ताज्या बातम्या

चिपळूणकर, विष्णुशास्त्री माहिती


चिपळूणकर, विष्णुशास्त्री : (२० मे १८५०–१७ मार्च १८८२). ‘आधुनिक मराठी गद्याचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार. त्यांच्या अगोदर आधुनिक मराठी गद्य जवळजवळ अर्ध्या शतकाहून अधिक काळ निर्माण होत होते परंतु त्यांनी त्याला अधिक प्रभावी स्वरूप प्राप्त करून दिले. विष्णुशास्त्र्यांचा जन्म पुण्याचा. मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची परीक्षा पुण्याच्या ‘डेक्कन कॉलेजा’तून ते उत्तीर्ण झाले. (१८७२) त्यानंतर  पुणे व रत्नागिरी येथील सरकारी माध्यमिक शाळांतून त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. (१८७२–७९). विष्णुशास्त्र्यांचे वडील कृष्णशास्त्री हे संस्कृतज्ञ. इंग्रजी साहित्याचे जाणकार, रसिक, विद्वान आणि चतुरस्त्र मराठी लेखक असल्यामुळे विष्णुशास्त्र्यांनाही लेखनवाचनाची गोडी लागली. कृष्णशास्त्र्यांनी चालविलेल्या शालापत्रक  ह्या मासिकातून विष्णुशास्त्र्यांच्या लेखनाचा आरंभ झाला (१८६८) व त्यानंतर काही वर्षांतच ते ह्या मासिकाचे संपादकही झाले. तथापि त्यांच्या संपादकीय कारकीर्दीत शालापत्रकातून सरकार व ख्रिस्ती मिशनरी ह्यांच्यावर त्यांनी केलेल्या खोचक टीकेचा गवगवा होऊन शालापत्रक  बंद पडले (१८७५). सरकारी नोकरीत असतानाच त्यांनी ⇨निबंधमाला, हे सुप्रसिद्ध मासिक काढले (१८७४). तसेच ज. बा. मोडक आणि का. ना. साने ह्यांच्या सहकार्याने काव्येतिहाससंग्रह  हे मासिक सुरू केले (१८७८). आपल्या देशातील लोकांनी रचिलेली काव्ये, लिहिलेले इतिहास, बखरी असे साहित्य प्रसिद्ध करून त्यामार्गे देशसेवा करणे, हा हे मासिक काढण्यामागील हेतू होता. तथापि ह्या मासिकावर विष्णुशास्त्र्यांनी संपादक म्हणून आपले नाव घातले नव्हते. १८८० मध्ये नव्या पिढीच्या मनावर देशाभिमानाचे संस्कार करण्यासाठी टिळक-आगरकरांच्या सहकार्याने त्यांनी पुण्यात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ही ख्यातनाम शाळा स्थापन केली. त्याच वर्षी कडव्या राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारी दोन वृत्तपत्रे – केसरी  हे मराठी आणि मराठा हे इंग्रजी-त्यांनी काढली. ह्यांशिवाय चित्रशाळा, आर्यभूषण छापखाना, किताबखाना ह्यांसारखे समाजशिक्षणोपयोगी उपक्रम त्यांनी सुरू केले.

निबंधमाला हे विष्णुशास्त्र्यांचे प्रमुख जीवितकार्य. निबंधमालेच्या सात वर्षांच्या कारकीर्दीत निघालेल्या सर्वच्या सर्व म्हणजे ८४ अंकांतील लेखन विष्णुशास्त्र्यांनी जवळजवळ एकटाकी केले. निबंधमालेत विविध विषयांवर लिहिलेल्या त्यांच्या निबंधानी मराठी निबंधाला सामर्थ्य दिले आणि त्याच्या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेले सॅम्युएल जॉन्सनच्या रासेलस  ह्या ग्रंथाचे भाषांतर विष्णुशास्त्र्यांनीच शालापत्रकातून क्रमशः पूर्ण केले. ह्याच मासिकातून कालिदास, भवभूती, बाण, सुबंधू आणि दंडी ह्या संस्कृत कवींवर त्यांनी जे समीक्षात्मक निबंध लिहिले, ते पुढे संस्कृत कविपंचक  ह्या नावाने प्रसिद्ध झाले (आवृ. दुसरी, १८९१). ह्या निबंधानी काव्यसमीक्षेच्या पाश्चात्त्य दृष्टीला महत्त्व दिले व प्राचीन कवींचा काल, कविता आणि कला ह्यांच्या मीमांसेत ऐतिहासिक दृष्टी वापरली.

