रदेशाला ‘सेल्व्हा’ असे नाव आहे. या वर्षावनांपेक्षा विरळ, निमपानझडी प्रकारची उष्णकटिबंधीय अरण्ये गियाना उंच प्रदेशाच्या व्हेनेझुएलाच्या भागात व मध्य आणि दक्षिण ब्राझीलमध्ये काही ठिकाणी आढळतात. उष्णकटिबंधीय उंच प्रदेशातील अरण्ये अँडीजच्या पूर्व उतारावर २० द.च्या उत्तरेस आढळतात. कच्छ वनश्री ग्वायाकील आखातापासून उत्तरेकडून जवळजवळ रीओ दे जानेरोपर्यंतच्या किनाऱ्यावर ऊबदार पाण्याच्या भागात आहे. ब्राझीलमधील मारान्यान विभागात ताडवृक्षांचे जंगल आहे. आरौकारिया या मऊ लाकडाच्या सूचिपर्णी वृक्षांचे अरण्य दक्षिण ब्राझीलमधील लाकूडतोड व कागदासाठी लगदा तयार करण्याच्या धंद्याचा आधार आहे. दक्षिण चिलीमध्ये मधूनमधून आरौकारिया वृक्ष असलेली पानझडी वृक्षांची विस्तीर्ण अरण्ये आहेत. विरळ झाडे, झुडपे व गवत यांची उपवने कमी पावसाच्या व पावसाचे प्रमाण कमीअधिक होणाऱ्या प्रदेशात आहेत. कँपोज सेराडोज म्हणून ओळखली जाणारी निमपानझडी वृक्षांची वने हे मध्य ब्राझीलचे वैशिष्ट्य आहे. ईशान्य ब्राझील, चाको, अगदी उत्तरेकडील कोलंबिया व व्हेनेझुएला येथे काटेरी झुडपे आहेत. पॅराग्वाय नदीवरील चाकोच्या पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशात वनस्थली आढळते. अंतराअंतरावरील झाडांच्या दरम्यान झुडपे व गवत यांमुळे तेथील वनश्री मोठी आकर्षक दिसते. पेरूच्या किनारी मरुभूमीच्या मागील अँडीज पायथ्याच्या भागात, मध्य चिलीत, अर्जेंटाईन पँपासचा पश्चिम भाग व पूर्व पॅटागोनिया येथे मुख्यतः लहान झुडपे आहेत. लानोझमध्ये, गियानाच्या किनारपट्टीतील कच्छ वनश्री-बनांच्या पाठीमागील भागात, ब्राझीलच्या अगदी उत्तरेकडच्या गियाना उंच प्रदेशात, ॲमेझॉनच्या मुखाजवळील माराझो बेटाच्या उत्तर व मध्य भागांत उष्णकटिबंधीय तृणप्रदेश ‘सॅव्हाना’ आढळतो. ॲमेझॉनच्या दक्षिणेस सॅव्हाना क्वचितच आहे परंतु ताड व गवतयुक्त दलदलीचे प्रदेश मात्र आहेत. दक्षिण ब्राझील, यूरग्वाय व अर्जेंटिनाचे पँपास येथे समशीतोष्ण कटिबंधीय प्रेअरी प्रकारचा तृणप्रदेश आढळतो. दक्षिण ब्राझीलमध्ये काही उंच भागात व पेरूच्या अँडीज-भागातही असा प्रदेश आहे. अँडीजच्या उंच भागात अल्पाईन प्रकारचे गवत आढळते. पेरू व बोलिव्हियाच्या उंच प्रदेशांत प्युना प्रकारचे गवत आहे. पेरू व उत्तर चिलीच्या कोरड्या आटाकामा वाळवंटात वनस्पती जवळजवळ नाहीतच. परंतु येथे कॅक्टसचे अनेक प्रकार आढळतात. यांशिवाय कपोक, कॅनन बॉल, क्रॅबवुड, पनामाहॅट ताड, कारनाउबा ताड (वंगण व पॉलीश यांस उपयुक्त), बालसा (अत्यंत हलके लाकूड), ॲव्होकॅडो (आंब्यासारखे लोकप्रिय फळ), सिंकोना, माटे, क्वेब्राचो (कठीण लाकूड, टॅनीन), या दक्षिण अमेरिकेतील काही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहेत. दाट लोकवस्तीचे प्रदेश, शेतीचे प्रदेश व मुद्दाम वाढविलेले कुरणप्रदेश यांमधील मूळच्या वनस्पती नाहीशा झाल्या आहेत.


 प्राणी: तापीर, जग्वार, आर्माडिलो, जायंट अँटईटर, स्लॉथ, कॅपीबारा इ. प्राण्यांखेरीज एग्रेट, फ्लॅमिंगो, हमिंगबर्ड, पोपट, करकोचा, टुकॉन हे पक्षी व अनाकोंडा साप, बोआ कॉन्स्ट्रिक्टर (अजगर), पिरान्हा (पशू, माणसे यांनाही फस्त करणारा मासा), कॉक ऑफ द रॉक, यापाक, व्हॅम्पायर बॅट, ब्लॅक कायमॉन, कुरास्सो, इग्वाना, चिंचीला (अत्यंत मऊ लव असलेला बिळवासी प्राणी), सॅपाज् माकड, लामा व अल्पाका (उंटाच्या जातीचे, आता ओझ्यासाठी वापरले जाणारे), मॅनाटी (शाकाहारी जलचर), बुशडॉग, साळिंदर, कोआटी, चष्मावाले अस्वल, काँडॉर (प्रचंड पक्षी), आयबिस, मार्मोसेट, आयाळवाला लांडगा, पेक्करी, व्हिकूना (दाट मऊ लोकर असलेला), बुश मास्टर (सर्प), कॉयपू घूस, शहामृगासारखा र्‍ही, बारशिंगा हरिण, ह्युमुल हरिण, ग्वानाको, प्यूमा, कॅव्ही, पेंग्विन, राक्षसी कासव, सुसरी, मगरी हे येथील काही प्राणी आहेत. गाई, बैल, घोडे, मेंढ्या हे येथे मूळचे नाहीत ते मुद्दाम आणले गेले. त्यांतील काही पळून जाऊन रानटी बनले. येथील विस्तीर्ण तृणप्रदेशात त्यांची चांगली वाढ झाली. दक्षिण अमेरिकेतील काही प्राणी इतर खंडांत आढळत नाहीत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *