ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

गावरान कांदादराने गाठली चाळीशी

अवकाळी पावसामुळे आगमन लांबलेला गावरान कांदा आता पावसाला सुरुवात झाल्यानंतर चांगलाच भाव खात आहे. स्थानिक बाजार समितीत गावरान कांद्याला २४०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला, तर किरकोळ बाजारात हा कांदा चाळीस रुपये किलोने विकला जात आहे.

कांद्याचे दर वधारल्याने आतापर्यंत साठवून ठेवलेला कांदा काही प्रमाणात शेतकऱ्यांनी बाजारात आणला आहे.

विदर्भात प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यात गावरान कांद्याचे (उन्हाळ) पीक घेतले जाते. साधारणतः मे महिन्यात या कांद्याचे बाजारात आगमन होते. यंदा मात्र अवकाळी पावसाने या कांद्याचे नुकसान केल्याने व प्रतवारीसह उत्पादनाची सरासरी घसरली आहे. बाजारात नाशिक आणि गुजरातमधून आलेला कांदा मुबलक होता. मात्र तो नाशवंत असल्याने त्याचा साठा ग्राहक करू शकत नसल्याने त्याला गरजेपुरताच उठाव होता.

दीर्घ कालावधीसाठी टिकून राहण्याच्या गुणधर्मामुळे गावरान कांद्याला ग्राहकांकडून मोठी मागणी राहते. यंदा मात्र कांदा अवकाळी पावसाने खराब झाल्याने उत्पादन कमी झाले आहे. जूनपर्यंत कांद्याला अपेक्षित भावही नव्हता. त्यामुळे उत्पादकांनी साठा करून ठेवत बाजारातील आवक रोखून धरली होती.

पहिला पाऊस पडताच कांद्याचे भाव अचानक वधारले. गावरान कांद्याने घाऊक बाजारात २४०० रुपयांपर्यंत उसळी घेतली. पाऊस पडल्यानंतर हे भाव आणखी वाढण्याचे संकेत खरेदीदारांनी दिले आहेत. जुलैमध्ये कांदा घाऊक बाजारात ४००० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.स्थानिक बाजारपेठेत रविवारी (ता. २५) गावरान कांद्याला १००० ते २४०० रुपये भाव मिळाला. ३७० क्विंटल कांद्याची आवक नोंदविण्यात आली. भाव वधारल्याने आता आवकही वाढण्याची शक्यता आहे. घाऊक बाजारात गावरान कांदा ३० रुपये किलोने विकला जात असून तोच कांदा इतवाऱ्यातील भाजीबाजारात ३५ रुपये व किरकोळ विक्रेत्यांकडे ४० रुपये किलोने विकला जात आहे.

गावरान कांद्याचे दर (प्रति किलो)

शेतकरी : २४ रुपये

घाऊक बाजारातील व्यापारी : ३० रुपये

भाजीबाजार (इतवारा) : ३५ रुपये

किरकोळ विक्रेता : ४० रुपये

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button