शालापत्रक, निबंधमाला, केसरी   इ. नियतकालिकांतून विष्णुशास्त्र्यांनी जे लेखन केले ते भाषा-साहित्यविषयक, सामाजिक, राजकीय असे विविध प्रकारचे आहे. त्यांच्या भाषा-साहित्यविषयक लेखांत मराठी भाषेची तत्कालीन स्थिती, भाषापद्धती, परभाषेतील शब्दांची योजना, इंग्रजी भाषा, कविता, विद्वत्व आणि कवित्व, ग्रंथांवरील टीका वगैरे विषयांवरील लेखन अंतर्भूत आहे. लोकभ्रम, अनुकरण, गर्व ह्यांसारखे विषय त्यांच्या सामाजिक लेखनात आलेले आहेत. ‘आमच्या देशाची स्थिती’ आणि ‘मुद्रणस्वातंत्र्य हे दोन लेख त्यांच्या राजकीय लेखनापैकी विशेष उल्लेखनीय होत.

स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा ह्यांविषयीचा अभिमान ही त्यांच्या लेखनामागील प्रेरणा होती. ह्या तिन्ही संदर्भांत सामान्यतः उदासीन असलेल्या आणि इंग्रजी राजवटीच्या आहारी जाऊन स्वतःचा देश, त्याने दिलेला सांस्कृतिक वारसा आणि परंपरा ह्यांना कमी लेखणाऱ्या तत्कालीन सुशिक्षितांना चेतवणी देणे हा त्यांच्या लेखनामागील एक प्रमुख हेतू होता. तो साधण्यासाठी सालंकार, संस्कृत काव्यशैली आणि ॲडिसन, मेकॉले ह्या इंग्रजी निबंधकारांचे डौलदार निबंधलेखन ह्यांच्या संस्कारांतून घडलेली समर्थ आणि प्रभावी गद्यशैली त्यांनी वापरली. स्वमताविषयी तारुण्यसुलभ अभिनिवेश आणि परमतखंडनातील धारदार उपहास-उपरोध, सुभाषितांचा मार्मिक उपयोग, पल्लेदार वाक्यरचना ही त्यांच्या शैलीची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. ह्या लेखनाने मराठी गद्याला प्रौढता आणली अनेकांना राष्ट्रभक्तीची, इतिहाससंशोधनाची आणि साहित्यसेवेची प्रेरणा दिली. राजकीय वा सामाजिक चळवळीत विष्णुशास्त्री प्रत्यक्ष पडले नाहीत आपला परंपराभिमानी राष्ट्रवाद जोपासण्याच्या भरात प्रार्थनासमाज, आर्यसमाज, सत्यशोधक समाज, आंग्लशिक्षित सुधारक मंडळी, ख्रिस्ती धर्मोपदेशक ह्यांना सरसकट परधार्जिणे ठरवून त्यांनी जी अनुदार टीका केली, तीत व्यापक सामाजिक जाणिवेचा अभाव होता. हे आता कालौघाबरोबर स्पष्ट झाले आहे. पुणे येथे ते निधन पावले.

संदर्भ : १. चिपळूणकर, ल. कृ. कै. विष्णुशास्त्री चिपळूणकर ह्यांचे चरित्र, पुणे, १८९४.

२. जोशी, लक्ष्मणशास्त्री, आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा आणि रससिद्धांत , पुणे,  १९७२.

३. बुद्धीसागर, मा. ग. संपा. चिपळूणकर लेख-संग्रह, नवी दिल्ली, १९६३.

४. माडखोलकर, ग. त्र्यं. चिपळूणकर काल आणि कर्तृत्व, अमरावती, १९५४.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *