युरोप खंडातील माहिती

0
89
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

यूरोप : ऑस्ट्रेलिया वगळता जगातील सर्वांत लहान आकाराचे खंड. क्षेत्रफळ १,०५,२२,६०० चौ. किमी. लोकसंख्या ४,८२० लक्ष (१९७९ अंदाज). जगाच्या एकूण भूक्षेत्रापैकी केवळ ७.७% भूक्षेत्र यूरोप खंडाने व्यापले असून, जगाच्या लोकसंख्येपैकी ११% लोकसंख्या या खंडात आहे. यूरोप खंडाच्या उत्तरेस आर्क्टिक महासागर, पश्चिमेस अटलांटिक महासागर, दक्षिणेस भूमध्य समुद्र, काळा समुद्र व कॉकेशस पर्वत असून, पूर्वेकडील सीमा रशियातील उरल पर्वत, उरल नदी व कॅस्पियन समुद्र ह्यांनी सीमित केलेली आहे. नॉर्वेमधील सर्वांत उत्तरेकडील उत्तर भूशिर (अक्षांश ७१° १०’ २०” उत्तर) हा मुख्य खंडाचा सर्वांत उत्तरेकडील बिंदू, तर स्पेनमधील दक्षिणेकडील तरीफा भूशिर (अक्षांश ३६° ०१’ उ.) हा सर्वांत दक्षिणेकडील बिंदू आहे. पोर्तुगालमधील रोका भूशिर (रेखांश ९° ३०’ पश्चिम) हा यूरोपच्या मुख्य भूमीवरील सर्वांत पश्चिमेकडील भाग आहे. यूरोप खंडात समाविष्ट होणारी बेटे मात्र या सीमांच्याही बाहेर असलेली आढळतात. स्वालबार बेटे तर ८०° उ. अक्षांशाच्याही उत्तरेकडे आहेत. ग्रीसच्या दक्षिण टोकापासून ते नॉर्वेच्या उत्तर टोकापर्यंतचे अंतर ३,९०० किमी. असून पोर्तुगालच्या नैर्ऋत्य टोकापासून उरल पर्वताच्या दक्षिण टोकापर्यंतची खंडाची लांबी ५,३०० किमी. आहे.

अल्बेनिया, अँडोरा, आइसलँड, आयर्लंड, ऑस्ट्रिया, इटली, ग्रीस, ग्रेट ब्रिटन, चेकोस्लोव्हाकिया, डेन्मार्क, तुर्कस्तान (काही भाग), नॉर्वे, नेदर्लंड्‌स, पश्चिम जर्मनी, पूर्व जर्मनी, पोर्तुगाल, पोलंड, फिनलंड, फ्रान्स, बल्गेरिया, बेल्जियम, मॉल्टा, मोनाको, लक्सेंबर्ग, लिख्टेनश्टाइन, यूगोस्लाव्हिया, रूमानिया, व्हॅटिकन सिटी, सान मारीनो, रशिया (यूरोपीय भाग), स्वित्झर्लंड, स्वीडन, स्पेन, हंगेरी या देशांचा समावेश यूरोप खंडात होतो. रशिया हे राष्ट्र यूरोप व आशिया अशा दोन्ही खंडांत पसरलेले आहे. तसेच तुर्कस्तानचाही काही भाग या खंडात व बाकीचा आशियामध्ये आहे. याशिवाय उत्तरेकडील, पश्चिमेकडील व दक्षिणेकडील महासागरी व सागरी प्रदेशांतील असंख्य बेटांचाही या खंडात समावेश होतो. उत्तरेकडील आर्क्टिक महासागरातील व्हाइगाच, नॉव्हाया झीमल्या, कॉलगूयफ, स्वालबार बेटे, दक्षिणेकडील भूमध्य समुद्रातील इजीअन बेटे, क्रीट, आयोनियन बेटे, सिसिली, सार्डिनिया, कॉर्सिका व बॅलीॲरिक बेटे आणि पश्चिमेकडील अटलांटिक महासागरातील ब्रिटिश बेटे, शेटलंड, ऑर्कनी, आउटर हेब्रिडीझ, फेअरो, लोफोतेन बेटे व बाल्टिक समुद्रातील आव्हेनान्मा, सारेमा, हीऊमा, गॉटलंड, ओलांद, बॉर्नहॉल्म, झीलंड, फ्यून, फाल्स्टर, लॉलान, ऱ्यूगन इ. बेटांचा समावेश यूरोप खंडात करण्यात येतो.

त्रिखंडात्मक पृथ्वी अशी तत्कालीन जगाची ग्रीक कल्पना इ. स. पू. पाचव्या शतकापासूनच रूढ होती व त्यापैकी एक खंड म्हणून यूरोप ओळखले जात असे. ‘टी इन ओ’ या मध्ययुगीन नकाशात यूरोप, लिबिया, आशिया या तीन खंडांचा अंतर्भाव आढळतो. त्यात भूविस्ताराच्या दृष्टीने यूरोप आणि लिबिया मिळून पृथ्वीचा अर्धा भूभाग व आशिया खंडाने उर्वरित अर्धा भूभाग व्यापलेला असून भूमध्य समुद्राने हे दोन भाग वेगळे दर्शविले होते.

मावळतीचा प्रदेश किंवा पश्चिम प्रदेश या अर्थाच्या ‘एरिब’ या सेमिटिक शब्दापासून यूरोप हा शब्द आला असावा, असे मानले जाते. अलीकडे यूरोप हा शब्द विस्तृत दर्शनी प्रदेश (खंड) या अर्थाच्या मूळ ग्रीक शब्दावरून आला असावा, असे मानले जाते. अर्थातच इजीअन समुद्राच्या छोट्या परिसरात राहणाऱ्या प्राचीन ग्रीक समाजाच्या उत्तरेकडे जो विस्तृत भूप्रदेश होता, त्याची ही संज्ञा निदर्शक आहे.

यूरोप व आशिया ही दोन खंडे कोणत्याही जलाशयांनी एकमेकांपासून अलग झालेली नसल्याने काही भूगोलज्ञ यूरोप – आशिया यांचे मिळून ‘यूरेशिया’ असे एकच खंड मानतात. काही भूगोलज्ञ तर आफ्रिका, आशिया व यूरोप यांचे मिळून ‘युफ्रेशिया’ असे एकच खंड मानतात. कारण सुएझ कालवा खोदण्यापूर्वी आफ्रिका व आशिया ही खंडे एकमेकांना जोडलेलीच होती. भौगोलिक वा लोकसंख्येच्या दृष्टीनेही यूरोप खंडाची भूगी स्पष्टपणे वेगळी दाखविता येत नाही. भौगोलिक दृष्ट्या यूरोपची भूमी म्हणजे विस्तृत अशा यूरेशियन भूमीच्या द्वीपकल्पांपैकी एक विस्तृत द्वीपकल्प आहे, असे मानले जाते. याच्या पश्चिमेकडील व उत्तरेकडील सीमा अटलांटिक महासागर, नॉर्वेजियन व बॅरेंट्स समुद्र यांनी सीमित केलेल्या स्पष्टपणे दिसतात. दक्षिणेकडील सीमाही भूमध्य समुद्राने निश्चित केलेली आहे. मात्र तेथील पर्वतीय प्रदेशाने अलग केलेल्या भूमध्य सागरी यूरोपीय भूमीच्या हवामानाचे व भूपृष्ठरचनेचे उत्तर आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील देशांमधील हवामान व भूपृष्ठरचनेशी साम्य आढळते. यूरोप व आशिया यांना अलग करणाऱ्या तुर्कस्तानच्या उदाहरणावरून हे स्पष्ट दिसते. तुर्कस्तानच्या यूरोपीय आणि आशियाई भागांतील किनारी प्रदेशात प्राकृतिक दृष्ट्या साम्य आढळते. यूरोपची पूर्वेकडील उरल पर्वत व कॉकेशस पर्वतांची मानलेली सीमा मात्र खूपच संदिग्ध आहे. ही सीमारेषा केवळ सोव्हिएट रशियातूनच गेलेली असून, तिच्यामुळे यूरोप – आशिया यांच्यामधील भौगोलिक वेगळेपणा निर्माण झालेला आढळत नाही. सोव्हिएट रशियाही आपल्या यूरोपीय व आशियाई भूप्रदेशांत फरक मानीत नाही. त्यामुळे काही वेळा राजकीय व आर्थिक दृष्ट्या विचार करताना सोव्हिएट युनियन व तुर्कस्तान यांच्या पश्चिमेकडील भूमीला यूरोप म्हणून ओळखले जाते. प्राकृतिक दृष्ट्या जगातील सर्वांत मोठ्या भूखंडाचा वायव्येकडील भूप्रदेश म्हणजे ‘यूरोपीय भूमी’ होय. आफ्रिका व आशिया हे या भूखंडाचे इतर भाग होत. भूमध्य समुद्रामुळे आफ्रिका व यूरोप ही खंडे एकमेकांपासून वेगळी झाली असली, तरी भूमध्य समुद्रातील जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीमध्ये ही दोन खंडे एकमेकांपासून केवळ १३ किमी. अंतरावर आहेत. या खंडाच्या विस्ताराबाबत अशी संदिग्धता असली, तरी पूर्वापार परंपरेनुसार भूमध्य समुद्र, काळा समुद्र, कॉकेशस पर्वत, कॅस्पियन समुद्र, उरल नदी, उरल पर्वत, बॅरेंट्‌स समुद्र, नॉर्वेजियन समुद्र व उत्तर अटलांटिक महासागर यांनी सीमित केलेल्या भूखंडालाच यूरोप खंड म्हणून ओळखले जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर यूरोप खंडातील पूर्वेकडील देशांनी साम्यवादी शासनव्यवस्थेची स्थापना केली. त्यावरून साम्यवादी व बिगरसाम्यवादी राष्ट्रांची भूमी अशा दोन गटांत हे खंड विभागले गेलेले आहे. पश्चिमेकडील बिगरसाम्यवादी राष्ट्रांचा ‘पश्चिम यूरोप’ म्हणून, तर पूर्वेकडील साम्यवादी राष्ट्रांचा प्रदेश ‘पूर्व यूरोप’ म्हणून ओळखला जातो.

उरल पर्वत (६०° उ. अक्षांश) ते पोर्तुगालचे सॅओं व्हीसेंती भूशिर असा जर यूरोप खंडाचा ईशान्य – आग्नेय आस धरला, तर या आसापासून दोन्ही बाजूंना अनेक द्वीपकल्पे विस्तारलेली आढळतात. यांपैकी उत्तरेकडील स्कँडिनेव्हियन व जटलंड द्वीपकल्पे आणि दक्षिणेकडील बाल्कन व इटालियन ही द्वीपकल्पे महत्त्वाची आहेत. यांशिवाय कोला, क्रिमियन व आयबेरियन (स्पेन व पोर्तुगाल) ही या खंडातील प्रमुख द्वीपकल्पे आहेत.

भूवैज्ञानिक इतिहास : भूवैज्ञानिक दृष्ट्या यूरोप हे तुलनेने अलीकडच्या काळात निर्माण झालेले खंड आहे. संशोधनावरून असे आढळून आले आहे की, या खंडाच्या निर्मितीची प्रक्रिया सु. ५७ कोटी वर्षांपूर्वी सुरू झालेली असावी. तथापि काही भागांत त्यापूर्वीचेही खडक आढळतात. कँब्रियन – पूर्व, पुराजीव, मध्यजीव महाकल्प व तृतीय आणि चतुर्थ कल्पांचा समावेश होणारा नवजीव महाकल्प या वेगवेगळ्या महाकल्पांमध्ये येथील कवचांमध्ये वेगवेगळ्या घटना घडत गेल्याचे आढळून येते.

यूरोप खंडाच्या उत्तर भागातील फेनोस्कँडीयन (बाल्टिक) ढालक्षेत्रात आणि पूर्वेकडील रशियन मंच प्रदेशात अतिप्राचीन खडक असून ते दोन्ही प्रदेश कँब्रियन – पूर्वकालीन आहेत. बाल्टिक ढालप्रदेशात दक्षिण नॉर्वे, स्वीडन व फिनलंडच्या बहुतांश भागाचा, तर रशियन मंच प्रदेशात यूरोपियन रशियाच्या बहुतांश भागाचा समावेश होतो. या भागातील खडक सु. ३०० कोटी वर्षांपूर्वीचे असावेत. उत्तर अमेरिका खंडातील लॉरेंशियन ढालक्षेत्राचे साम्य आढळते. वायव्य स्कॉटलंड हेसुद्धा एक प्राचीन आणि स्थिर असे ढालक्षेत्र असून त्यातही कँब्रियन – पूर्वकालीन खडक आहेत. या सर्व विभागांत प्राचीन पूर्णस्फटित, रूपांतरित खडक आढळतात. यूरोपच्या भूवैज्ञानिक इतिहासात घडलेल्या तीन मुख्य गिरिजनक हालचालींच्या वेळी हा विभाग म्हणजे एक भक्कम प्रतिरोधक व स्थिर भाग ठरला गेला. खनिजसंपत्तीच्या दृष्टीने हा भाग समृद्ध असून त्यात लोहखनिज अधिक महत्त्वाचे आहे.

यूरोपमध्ये प्रमुख तीन गिरिजनक हालचाली घडून आल्या, त्यांनुसार तेथे कॅलिडोनियन, हर्सिनियन आणि अल्पाइन अशा तीन पर्वतसंहती आढळतात. सुमारे ३४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या डेव्होनियन कालखंडाच्या शेवटी झालेल्या पहिल्या मोठ्या गिरिजनक हालचालींतून कॅलिडोनियन पर्वतसंहतीची निर्मिती झाली. सांप्रतच्या यूरोपीय भूमीपैकी पश्मिच नॉर्वे, उत्तर व मध्य ब्रिटन आणि आयर्लंडच्या बहुतांश भागात ही पर्वतसंहती आढळते. मात्र सध्याच्या पर्वतश्रेण्या ह्या मूळ कॅलिडोनियन पर्वतश्रेण्यांचे अवशिष्ट भाग नसून कॅलिडोनियनोत्तर कालखंडात झालेल्या भूहालचालींच्या वेळी कॅलिडोनियन पर्वतश्रेण्यांच्या तळभागांचा उंचावलेला भाग आहे. साधारण याच कालखंडांदरम्यानचे पुराजीवकालीन खडक फेनोस्कँडीयन किंवा बाल्टिक ढालक्षेत्राच्या पूर्वेकडील भागात आढळत असून कॅलिडोनियन भूहालचालींच्या वेळी त्यांत फारसे बदल घडून आले नाहीत. रशियाच्या मंचाच्या भागात हे खडक असून त्यांचा विस्तार पूर्वेकडे झालेला दिसतो. याच्यावरच नंतरच्या मध्यजीव कालखंडातील खडकरचना आढळते. पूर्वेकडे उरल प्रदेशात हे खडक पृष्ठभागावर उघडे झालेले दिसतात.

कार्‌बॉनिफेरस कल्पाच्या शेवटी व पर्मियन कल्पात म्हणजे सु. २८ कोटी वर्षांपूर्वी झालेल्या गिरिजनक हालचालींतून हर्सिनियन पर्वतसंहितीची निर्मिती झाली. यावेळी दक्षिणेकडून उत्तरेकडे दाब निर्माण झाला होता. यानंतरच्या काळातही गाळाच्या खडकांच्या थरांना वळया पडल्या. या घडीच्या हर्सिनियन पर्वतसंहतीचा विस्तार पोर्तुगाल व दक्षिण आयर्लंडपासून पोलंडपर्यंत आढळतो. बहुतेक पर्वतीय प्रदेशांचे खनन कार्यामुळे मूळ स्वरूप बदलले गेले आणि अलीकडे नव्याने गाळांचे थर साचून निर्माण झालेल्या यूरोपियन मध्यवर्ती मैदानी प्रदेशाखाली हा भाग गाडला गेला. मात्र त्यातील काही भाग नंतरच्या काळात उंचावले जाऊन त्यामुळे यूरोपमधील उन्नतभूमीचे प्रदेश निर्माण झाले. दक्षिण आयर्लंडमधील उन्नतभूमीचे प्रदेश व कमी उंचीचे पर्वतभाग, नैर्ऋत्य इंग्लंडमधील कॉर्नवॉल, पश्चिम फ्रान्समधील ब्रिटनी, स्पेनमधील आयबेरियन मेसेटा, फ्रान्समधील मासीफ सेंट्रल व व्होझ, फ्रान्स व बेल्जियममधील आर्देन, जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्ट, मध्य जर्मनीतील उन्नतभूमीचे प्रदेश आणि चेकोस्लोव्हाकियातील बोहीमिया हे सर्व हर्सिनियन संहतीमधील उंचावलेले भाग आहेत. यूरोपमधील महत्त्वाची कोळसा क्षेत्रे हर्सिनियन पर्वतश्रेण्यांच्या उत्तर भागात म्हणजेच उत्तर फ्रान्सपासून बेल्जियम – जर्मनी – पोलंडपर्यंत आढळतात. तिसऱ्या गिरिजनक हालचालींच्या वेळी हर्सिनियन पर्वतश्रेण्यांना अनेक ठिकाणी तडे गेले, विभंग झाले किंवा त्या उंचावल्या गेल्या. या प्रदेशात विशेषतः फ्रान्सच्या मासीफ सेंट्रल भागात, ज्वालामुखी क्रियेची चिन्हे दिसतात.

तिसरी आणि अगदी अलीकडील गिरिजनक हालचाल मध्यजीव महाकल्पाच्या उत्तरार्धात (तृतीय कल्पाच्या पूर्वार्धात) घडून आली. सु. ६·५ कोटी वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या हालचालींपासून निर्माण झालेल्या पर्वतांना अल्पाइन पर्वतसंहती असे म्हणतात. या हालचालींत ट्रायासिक, ज्युरासिक व क्रिटेशसकालीन गाळाच्या खडकांच्या थरांना वळया पडल्या, तर काही ठिकाणी खोलवर असलेले पूर्ण स्फटिकी व रूपांतरित खडक भूपृष्ठावर उघडे पडले. अशी ही गुंतागुंतीची पर्वतसंहती यूरोपच्या सर्व दक्षिण भागात म्हणजेच दक्षिण स्पेनपासून काळ्या समुद्रापर्यंत पसरलेली आढळते. हीमध्ये स्पेनमधील सिएरा नेव्हाडा व पिरेनीज, इटलीमधील ॲपेनाइन, मध्य यूरोपातील आल्प्स व कार्पेथियन, बाल्कन द्वीपकल्पावरील दिनारिक, पिंडस व बाल्कन या उत्तुंग पर्वतरांगांचा समावेश होतो. या पर्वतश्रेण्यांदरम्यान अनेक खोलगट भाग आहेत. त्यांपैकी काही मैदानी प्रदेश म्हणून महत्त्वाचे आहेत. स्पेनमधील एब्रो खोरे, इटलीतील पो खोरे, रूमानियातील ग्रेट हंगेरियन मैदान किंवा ऑल्फल्ड व वालेकीया हे त्यांपैकी काही प्रमुख मैदानी भाग आहेत. आशियात काही खोलगट भागांवर सध्या समुद्र आहेत. उदा., भूमध्य समुद्राचे टिरीनियन, एड्रिॲटिक, इजीअन व काळा समुद्र हे उपविभाग अल्पाइन काळात विस्तृत प्रमाणात दाब व ताण निर्माण होऊन पूर्वीच्या कॅलिडोनियन व हर्सिनियनकालीन पर्वतांतील काही प्रदेश उंचावले गेले. भूकंप, जागृत ज्वालामुखी (उदा., व्हीस्यूव्हियस, एटना आणि स्ट्राँबोली), विस्तृत प्रमाणात आढळणारे उष्ण पाण्याचे झरे व आइसलँडमधील ज्वालामुखीक्रियेचे विविध आविष्कार यांवरून यूरोपमधील अनेक ठिकाणचे भूपृष्ठ अजूनही अस्थिर असल्याचे दिसते.

सुमारे १० ते २० लक्ष वर्षांपूर्वी सुरू होऊन दहा हजार वर्षांपूर्वीपर्यंत टिकलेल्या हिमयुगात किंवा प्लाइस्टोसीन कल्पामध्ये संपूर्ण यूरोप खंड हिमाच्छादनाखाली होते. या काळातील हिमरेषेच्या पश्चिमेकडील व दक्षिणेकडील मर्यादा पुढीलप्रमाणे होत्या : नॉर्वेच्या पश्चिमेकडून, स्कॉटलंडच्या उत्तरेकडून, आयर्लंडच्या पश्चिमेकडून व दक्षिणेकडून, ब्रिटनमधील सध्याच्या टेम्स नदीप्रवाहाला अनुसरून गेलेली ही हिमरेषा यूरोपच्या मुख्य भूमीवर मध्य नेदर्लंडसमधून जर्मनीच्या मध्यवर्ती उच्चभूमी प्रदेशाच्या उत्तरेकडून, बोहीमियन गिरिपिंडाच्या सभोवतालून, कार्पेथियनच्या उत्तरेकडून पुढे रशियातील डॉन नदीपर्यंत व तेथून उत्तरेस उरलच्या मध्य भागापर्यंत गेलेली होती.

यूरोपचा उत्तर भाग जेव्हा हिमाच्छादित होता, तेव्हा या हिमस्तरांमुळे मृदा व खडकांचे तुकडे दक्षिणेकडे वाहून आणले गेले. तसेच हिमयुगपूर्वकालीन दऱ्या अधिक रुंद व खोल बनल्या. हिमस्तरांमुळे साचलेल्या या गाळाच्या थरांना मध्य व उत्तर यूरोपमधील स्थानिक भूगोलाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तर यूरोपमध्येही हिमस्तरांमुळे धोंडे – माती, वाळू इत्यादींचे थर साचले असून हमॅक टेकड्या, हिमोढ, वाळूच्या टेकड्या, सरोवरे ही हिमाच्छादित क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण भूमिरूपे आहेत. हिमक्षेत्रातील हिमानी क्रियेने साचलेले हे वेगवेगळे घटक वेगवेगळ्या प्रवाहांमुळे व वाऱ्यांमुळे आणखी दक्षिणेकडे वाहून आणले गेले. मध्य आणि दक्षिण यूरोपातील लोएसचे थर हेसुद्धा मुळात हिमानी जलोढातूनच निर्माण झालेले असावेत, असे मानले जाते. हिमयुगकालीन हिम नंतरच्या काळात वितळले गेल्यामुळे सागरांची पातळी जवळजवळ ६० मीटरांनी वाढली. उत्तर समुद्राची निर्मिती यातूनच झाली. पूर्वीच्या बाल्टिक सरोवराचे रूपांतर समुद्रात होऊन पूर्वीच्याच एका नदीमार्गाला अनुसरून तो उत्तर समुद्राशी जोडला गेला. त्याच वेळी येथील, विशेषतः स्कँडिनेव्हिया व फिनलंडच्या भूमीवरील, हिमस्तरांचे आच्छादन कमी झाल्याने त्या प्रदेशांवर असलेले वजन घटले आणि त्यामुळे भूकवचाचे संतुलन राखण्यासाठी या भूभागाची उंची वाढू लागली. हिमयुग संपले, तरी हिमयुगकालीन हवामान व हिमनद्यांमुळे निर्माण झालेली भूमिरूपे (उदा., यू आकाराच्या दऱ्या, सरोवरे, कंगोरेदार शिखरे, सर्क, हिमोढ इ.) यूरोपमधील उंच पर्वतश्रेण्यांमध्ये तसेच उत्तर यूरोपमध्ये अजूनही आढळून येतात.

भूवर्णन : प्राकृतिक दृष्ट्या यूरोप खंडाचे मुख्य चार विभाग पडतात : (१) वायव्येकडील पर्वतीय प्रदेश, (२) यूरोपियन मैदानी प्रदेश (ग्रेट यूरोपियन प्लेन), (३) मध्यवर्ती उच्चभूमीचा प्रदेश व (४) दक्षिणेकडील अल्पाइन पर्वतरांगांचा प्रदेश.

(१) वायव्येकडील पर्वतीय प्रदेश : वायव्य फ्रान्स, आयर्लंड, उत्तर ग्रेट ब्रिटन, आइसलँड, नॉर्वे, स्वीडन, उत्तर फिनलंड व यूरोपीय रशियाचा वायव्य भाग यांचा समावेश या विभागात होतो. यातील बहुतेक प्रदेश पर्वतांनी वेढलेला असून तेथील खडकरचना ही पृथ्वीवरील सर्वांत प्राचीन खडकरचना म्हणून ओळखली जाते. तीत खनिज संपत्तीचे भरपूर साठे आढळतात. अनेक वर्षांपासून या प्रदेशाची झीज होत असूनही त्यांत काही उंच शिखरे आढळतात. त्यांपैकी नॉर्वेमधील ग्लिटरटिम (२,४७० मी.) हे या विभागातील सर्वोच्च शिखर आहे. तीव्र पर्वत उतार व मृदेचा पातळ थर यांमुळे कृषिदृष्ट्या हा भाग विशेष महत्त्वाचा नाही. या विभागात भरपूर पर्जन्यमान असल्याने तेथील नद्यांचे पाणी व पाण्यापासून तयार केलेली वीज तेथील औद्योगिक शहरांना मोठ्या प्रमाणात पुरविली जाते. उन्हाळ्यातील चराऊ कुरणे म्हणून हा पर्वतीय भाग प्रसिद्ध आहे. या प्रदेशाचे वायव्य किनारे फ्योर्ड प्रकारचे आहेत. सागरआधारित व्यवसायांस (उदा., मत्स्योद्योग, मीठ उद्योग, शंख – शिंपले – रत्ने काढण्याचा उद्योग, जहाज – वाहतूक इ.) तो भाग अनुकूल आहे. नॉर्वेचा किनारा तर खूपच दंतुर आहे. या भागात लोकसंख्येची घनता फारच कमी (दर चौ. किमी.स १० लोक) आहे.

(२) यूरोपियन मैदानी प्रदेश : यूरोपची निम्म्यापेक्षा अधिक भूमी या प्रदेशात मोडते. रशियाचा बहुतांश भाग, रशियापासून पश्चिमेकडे फ्रान्सपर्यंतचा मैदानी प्रदेश तसेच इंग्लंडच्या आग्नेय भागाचा यात समावेश होतो. रशियाचा तर उत्तरेस आर्क्टिक महासागरापासून दक्षिणेस कॉकेशस पर्वतापर्यंतचा २,४१० किमी. लांबीचा प्रदेश किंवा उत्तरेस बाल्टिक – व्हाइट समुद्रापासून दक्षिणेस काळा – ॲझॉव्हकॅस्पियन समुद्रांपर्यंतचा प्रदेश या मैदानात येतो. पूर्वेकडे या प्रदेशाची रुंदी अधिक आहे. पश्चिमेकडे रशियाचा प. भाग, पोलंड व जर्मनीत या मैदानी प्रदेशाचा दक्षिणोत्तर विस्तार फारच कमी झाला आहे. फ्रान्सच्या पश्चिम भागात या मैदानाची रुंदी पुन्हा वाढलेली आढळते. बेल्जियममध्ये रुंदी सर्वांत कमी (८० किमी.) आहे. यूरोपियन मैदानी प्रदेश मुख्यतः सपाट असून त्यावर काही ठिकाणी टेकड्या आढळतात. जगातील सर्वाधिक सुपीक जमिनीचा प्रदेश म्हणून हा ओळखला जातो. या मैदानाचा पश्चिमेकडील भाग म्हणजे जगातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला भाग आहे. मात्र रशियाच्या बहुतांश मैदानी प्रदेशात लोकसंख्येची घनता कमीच आहे (दर चौ. किमी.स ४८). रशियातील मैदानी प्रदेशाची सस.पासूनची सरासरी उंची सु. १८० मी. असून इतरत्र ती १५० मी.पेक्षा कमी आहे. उत्तरेकडील मैदानी प्रदेश हिमनद्यांच्या संचयनापासून तयार झाल्याचे तेथील भूविशेषांवरून स्पष्ट दिसते. पूर्व ब्रिटन ते युक्रेन यांदरम्यानची मध्य यूरोपियन उच्चभूमी व कार्पेथियन पर्वत यांच्या उत्तरेकडील पायथ्याशी लोएस प्रकारची मैदाने आढळतात.

(३) मध्यवर्ती उच्चभूमी व पठारी प्रदेश : यूरोपच्या मध्यवर्ती भागात (यूरोपीय रशिया वगळता) कमी उंचीचे पर्वतीय प्रदेश व उंच पठारी प्रदेश आढळतात. त्यांची उंची ३०० ते १,८०० मी.च्या दरम्यान आहे. गोलाकार टेकड्या, तीव्र उतार, दऱ्या, खंड (गॅप), हॉर्स्ट इ. विविध भूमिस्वरूपे येथे पहावयास मिळतात. पोर्तुगाल व स्पेनमधील मेसेटा (मध्यवर्ती पठार), फ्रान्समधील मासीफ सेंट्रल (मध्यवर्ती उच्चभूमी), मध्य जर्मनी व पश्चिम चेकोस्लोव्हाकियामधील पठारे व कमी उंचीचे पर्वत, स्कॉटलंडच्या दक्षिण भागातील उच्चभूमीचे प्रदेश हे या प्राकृतिक विभागातील प्रमुख उच्चभूमीचे पठारी प्रदेश आहेत. यांतील काही भाग वनाच्छादित आहेत. बरीचशी भूमी खडकाळ आणि नापीक मृदेची आहे. या भागात ज्वालामुखी प्रकारच्या खडकांचे थर आढळतात. त्यांतील नद्यांची खोरी मात्र सुपीक असून ती शेतीच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. या मध्यवर्ती उच्चभूमीच्या काही भागात, विशेषतः जर्मनी व चेकोस्लोव्हाकिया ह्या देशांत, खनिजांचे भरपूर साठे आहेत. पठारी भागांतून अनेक नद्या उगम पावत असून ते भाग पशुपालनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. स्पेन व फ्रान्समधील या उच्चभूमीच्या प्रदेशात लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स ४८ असून जर्मनी व चेकोस्लोव्हाकियात ती दोन ते चार पटींनी अधिक आहे.

(४) दक्षिणेकडील अल्पाइन पर्वतरांगांचा प्रदेश : यूरोपच्या द. भागात पश्चिमेस स्पेनपासून ते पूर्वेस कॅस्पियन समुद्रापर्यंतच्या प्रदेशात अनेक पर्वतश्रेण्या आढळतात. स्पेनमधील सिएरा नेव्हाडा स्पेन व फ्रान्स यांच्या सरहद्दीदरम्यानची पिरेनीज पर्वतरांग आग्नेय फ्रान्स, उत्तर इटली, स्वित्झर्लंड, दक्षिण जर्मनी, ऑस्ट्रिया व उत्तर यूगोस्लाव्हिया या प्रदेशात विस्तारलेला आल्प्स पर्वत, इटलीमधील ॲपेनीज यूगोस्लाव्हिया व ग्रीसमधील दिनारिक आल्प्स, बल्गेरियातील बाल्कन पर्वत, मध्य चेकोस्लोव्हिया, दक्षिण पोलंड, पश्चिम रशिया व रूमानिया या देशांत पसरलेला कार्पेथियन पर्वत, पूर्वेकडील कॉकेशस पर्वत इ. अल्पाइन पर्वतश्रेण्यांचा समावेश या प्राकृतिक विभागात होतो. यूरोपमधील अत्युच्च व निसर्गसुंदर अशी शिखरे या प्रदेशात पहावयास मिळतात. कॉकेशस पर्वतातील मौंट एलब्रुस उंची (५,६३३ मी.) हे यातील सवोच्च शिखर आहे. या विभागात स्विस आल्प्ससारखे अनेक प्रदेश सुटीतील सहलीची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध आहेत. येथील कमी उंचीच्या पर्वतांचे उतार, सपाटीचे प्रदेश, रुंद खोरी शेतीच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. अधिक उंचीच्या पर्वत उतारांवर दाट अरण्ये आहेत. त्यांच्यापेक्षा अधिक उंचीचे प्रदेश चराऊ कुरणे म्हणून महत्त्वाचे आहेत. या विभागातील लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स १० ते ९७ अशी प्रदेशानुसार कमीअधिक प्रमाणात आढळते. पर्वतश्रेण्यांप्रमाणेच येथे अनेक द्वीपकल्पे आणि समुद्रात अनेक बेटे आढळतात.

मृदा : यूरोपमधील भूगर्भरचना व भूपृष्ठावरील प्राकृतिक रचना यांमधील मृदाप्रकारांत बरीच गुंतागुंत आढळत असली, तरी रशियाच्या मैदानी भागात मात्र मृदाप्रकारांचे वेगवेगळे पट्टे स्पष्टपणे दिसतात. टंड्रा प्रकारची आम्ल, पाणबोदाड व नापीक जमीन सोव्हिएट रशियाच्या उत्तर भाग, फिनलंड व नॉर्वे – स्वीडनचा उंच भाग यांमध्ये आढळते. या मृदापट्‌ट्याच्या दक्षिणेकडील बोथनिया आखात प्रदेश, स्वीडन व रशियातील अपर व्होल्गा नदीच्या उत्तरेकडील भागात पॉडझॉल प्रकारची मृदा आढळते. या पट्‌ट्यात मुख्यतः सूचिपर्णी वृक्षांची अरण्ये आहेत. शेतीच्या दृष्टीने ही निरुपयोगी मृदा आहे. दक्षिण भागात मध्य रशियापासून पश्चिमेस ब्रिटिश बेटांपर्यंत तसेच मध्य स्वीडन, द. नॉर्वे व फिनलंडपासून दक्षिणेस पिरेनीज आल्प्स व बाल्कन पर्वतापर्यंतच्या विस्तृत प्रदेशात पॉडझॉल व तपकिरी मृदा आढळते. या भागात मिश्र अरण्ये आहेत. यात सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण अधिक असते. सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण, जलधारण क्षमता, खोली, क्षारांचे प्रमाण, आम्लता इत्यादींनुसार या मृदांचा वेगवेगळ्या पिकांसाठी उपयोग केला जातो. यूरोपियन रशियाच्या आग्नेय भागात, प्रामुख्याने युक्रेनमध्ये, सुपीक चेर्नोसेम मृदा आहे. यांशिवाय यूरोपमध्ये चेस्टनट, करडी मृदा, टेरा रोझा, पीट व बॉग, गाळाची सुपीक जमीन, पर्वतीय मृदा असे वेगवेगळे मृदाप्रकार आढळतात.

खनिजे : यूरोपमध्ये आर्थिक दृष्ट्या उपयुक्त अशा विविध खनिजांचे साठे आहेत. त्यांपैकी काहींचा उपयोग ब्राँझयुगापासून केला जात आहे. बाकीच्या खनिजांचे औद्योगिक क्रांतीपासून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात आहे. यूरोपमध्ये लोह खनिज, दगडी कोळसा व बॉक्साइट यांचे विपुल साठे आहेत. लोह खनिजासाठी फ्रान्स, रशिया व स्वीडन कोळसा उत्पादनासाठी चेकोस्लोव्हाकिया, पूर्व व पश्चिम जर्मनी, ग्रेट ब्रिटन, पोलंड, रशिया हे देश बॉक्साइट उत्पादनासाठी फ्रान्स, ग्रीस, हंगेरी, रशिया व यूगोस्लाव्हिया युरेनियमसाठी फ्रान्स व सोव्हिएट रशिया, तर नैसर्गिक वायू उत्पादनासाठी ग्रेट ब्रिटन, नेदर्लंड्स, नॉर्वे, रूमानिया, अल्बेनिया, रशिया व पश्चिम जर्मनी हे देश महत्त्वाचे आहेत. यांशिवाय क्रोमाइट, तांबे, मँगॅनीज, जस्त, निकेल, पारा, शिसे, खनिज तेल, टिटॅनियम, प्लॅटिनम, पोटॅश, चांदी यांचेही साठे यूरोपमध्ये आहेत.

नद्या, सरोवरे व समुद्र : यूरोपमधील अनेक नद्या वाहतूक, जलसिंचन व जलविद्युत्‌शक्तिनिर्मिती यांसाठी विशेष उपयुक्त ठरतात. या खंडामधील बहुतांश नद्या कॅलिडोनियन, हर्सिनियन व अल्पाइन काळांत निर्माण झालेल्या व भरपूर वृष्टीच्या पर्वतीय प्रदेशातून वाहणाऱ्या आहेत. पश्चिम यूरोपमधील नद्यांचे प्रवाहमान व पाण्याचे प्रमाण हिवाळ्यात जास्त, तर उन्हाळ्यात कमी असते. पर्वतीय प्रदेशातील व खंडांतर्गत हवामान प्रदेशातील नद्यांना वसंत ऋतूत व उन्हाळ्याच्या सुरुवातीला बर्फ वितळल्याने भरपूर पाणी असते. भूमध्य सागरी प्रदेशातील, विशेषतः ग्रीसच्या द्वीपकल्पावरील, काही नद्या तुरळक पर्जन्य, बाष्पीभवन व सच्छिद्र चुनखडकयुक्त पात्र यांमुळे उन्हाळ्यात कोरड्या पडत असल्याचे दिसते. रशियामधून वाहणारी व दक्षिणेकडे कॅस्पियन समुद्राला येऊन मिळणारी व्होल्गा ही यूरोपमधील सर्वांत लांब नदी (३,५३१ किमी.) आहे. कालव्यांद्वारे ही नदी आर्क्टिक महासागर, बाल्टिक समुद्र व डॉन नदीला जोडण्यात आलेली आहे. डॉन ही रशियातील दुसरी महत्त्वाची नदी रुंद पात्रातून ॲझॉव्ह समुद्रमार्गे काळ्या समुद्राला जाऊन मिळते. आल्प्स पर्वतात उगम पावून पश्चिम जर्मनी व नेदर्लंड्समधून वाहत जाऊन उत्तर समुद्राला मिळणारी ऱ्हाईन नदी (लांबी १,१०० किमी.) ही बिगररशियन यूरोपमधील अंतर्गत जलवाहतुकीच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेली नदी आहे. डॅन्यूब ही यूरोपमधील दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी (२,८६० किमी.) असून ती पश्चिम जर्मनी, ऑस्ट्रिया, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, यूगोस्लाव्हिया, बल्गेरिया व रूमानिया अशा सात देशांतून वाहत जाऊन काळ्या समुद्राला मिळते. पूर्व यूरोपच्या नैर्ऋत्येकडील प्रदेशात जलवाहतुकीच्या दृष्टीने विशेष महत्त्वपूर्ण स्थान असलेली ही नदी आहे. याशिवाय रशियातील नीपर, नीस्तर, नेमन, उत्तर द्वीना, पश्चिम द्वीना, व पेचोरा पोलंडमधील ओडर व व्हिश्चला चेकोस्लोव्हाकिया, पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीतील एल्ब नदी इटलीमधील पो नदी फ्रान्समधील गारॉन, ल्वार, ऱ्होन व सेन स्पेनमधील एब्रो, स्पेन व पोर्तुगाल हद्दीवरील टेगस, ग्वाद्याना व डोरू आणि इंग्लंडमधील टेम्स या यूरोप खंडातील विशेष महत्त्वाच्या नद्या आहेत.

कस्पियन समुद्र हे जगातील सर्वांत मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर (क्षेत्रफळ ३,९८,८२१ चौ. किमी.) यूरोपीय रशियाच्या आग्नेय कोपऱ्यात असून त्याचा काही भाग आशिया खंडात येतो. याला समुद्र म्हणून संबोधले जात असले, तरी वस्तुतः ते सरोवरच आहे. कारण ते चोहोबाजूंनी जमिनीने वेढलेले आहे. याचा उत्तर किनारा सस.पासून ३८ मी. खोल असून तो यूरोपमधील सर्वांत कमी उंचीचा प्रदेश आहे. यूरोपमधील गोड्या पाण्याच्या सरोवराखालील एकूण क्षेत्रफळ १,३७,००० चौ. किमी. असून ते उत्तर अमेरिकेतील मिशिगन व सुपीरिअर सरोवरांच्या एकत्रित क्षेत्रफळापेक्षाही कमी आहे. म्हणजेच यूरोपच्या एकूण भूमीपैकी दोन टक्क्यांपेक्षाही कमी भूमी सरोवरांखाली आहे. स्कँडिनेव्हिया व उत्तर रशियामध्ये हजारो सरोवरांची निर्मिती झालेली आढळते. वायव्य रशियातील लॅडोगा हे यूरोपमधील सर्वांत मोठे (क्षेत्रफळ १७,७०३ चौ. किमी.) गोड्या पाण्याचे सरोवर आहे. या सरोवराच्या पूर्वेस ओनेगा हे दुसऱ्या क्रमांकाचे सरोवर (९,८८० चौ. किमी.) आहे. ही दोन्ही सरोवरे बाल्टिक समुद्र व श्वेत समुद्र यांदरम्यानच्या भागात आहेत. फिनलंडमध्ये सु. ६०,००० सरोवरे असून त्या देशाला ‘हजारो सरोवरांची भूमी’ (लँड ऑफ थाउजन्ड लेक्स) असे संबोधले जाते. फिनलंडमधील सरोवरांनी देशाच्या क्षेत्रफळाच्या एक – पंचमांश क्षेत्र व्यापले आहे. स्कॉटलंड, आयर्लंड व स्वीडन यांमध्येही सरोवरांची संख्या खूप आहे. इंग्लंडमधील लेक डिस्ट्रिक्ट हे लघुक्षेत्राचे परंतु अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलेले सरोवर आहे. मध्य इटलीमध्ये ज्वालामुखी सरोवरे, तर बाल्टिक व भूमध्य सागर किनाऱ्यावर खाजणसदृश सरोवरे आढळतात. आल्प्स पर्वत प्रदेशातही अनेक सरोवरे पहावयास मिळतात. स्वित्झर्लंडमधील जिनीव्हा, नशाटेल, ल्यूसर्न व झुरिक ही सरोवरे पश्चिम जर्मनी, ऑस्ट्रिया व स्वित्झर्लंड यांदरम्यानचे कॉन्स्टन्स सरोवर, स्वित्झर्लंड व इटली यांदरम्यानची माद्‌जोरे आणि लूगानो ही सरोवरे, तर इटलीमधील कोमो व गार्दा ही सरोवरे उल्लेखनीय आहेत.

इतर कोणत्याही खंडापेक्षा यूरोपचा समुद्रकिनारा खूपच अनियमित, दंतुर व विखंडित स्वरूपाचा आहे. लहानमोठ्या द्वीपकल्पांच्या मालिकांमुळे समुद्रकिनाऱ्याला असे अनियमित स्वरूप प्राप्त झालेले दिसते. नॉर्वे व स्वीडन यांचे स्कँडिनेव्हियन द्वीपकल्प, डेन्मार्कचे जटलंड द्वीपकल्प. पोर्तुगाल व स्पेनचे आयबेरियन द्वीपकल्प, इटलीचे ॲपेनाइन द्वीपकल्प आणि अल्बेनिया, बल्गेरिया, ग्रीस, यूगोस्लाव्हिया व तुर्कस्तान (काही भाग) या देशांचा समावेश असणारे बाल्कन द्वीपकल्प ही या खंडातील प्रमुख द्वीपकल्पे आहेत. वेगवेगळ्या द्वीपकल्पांच्या दरम्यानच्या भागात समुद्र, उपसागर व आखाते आहेत. या अनियमित समुद्रकिनाऱ्याची एकूण लांबी ६०,९५७ किमी. असून ती पृथ्वीच्या विषुववृत्तीय परिघाच्या लांबीच्या दीडपटीपेक्षा अधिक आहे. दंतुर समुद्रकिनाऱ्यामुळे यूरोपला अनेक उत्कृष्ट नैसर्गिक बंदरे लाभली असून, काही देशांत त्यामुळे मासेमारी व जहाजबांधणी उद्योगांचा विकास झालेला आहे. खंडाच्या दक्षिणेस भूमध्य समुद्र असून द्वीपकल्पे आणि बेटे यांनी विभागलेल्या त्याच्या वेगवेगळ्या भागांना वेगवेगळी नावे आहेत. यांतील कॉर्सिका, सार्डिनिया, सिसिली व इटली यांदरम्यानचा विभाग टिरीनियन समुद्र या नावाने इटली व यूगोस्लाव्हिया यांदरम्यानच्या समुद्र भागाला एड्रिॲटिक समुद्र या नावाने इटली व ग्रीस यांदरम्यानच्या सागरभागाला आयोनियन समुद्र या नावाने, तर ग्रीस व तुर्कस्तान यांदरम्यानचा सागरविभाग इजीअन समुद्र या नावाने ओळखला जातो. हे सर्व भूमध्य समुद्राचेच उपभाग आहेत. दार्दानेल्स सामुद्रधुनी, मार्मारा समुद्र व बॉस्पोरस सामुद्रधुनी यांद्वारे भूमध्य समुद्राला काळा समुद्र जोडला गेला आहे, तर जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने भूमध्य समुद्र अटलांटिकला जोडला गेला आहे. खंडाच्या वायव्य भागात जमिनीमध्ये घुसलेला बाल्टिक समुद्र असून, अटलांटिकमधून सोव्हिएट रशियाकडे जाणारा हा प्रमुख जलमार्ग आहे. काही ठिकाणी या समुद्राची खोली १८० मी. पेक्षा अधिक आढळते. बॉथनियाचे आखात, फिनलंडचे आखात व रिगा आखात ही बाल्टिक समुद्राची प्रमुख आखाते आहेत. स्कॅगरॅक समुद्र, कॅटेगॅट समुद्र व अरुंद खाडीमुळे बाल्टिक समुद्र उत्तर समुद्राशी जोडला गेला आहे. पोर्तुगाल आणि स्पेन यांच्या उत्तरेस बिस्केचा उपसागर आहे. यूरोपच्या उत्तरेस श्वेत समुद्र व बॅरेंट्स समुद्र, वायव्येस नॉर्वेजियन समुद्र, यूरोपची मुख्य भूमी व ब्रिटिश बेटे यांदरम्यान उत्तर समुद्र, तर ग्रेट ब्रिटन व आयर्लंड यांदरम्यान आयरिश समुद्र आहे. उत्तर समुद्र व अटलांटिक महासागर यांदरम्यान म्हणजेच इंग्लंड यूरोपची मुख्य भूमी यांदरम्यान इंग्लिश खाडी आहे.

हवामान : यूरोपच्या वेगवेगळ्या प्रदेशातील हवामानात भिन्नता आढळत असली, तरी खंडाचा बहुतांश भाग सौम्य हवामानाचा आहे. याच अक्षवृत्तीय पट्‌ट्यात असलेल्या आशिया आणि उत्तर अमेरिकेपेक्षा यूरोपमधील हवामान सौम्य असलेले आढळते. अटलांटिक महासागरावरून यूरोपच्या भूमीकडे वाहत येणाऱ्या वाऱ्यांमुळे येथील हवामान सौम्य बनलेले आहे कारण यूरोपच्या पश्चिम किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या उष्ण गल्फ प्रवाहामुळे हे वारे उबदार बनतात. या वाऱ्यांच्या वाहण्याच्या मार्गात त्यांना अडवू शकणारे विशेष पर्वतीय प्रदेश नाहीत. त्यामुळे अटलांटिक किनाऱ्यापासून ४८० किमी. पर्यंत येणाऱ्या यूरोपच्या बहुतांश भूमीवरील (रशिया वगळता) हवामानावर या वाऱ्यांचा परिणाम झालेला दिसतो. या उष्ण गल्फ प्रवाहाचा व जोरदार पश्चिम वाऱ्यांचा परिणाम नॉर्वेच्या किनाऱ्यावर तर विशेष जाणवतो. नॉर्वेचा बहुतांश किनारा आर्क्टिक प्रदेशात मोडत असून हिवाळ्यात तो भाग बर्फाच्छादित असतो असे असूनही उष्ण गल्फ प्रवाह व त्यावरून वाहत येणारे पश्चिमी वारे या दोन्ही घटकांच्या परिणामाने नॉर्वेच्या किनाऱ्यावरील सर्व बंदरे (आर्क्टिक भागासह) हिवाळ्यातही गोठलेली न राहता वाहतुकीस खुली राहतात.

सामान्यपणे दक्षिण यूरोपपेक्षा उत्तर यूरोपमधील हिवाळे दीर्घकालीन व थंड, तर उन्हाळे अल्पकालीन व शीत असतात. तसेच पश्चिम यूरोपपेक्षा पूर्व यूरोपमधील हिवाळे दीर्घकालीन व थंड, तर उन्हाळे अल्पकालीन व उष्ण असतात. स्कॉटलंडमधील ग्लासगो येथील जानेवारीचे सरासरी तापमान ३° से. असते, तर त्याच अक्षवृत्तावरील अंतर्भागातील मॉस्को येथील जानेवारीचे सरासरी तपमान मात्र – १०° से. असते.

यूरोपच्या बहुतांश भागातील वार्षिक सरासरी वृष्टिमान ५० ते १५० सेंमी. आहे. सर्वाधिक म्हणजे २०० सेंमी. पेक्षा जास्त वृष्टी पर्वतीय प्रदेशाच्या पश्चिम भागात येणाऱ्या पश्चिम ग्रेट ब्रिटन, पश्चिम नॉर्वे व पश्चिम यूगोस्लाव्हिया या प्रदेशांत होते. सर्वांत कमी वृष्टी (५० सेंमी. पेक्षा कमी) (१) उंच पर्वतरांगांच्या पूर्वेस, (२) अटलांटिक महासागरापासूनचा अगदी अंतर्गत भाग व (३) आर्क्टिक महासागराचा किनारी प्रदेश अशा तीन प्रदेशांत होते. यात स्पेनचा मध्य व आग्नेय भाग, यूरोपियन रशियाचा आग्नेय व उत्तर भाग आणि उत्तर स्कँडिनेव्हिया या प्रदेशांचा समावेश होतो.

हवामानानुसार यूरोपचे मुख्य चार विभाग पाडता येतात.

(१) सागरी हवामान विभाग : स्वालबार, आइसलँड, फेअरो, ब्रिटिश बेटे, नॉर्वे, दक्षिण स्वीडन, पश्चिम फ्रान्स, उत्तर जर्मनी, वायव्य स्पेन या भागांत या प्रकारचे हवामान आढळते. येथील हवामानावर अटलांटिक वायुराशींचा परिणाम झालेला दिसतो. अक्षांश व उंचीनुसार येथील उन्हाळे उबदार ते उष्ण असतात. वर्षभर पुरेशी वृष्टी होते, तर जास्त उंचीच्या भागात ती भरपूर होते. शरद ऋतूत किंवा हिवाळ्याच्या पूर्वार्धात सर्वाधिक वृष्टी होत असते. उन्हाळ्यातील व हिवाळ्यातील तपमानांत खूपच तफावत आढळते.

(२) मध्य यूरोपियन संक्रमणात्मक हवामान विभाग : मध्य स्वीडन, दक्षिण फिनलंड, नॉर्वेमधील ऑस्लो खोरे, पूर्व फ्रान्स, नैर्ऋत्य जर्मनी आणि मध्य व आग्नेय यूरोपचा बहुतांश भाग या हवामान विभागात मोडतो. सागरी व खंडांतर्गत अशा दोन्ही वायुराशींचा प्रभाव येथे आढळतो. उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील सागरी हवामान प्रदेश, पूर्वेकडील विस्तृत खंडांतर्गत हवामान विभाग आणि दक्षिणेकडील भूमध्यसागरी हवामान विभाग यांदरम्यानच्या मध्य यूरोपमध्ये हा संक्रमणात्मक हवामान विभाग येतो. येथील हिवाळे थंड, तर उन्हाळे (मुख्यतः सखल भागातील) उबदार असतात. प्रदेशानुसार वृष्टी बेताची ते भरपूर होत असून उन्हाळ्यात ती सर्वाधिक होते. पर्वतीय प्रदेशात २०० सेंमी. पेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी होत असून तेथे हिमवृष्टीही होत असते. उंच शिखरे तर नेहमीच बर्फाच्छादित असतात. ड्यॅन्यूब प्रदेशात माफक पर्जन्यवृष्टी होते. बूडापेस्ट येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१ सेंमी. आहे. दिनारिक आल्प्स पर्वत प्रदेशात हिवाळ्यात तीव्र चक्रवात निर्माण होत असून उन्हाळ्यात पर्जन्यवृष्टी होते. पश्चिमेकडून पूर्वेकडे वार्षिक तपमान कक्षा वाढत जाते.

(३) खंडांतर्गत हवामान विभाग : यूरोपच्या बहुतांश भागांत या प्रकारचे हवामान असून त्यात यूरोपियन सोव्हिएट रशिया (बाल्टिक प्रदेश वगळता), फिनलंडचा बहुतांश भाग व उत्तर स्वीडनचा समावेश होतो. पश्चिम यूरोपपेक्षा ईशान्य भागातील हिवाळे दीर्घकालीन आणि बरेच थंड असतात, तर आग्नेय भागात उन्हाळे अधिक उष्ण असतात. तपमान कक्षा जास्त आढळते. सर्वाधिक पर्जन्यवृष्टी उन्हाळ्यात होत असली, तरी पश्चिम यूरोपपेक्षा ती कमीच असते. मॉस्को येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६३.५ सेंमी. असून, रशियन मैदानाच्या उत्तर व आग्नेय भागांत सरासरी पर्जन्यमान २५ सेंमी. ते ५० सेंमी. च्या दरम्यान असते. दक्षिण भागात पर्जन्यमान फारच कमी असून, तेथे अवर्षणाची परिस्थिती आढळते.

(४) भूमध्य सागरी हवामान : दक्षिण यूरोपच्या किनारी प्रदेशात समशीतोष्ण कटिबंधीय भूमध्य सागरी प्रकारचे हवामान आढळते. येथील हिवाळे सौम्य व आर्द्र, तर उन्हाळे उष्ण व कोरडे असतात. उन्हाळ्यात आकाश निरभ्र असते. मात्र हवामानात प्रादेशिक भिन्नता आढळते. पश्चिम भागात सागरी वायुराशींचा प्रभाव अधिक पडतो. पर्जन्यवृष्टी पश्चिमी वाऱ्यांपासून होत असून वातविमुख बाजूवर पावसाचे मान कमी झालेले दिसते. रोम येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६६ सेंमी. असून अथेन्स येथे ते केवळ ४० सेंमी. आहे.

(५) वनस्पती व प्राणी : पूर्वी यूरोपमध्ये विस्तृत अरण्यमय प्रदेश होते परंतु शेती, मानवी वसाहती आणि वेगवेगळ्या लाकूड उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केल्याने अरण्यांखालील क्षेत्र कमी झालेले आहे. मध्य व दक्षिण यूरोपमध्ये अशी जंगलतोड मोठ्या प्रमाणावर झाली असली, तरी उत्तर यूरोपमध्ये अद्याप विस्तृत जंगलमय प्रदेश आहेत. खंडाच्या उत्तर भागात विस्तृत अशी सदाहरित सूचिपर्णी अरण्ये असून त्यांत फर, बर्च, पाइन व स्प्रूस हे वनस्पती प्रकार अधिक आहेत. इमारती व कागद उद्योगांसाठी या अरण्यांतून मोठ्या प्रमाणावर लाकडाचा पुरवठा होतो. जंगल संवर्धनाच्या दृष्टीने यूरोपियन शासनांनी निर्बंधात्मक अटी घालून दिल्या आहेत. बिगर – रशियन यूरोपच्या मध्य व दक्षिण भागांत रुंदपर्णी पानझडी वृक्षांची अरणे आढळतात. त्यांत ॲश, बीच, बर्च, एल्म, मॅपल व ओक हे वनस्पती प्रकार महत्त्वाचे आहेत. याच प्रदेशात रुंदपर्णी व सूचिपर्णी या अरण्यांचे मिश्रणही आढळते. तसेच येथील पर्वतीय प्रदेशांत अधिक उंचीच्या भागात सूचिपर्णी वृक्षांची अरण्ये आहेत. भूमध्य सागराच्या किनारी प्रदेशात प्रामुख्याने रुंदपर्णी सदाहरित वृक्षांची अरण्ये असून कॉर्क व ऑलिव्ह ह्या त्यांतील प्रमुख वनस्पती होत.

यूरोपमध्ये स्टेप व प्रेअरी असे दोन प्रकारचे गवताळ प्रदेश आढळतात. यूरोपीय रशियाच्या आग्नेय भागात स्टेप प्रकारचा गवताळ प्रदेश आहे. हा प्रदेश कोरडा असून केवळ कमी उंचीचे गवत आढळते. याउलट प्रेअरी प्रकारचा गवताळ प्रदेश सुपीक जमिनीचा असून तेथील गवत स्टेप प्रदेशापेक्षा अधिक उंचीचे असते. या प्रेअरी प्रकारच्या गवताळ प्रदेशाचा विस्तार यूरोपियन मैदानी प्रदेशात असून त्यात प्रामुख्याने पश्चिमेकडील मैदानी प्रदेश व यूरोपियन रशियाचा मध्यवर्ती भाग येतो. शेतजमीन व चराऊ कुरणे अशा दोन्ही प्रकारे या गवताळ प्रदेशाचा वापर केला जातो.

टंड्रा प्रदेश व उंच पर्वतीय प्रदेशातील हवामान अतिथंड असल्यामुळे तो संपूर्ण भाग वृक्षरहित ओसाड असाच आहे. आर्क्टिक महासागर किनाऱ्याचा बहुतांश भाग अशा प्रकारचा आहे. वर्षातील बहुतांश काळ हा प्रदेश बर्फाच्छादित असतो. अल्पकालीन व साधारण उबदार उन्हाळ्यात या प्रदेशातील बर्फाचा वरचा ३० ते ६१ सेंमी. जाडीचा थर वितळून तेथे लहानलहान दलदलीचे प्रदेश व डबकी तयार होतात. उन्हाळ्यात शेवाळ, छोटीछोटी झुडपे, दगडफूल व विविधरंगी शोभायमान फुलझाडे अशा लहानलहान अल्पजीवी वनस्पती वाढतात. उंच पर्वतांच्या वरच्या भागात हीच परिस्थिती आढळते. या दोन्ही प्रदेशांतील काही भागांचा गुरे चारण्यासाठी उपयोग केला जातो.

राष्ट्रीय उद्याने, प्राणिसंग्रहालये, प्राण्यांचे रक्षित भाग व मानवी वसाहतीपासून दूरच्या प्रदेशात वन्य प्राणिजीवन आढळते. यूरोपमध्ये व प्रामुख्याने रशिया व उत्तर स्कँडिनेव्हिया यांमध्ये तपकिरी अस्वलांची संख्या खूप आहे. कोल्हे व लांगडे सर्वत्र आढळतात. नैर्ऋत्य यूरोपमधील उंच पर्वतरांगांमध्ये शॅमॉय व आयबेक्स ह्या शेळीसारख्या प्राण्यांची संख्या अधिक आहे.

भूमध्य समुद्र ते आर्क्टिक महासागर यांदरम्यानच्या वेगवेगळ्या प्रदेशांत एल्क, रेनडियर व विविध जातींची हरणे पहावयास मिळतात. आर्क्टिक, अटलांटिक व भूमध्य समुद्र यांच्या किनाऱ्यांपासून दूरच्या भागात सील सापडतात. यांशिवाय सामान्यपणे बिजू, ससा, हेज्‌हॉग, लेमिंग्ज, मोल, ऑटर, खार, रानडुक्कर हे प्राणी आढळतात. गरुड, बहिरी ससाणा, फिंच, चिमणी, बुलबुल पक्षी, घुबड, डोमकावळा, कोकिळ, सारिका, करकोचा, कबुतर इ. पक्ष्यांच्या प्रमुख जाती यूरोपमध्ये आढळतात.

अटलांटिक किनारा तसेच बाल्टिक, काळा समुद्र, कॅस्पियन, भूमध्य समुद्र व उत्तर समुद्र यांमध्ये अनेक जातींचे मासे मोठ्या प्रमाणावर सापडतात. त्यांपैकी अँकोव्ही, कॉड, फ्लाउंडर, हेरिंग, तलवार मासा, सॅमन, सार्डीन, स्टर्जन, ट्राउट व ट्यूना ह्या महत्त्वाच्या जाती आहेत. स्टर्जन माशांच्या अंड्यांचा उपयोग कॅव्हिआर हे मिष्टान्न तयार करण्यासाठी केला जातो.

भौगोलिक विभाग : यूरोप हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत लहान खंड असले, तरी येथे प्राकृतिक व सांस्कृतिक दृष्ट्या खूपच भिन्नता आढळते. भौगोलिक दृष्ट्या यूरोपचे मुख्य सात भौगोलिक विभाग पडतात.

(१) भूमध्य सागरी दक्षिण विभाग : या विभागात ग्रीस, इटली, स्पेन व पोर्तुगाल अशा मुख्य चार देशांचा व तुर्कस्तानच्या काही भागाचा समावेश होतो. भूस्वरूपदृष्ट्या या भागात खडबडीत अल्पाइन पर्वतश्रेण्या असून त्यांत ३,००० मी. पेक्षा अधिक उंचीची शिखरे आहेत. मैदानी प्रदेश त्या मानाने कमी आहेत. उत्तर इटलीमधील पो खोऱ्यात त्यांतल्यात्यांत विस्तृत मैदानी प्रदेश आहेत. हा भौगोलिक विभाग म्हणजे पश्चिम यूरोपीय सौम्य व आर्द्र हवामान विभाग आणि उत्तर आफ्रिकेचा उष्ण व कोरडे हवामान विभाग यांच्यातील संक्रमण प्रदेश आहे.(या विभागात उपोष्ण कटिबंधीय कोरडे हवामान असून येथील सर्व देश कृषिप्रधान आहेत). हिवाळ्यात अझोर्स जास्त भार प्रदेश दक्षिणेकडे सरकल्याने वर्षातील बहुतेक पाऊस याच काळात पडून जातो, तर उन्हाळ्यात हा भारपट्टा उत्तरेकडे सरकल्याने उन्हाळा कोरडा जातो. स्वच्छ व भरपूर सूर्यप्रकाश, सुंदर पुळणी, इतिहासप्रसिद्ध वास्तू, निसर्गरम्य परिसर यांमुळे या विभागात पर्यटन व्यवसायाचा विशेष विकास झालेला दिसतो. तुलनेने कमी सुपीक अशा जांभ्या मृदेखालील क्षेत्र अधिक आहे. नद्यांच्या खोऱ्यातील गाळाची मृदा व ज्वालामुखी मृदा या सुपीक मृदा आहेत. आर्थिक दृष्ट्या उपयुक्त खनिजांचे साठे या विभागात मर्यादित प्रमाणात आहेत. स्पेनमध्ये कोळसा व लोह इटलीत खनिज तेल व नैसर्गिक वायू, ग्रीसमध्ये बॉक्साइट, तर पोर्तुगालमध्ये टंगस्टन ही मुख्य खनिजे आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या तुलनेने लोकसंख्या अधिक असल्याने दरडोई उत्पन्न इतर यूरोपीय राष्ट्रांपेक्षा येथे कमी आहे.

(२) पश्चिम किनारी प्रदेश : या विभागात पश्चिमेकडील अटलांटिक किनाऱ्यावरील बेल्जियम, फ्रान्स व नेदर्लंड्स या तीन देशांचा समावेश होत असून, ही राष्ट्रे म्हणजे यूरोपची अटलांटिककडील प्रवेशद्वारेच आहेत. त्यामुळे आर्थिक व राजकीय दृष्ट्या त्यांचे स्थान मोक्याचे आहे. भूस्वरूपदृष्ट्या या विभागात खूपच भिन्नता आढळते. माँ ब्लां हे आल्प्समधील सर्वोच्च शिखर फ्रान्समध्ये आहे, तर नेदर्लंड्‌सचा बराचसा भाग सस.पेक्षाही कमी उंचीचा आहे. या विभागात हिवाळे सौम्य व सर्वसाधारणपणे हिमरहित, तर हिवाळे शीतल व अभ्राच्छादित असतात. पर्जन्यवृष्टी वर्षभर होत असली, तरी शरदऋतूच्या पूर्वार्धात वृष्टिमान थोडे अधिक असते. सर्वत्र रुंदपर्णी पानझडी अरण्ये असली, तरी पाइन वृक्षांचे विस्तृत पट्टेही पहावयास मिळतात. या विभागात करड्या तपकिरी पॉडझॉल मृदेखालील क्षेत्र अधिक आहे. कोळसा, लोह खनिज, पोटॅश, बॉक्साइट, खनिज तेल व नैसर्गिक वायू या आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या खनिजांचे या विभागात आधिक्य आहे. शेती, उद्योग व व्यापार यांत हा विभाग अग्रेसर आहे. लोकसंख्येच्या घनतेबाबत मात्र भिन्नता आढळते. फ्रान्स विस्ताराने मोठा असला, तरी तेथे लोकसंख्येची घनता कमी आहे, तर नेदर्लंड्‌स व बेल्जियम या आकाराने लहान असलेल्या देशांत ती जास्त आहे.

(३) द्वीपीय प्रदेश : यामध्ये ब्रिटन व आयर्लंड बेटांचा म्हणजेच ग्रेट ब्रिटन व आयर्लंड या देशांचा समावेश होतो. या दोन्ही बेटांमध्ये स्थान, हवामान, वनस्पती व मृदा यांबाबतीत साम्य असले, तरी तलशिला भिन्न असल्यामुळे खनिज साठ्यांच्या बाबतीत भिन्नता आढळते. आयर्लंड बेटावर कोळशाच्या साठ्यांचा अभाव आहे, तर ब्रिटनमध्ये कोळशाचे विपुल साठे आहेत. आयर्लंडवर मुख्य व्यवसाय शेती असून लोकसंख्या तुलनेने विरळ आहे. याउलट ब्रिटनमध्ये औद्योगिक प्रगती प्रचंड प्रमाणात झालेली असून लोकसंख्याही खूप दाट आहे. या भौगोलिक प्रदेशामध्ये सागरी हवामान असून वर्षभर सर्व ऋतूंत पुरेशी वृष्टी होते. दोन्ही बेटांवर स्थानिक रुंदपर्णी पानझडी वृक्षांची अरण्ये आढळतात. मात्र त्यांतील बरीचशी अरण्ये शेती, जहाजबांधणी, लाकूड व लोणारी कोळसा यांसाठी तोडली गेली आहेत. येथे करडी – तपकिरी पॉडझॉल मृदा आढळते.

(४) जर्मनीचा अंतरक प्रदेश : या विभागात पूर्व व पश्चिम जर्मनी, ऑस्ट्रिया व स्वित्झर्लंड या देशांचा समावेश होत असून या भागात जर्मन भाषेचे प्रभुत्व आढळते. या देशांचे स्थान खंडाच्या मध्यवर्ती असून त्यांचा सांस्कृतिक वारसा सारखाच आहे मात्र भूस्वरूपांमध्ये बरीच भिन्नता आढळते. पूर्व जर्मनीचा बहुतांश भाग मैदानी स्वरूपाचा आहे, तर स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया यांत आल्प्स पर्वतरांगा आहेत. ऑस्ट्रियातील डॅन्यूब खोरे मैदानी स्वरूपाचे आहे. पश्चिम जर्मनीत मात्र यूरोपातील उत्तर मैदानी, मध्यवर्ती उच्चभूमी व अल्पाइन पर्वतप्रदेशांचा विस्तार आढळतो. पश्चिमेकडील सागरसान्निध्याच्या भागात सौम्य व बर्फरहित हिवाळे असतात, तर पूर्वेकडे व अधिक उंचीच्या प्रदेशात हवामान थंड असून तेथे बर्फवृष्टी होत असते. त्यामुळेच पूर्व जर्मनी, स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया या देशांत हिवाळे कडक असतात. पूर्वेकडील खंडीय भागातील उन्हाळे उबदार असतात, तर दक्षिणेकडील उंचीच्या प्रदेशांत ते अधिक शीत असतात. अशा संपूर्ण भौगोलिक प्रदेशातील ऱ्हाईन खचदरी व व्हिएन्ना खोरे हे अधिक उबदार भाग आहेत. या प्रदेशातील वनस्पती व मृदा यांमध्ये भिन्नता आढळते. उबदार हवामानाच्या सखल प्रदेशात रुंदपर्णी पानझडी अरण्ये, व थंड हवामानाच्या उच्चभूमीच्या प्रदेशात सूचिपर्णी अरण्ये आढळतात. येथून लाकडाचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन घेतले जाते. ऱ्हाईन व व्हिएन्ना ही सुपीक मृदेची खोरी आहेत. कोळश्याच्या साठ्यांसाठी हा विभाग जगप्रसिद्ध असून खनिज तेल व नैसर्गिक वायूचेही साठे आहेत. सर्वत्र सखोल शेती केली जाते. अर्थव्यवसाय मुख्यतः उद्योग व व्यापाराधिष्ठित असून स्वित्झर्लंड व ऑस्ट्रियात पर्यटन हा उत्पन्नाचा मुख्य आधार आहे.

(५) पूर्व यूरोपीय विभाग : यामध्ये अल्बेनिया, बल्गेरिया, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रूमानिया व यूगोस्लाव्हिया या साम्यवादी देशांचा समावेश होतो. येथे सांस्कृतिक भिन्नता आढळते. पूर्व यूरोपमधून गेलेले मैदानी प्रदेशाचे दोन पट्टे आढळतात. उत्तरेकडील, विशेषतः पोलंडमधील, सखल प्रदेश व दक्षिणेकडील हंगेरी, यूगोस्लाव्हिया व रुमानियामधील डॅन्यूब खोरे या दोन सखल प्रदेशांच्या दरम्यान कार्पेथियन, ट्रान्सिल्व्हेनियन आल्प्स यांसारखे पर्वतीय तसेच पठारी प्रदेश आहेत. डॅन्यूब खोऱ्याच्या दक्षिणेलाही यूगोस्लाव्हिया, अल्बेनिया व बल्गेरिया या देशांतून दिनारिक आल्प्स, बाल्कन, रॉडॉपी पर्वतश्रेण्या गेलेल्या आहेत.

या पूर्व यूरोपीय भौगोलिक विभागातील हवामान खंडीय प्रकारचे असून हिवाळे थंड व हिममय आणि उन्हाळे उबदार व आर्द्र असतात. सर्व ऋतूंत वृष्टी होत असली, तरी हंगेरी – रूमानियाच्या मैदानी प्रदेशात वनस्पतींच्या वाढीच्या दृष्टीने पुरेशी वृष्टी होत नाही. त्यामुळे या विभागांच्या पश्चिम भागात स्टेप वनस्पती आढळतात. बाकीच्या प्रदेशात रुंदपर्णी पानझडी अरण्ये व अधिक उंचीवर सूचिपर्णी अरण्ये आढळतात. डॅन्यूब खोऱ्यात चेर्नोसेम मृदा, चेकोस्लोव्हाकियात करडी – तपकिरी पॉडझॉल मृदा, तर बाल्कन विभागात राखाडी करडी पॉडझॉल मृदा आढळते. हवामान व मृदा यांतील भिन्नतेनुसार कृषिव्यवसायात भिन्नता आढळते. शेतीमध्ये अधिक लोक गुंतले असले, तरी दुसऱ्या महायुद्धापासून औद्योगिकीकरणावरही या राष्ट्रांनी भर दिलेला आहे. कोळसा, लोह खनिज, खनिज तेल, बॉक्साइट इ. महत्त्वाच्या खनिजांच्या साठ्यांमुळे युद्धोत्तर काळात या राष्ट्रांनी उल्लेखनीय प्रगती केलेली आहे.

(६) उत्तर सरहद्द विभाग : सांस्कृतिक व ऐतिहासिक साम्य असलेल्या ह्या सहाव्या भौगोलिक विभागात नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, डेन्मार्क व आइसलँड या पाच देशांचा समावेश होतो. मानवी वस्तीचा ध्रुवाकडील अगदी उत्तरेकडील हा भौगोलिक विभाग असून तेथे लोकसंख्याही विरळ आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती अपुरी असली, तरी इतर यूरोपीय राष्ट्रांप्रमाणे आपले राहणीमान टिकविण्याचा हे देश आटोकाट प्रयत्न करीत असल्याचे आढळते. भौगोलिक परिस्थितीच्या (विशेषतः भूपृष्ठरचना व हवामान) प्रतिकूलतेमुळे नॉर्वेची तीन – चतुर्थांश व आइसलँडची सात – अष्टमांश भूमी अनुत्पादक बनली आहे. त्यामुळे येथे वनस्पतींची व पिकांची वाढ योग्य प्रकारे होऊ शकत नाही. नॉर्वेचा एक – चतुर्थांश भाग, स्वीडनचा निम्म्यापेक्षा अधिक प्रदेश, तर फिनलंडचा तीन – चतुर्थांश प्रदेश अरण्यांखाली आहे. डेन्मार्कची तीन – चतुर्थांश भूमी पिकांखाली किंवा कुरणांखाली आहे त्यामुळे येथील पशुपालन व दुग्धोत्पादन व्यवसाय मोठा आहे. स्वीडनमध्येच फक्त लोह खनिजांचे भरपूर साठे आहेत. इतर देशांत मात्र आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची खनिजे सापडत नाहीत. कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायू यांच्या अभावामुळे शक्तिसाधन म्हणून जलविद्युत्‌ शक्तीचा अधिकाधिक उपयोग केला जातो. हवामान व जमीन यांच्या प्रतिकूलतेमुळे शेती व्यवसाय मर्यादित प्रमाणात चालतो. नॉर्वे, स्वीडन व फिनलंड यांच्या अर्थव्यवस्थांत अरण्योद्योगाला विशेष महत्त्वाचे स्थान आहे, तर मासेमारी हा नॉर्वे व आइसलँड यांमधील प्रमुख व्यवसाय आहे. औद्योगिकीकरणाला या विभागात थोडी उशिराच सुरुवात झालेली दिसते.

यूरोपियन रशिया : यूरोपच्या ह्या सातव्या भौगोलिक प्रदेशात रशियाच्या यूरोपीय भागाचा समावेश होतो. सोव्हिएट रशियाचा हा औद्योगिक दृष्ट्या विकसित आणि दाट लोकवस्तीचा प्रदेश आहे. जगातील ही एक बलाढ्य औद्योगिक आणि लष्करी शक्ती आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने इतर सहा भौगोलिक विभागांपेक्षा हा विभाग मोठा असून त्यामानाने लोकसंख्या मात्र कमी आहे. या भौगोलिक विभागात उत्तरेकडे व पूर्वेकडे तपमान कमी होत जाते, तर वृष्टिमान दक्षिणेकडे व पूर्वेकडे कमी होत जाते. त्यानुसार आर्क्टिक महासागर व कॅस्पियन समुद्र यांदरम्यान वनस्पती प्रकारांचे प्रमुख सात पट्टे आढळतात : उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे टंड्रा, तैगा (सूचिपर्णी अरण्ये), मिश्र अरण्ये, पानझडी अरण्ये, स्टेप, अर्ध – वाळवंटी आणि वाळवंटी वनस्पती, हे ते सात पट्टे होत. यांशिवाय दक्षिणेकडील भागात भूमध्य सागरी प्रकारच्या वनस्पती आहेत. वनस्पतींप्रमाणेच येथे टंड्रा, पॉडझॉल, करडी – तपकिरी पॉडझॉल, चेर्नोसेम, तपकिरी स्टेप, करडी वाळवंटी व जांभी असे मृदाप्रकार आढळतात. डोनेट्‌स खोऱ्यातील कोळसा क्षेत्र, क्रिव्हाइ रोग येथील लोह खनिज क्षेत्र व व्होल्गा – उरल यांदरम्यानचे खनिज तेल साठे ही प्रमुख खनिजे असून त्यांशिवाय मँगॅनीज, निकेल, बॉक्साइट, तांबे ही यूरोपीय रशियातील प्रमुख खनिज उत्पादने आहेत. यांशिवाय युक्रेनचे समृद्ध कृषिक्षेत्र, उत्तरेकडील विस्तीर्ण अरण्ये, व्होल्गा व नीपरवरील जलविद्युत्‌निर्मिती, वाहतुकीच्या मार्गांचा विकास यांमुळे आधुनिक सोव्हिएट रशियातील हे प्रसिद्ध औद्योगिक केंद्र बनले आहे.

लेखक : चौधरी, वसंत

इतिहास : प्रागैतिहासिक कालखंड (सु. ५,००,००० ते ५,००० वर्षे). यूरोपच्या या आद्य कालखंडाची विभागणी पुराणाश्मयुग, आंतराश्मयुग आणि नवाश्मयुग अशा तीन युगांमध्ये केली जाते. पुराणाश्मयुगाच्या प्रारंभापासून मानवसदृश प्राणी किंवा आदिमानव, तर या युगाच्या अखेरीपासून ज्याला मानवशास्त्रज्ञ होमो सेपियन म्हणजे पूर्णार्थाने मानव म्हणतात, असा मानव यूरोपात वावरत होता. गवे, अस्वले, रानबैल, गेंडे, भीमगज यांसारख्या प्राण्यांच्या सान्निध्यात राहणाऱ्या मानवाने त्या काळात प्रामुख्याने दगडी शस्त्रांचा आणि हत्यारांचा वापर केला. या दगडी आयुधांच्या गुणवत्तेच्या निकषावरच मुख्यतः प्रागैतिहासिक काळाची विभागणी केली जाते. पुराणाश्मयुगापासून नवाश्मयुगापर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडात मानवाची प्रगती संथगतीने होत राहिली. पुराणाश्मयुगात मानव शिकारी आणि मच्छीमार होता. आंतराश्मयुगात तृणभक्षक प्राणी माणसाळविण्यास प्रारंभ झाला. त्यातून पशुपालन हा महत्त्वाचा व्यवसाय बनला. नवाश्मयुगात शेतीची कला मानावाने आत्मसात केली. त्यामुळे मानवी जीवनाला स्थैर्य प्राप्त झाले. नैसर्गिक गुहा हे मानवाचे पहिले घर होते, तर नवाश्मयुगातील मानव दगड, माती, लाकूड यांपासून झोपडीवजा घरे बांधू लागला होता. स्वित्झर्लंडमध्ये आणि नंतर अन्य काही यूरोपीय प्रदेशांत मानवाने बांधलेल्या गर्तावास (तळातल्या घरांचे) अवशेष सापडले आहेत. वस्त्रविहीन अवस्थेत अवतरलेल्या मानवाने प्रथम प्राण्यांची कातडी व झाडपाल्याची वस्त्रे वापरण्यास सुरुवात केली, तर नवाश्मयुगात तो सुती कपडे तयार करू लागला. रानटी अवस्थेतच मानवाला अग्नीचे रहस्य उमजले आणि नवाश्मयुगातील चाकाच्या शोधाने तर सर्वांगीण मानवी प्रगतीला चालना मिळाली. मानवाने प्रथम छोट्या प्रमाणावरील कुटुंबजीवन जगायला सुरुवात केली. पुढे समूहजीवनाचा घेर वाढत गेला आणि राज्यसंस्थेसारखी नियंत्रक व्यवस्था नवाश्मयुगाच्या अखेरीस उगम पावली. निसर्गाविषयीची उत्सुकता, भीती आणि कृतज्ञता या भावनांमधून मानवाचे धर्मजीवन सुरू झाले असावे. निसर्गपूजा व जादूटोण्याला त्यामध्ये स्थान होते. काही अंत्यविधी व अंत्यसंस्कार यांवरून पारलौकिक जीवनाविषयीच्या कल्पनाही स्पष्ट होतात. शेतीच्या प्रारंभानंतर आदिमातेच्या पूजेची चाल स्थिरावली. नवाश्मयुगात इंग्लंडमधील स्टोनहेंजसारखी पूजास्थाने निर्माण होऊ लागली. मानवाचे कलाजीवन प्रागैतिहासिक काळातच फुलून आले. पुराणाश्मयुगातील विशेषतः फ्रान्स व स्पेनमधील अनुक्रमे लॅस्को व अल्तामिरा येथील गुहाचित्रे विशेष प्रसिद्ध आहेत. इ. स. पू. ३००० च्या सुमारास नवाश्मयुगाचा अस्त झाला व प्राचीन संस्कृतींचे वैभवशाली युग सुरू झाले. [⟶ आदिमकला प्रागैतिहासिक कला].

इजीअन संस्कृती : जगातील सर्वांत प्राचीन संस्कृती यूरोपबाहेर ईजिप्त, मेसोपोटेमिया व भारत या देशांमध्ये उदयास आल्या. यूरोपात मात्र ब्राँझयुगात संस्कृतीचा उदय झाला. यूरोपीय भूमीवर सुसंस्कृत समाज स्थिरावले ते प्रथम  ⇨ क्रीट व नंतर ⇨ ग्रीसमध्ये इ. स. पू. ३००० ते ११०० या कालखंडात यूबीआ, मिटिलीनी, थेसॉस, सॅमोथ्रेस, सिक्लाडीझ, सेमॉस, क्रीट इ. बेटांवर सुसंस्कृत समाजजीवन नांदत होते. ही इजीअन किंवा हेलाडिक संस्कृती म्हणून प्रसिद्ध असून मिनोअन (क्रीटन) आणि मायसीनीअन असे तिचे दोन प्रमुख कालखंड मानले जातात. ग्रीसच्या आग्नेयीस सु. १३० किमी. वर असणारे क्रीट हे यूरोपातील संस्कृतीचे पहिले महत्त्वाचे केंद्र. नॉसस हे राजधानीचे शहर भव्य राजप्रासाद, प्रेक्षागृहे आणि हवेल्यांनी नटलेले होते. यूरोप, आशिया व आफ्रिका या त्रिखंडांना जवळ असल्याने क्रीट महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनले. भव्य इमारती, उत्कृष्ट भित्तिचित्रे, प्रगल्भ कुंभारकाम, ब्राँझ व लोखंडाचे धातुकाम, लेखन कलेचा विकास, व्यापारी प्रगती, सुखवस्तू समाजजीवन ही इजीअन संस्कृतीची काही ठळक वैशिष्ट्ये होती. ग्रीक संस्कृतीवर तिचा ठसा उमटलेला आहे [⟶ इजीअन संस्कृति].

ग्रीक संस्कृती : ग्रीस हा प्राचीन पौर्वात्य व आधुनिक यूरोपीय संस्कृतींना जोडणारा दुवा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here