पहिल्याच पावसात सरकार वाहून गेलं; सामनातून शिंदे सरकारवर निशाणा
मुबई : 24 जूनला मुंबईत पहिला पाऊस आला. या पहिल्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं. त्यामुळे मुंबईकरांकडून पहिल्याच पावसात संताप व्यक्त झाला.
या मुद्द्यावरून आजच्या सामनातून राज्य सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. शनिवारच्या पहिल्याच पावसात सरकार वाहून गेलं, असं सामनात म्हणण्यात आलं आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका वक्तव्यावरही सामनातून टीकास्त्र डागण्यात आलं आहे.
सामना अग्रलेख जसाच्या तसा…
शनिवारच्या पहिल्याच पावसात सरकार वाहून गेले. अजून तर संपूर्ण पावसाळा बाकी आहे . या काळात आणखी किती आणि कोणत्या प्रसंगांना तोंड देण्याची वेळ मुंबईकरांवर येईल , हे सांगता येणे कठीण आहे . कारण फक्त वल्गना , घोषणा आणि गर्जना यापलीकडे सरकारचे कुठलेच अस्तित्व नाही . पुन्हा त्यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाचे प्रायश्चित्त घेण्याऐवजी ‘ पावसाचे स्वागत करा , तक्रारी काय करता ?’ असा उफराटा सवाल जनतेलाच करणारे राज्यकर्ते मुंबईकरांच्या बोकांडी बसले आहेत . हा उद्दाम कारभार मुंबईतील मतदार उद्या पावसाच्या याच तुंबलेल्या पाण्यात बुडवतील हे विसरू नका !
खडलेल्या मान्सूनने अखेर मुंबईसह महाराष्ट्रात आगमन केले आहे. राज्यात सर्वदूर हातपायदेखील पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला असला तरी इकडे मुंबईकर मात्र धास्तावला आहे. कारण शनिवारच्या पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडविली आहे आणि त्यात मिंधे सरकारचे सगळे दावे वाहून गेले आहेत.
अस्मानी आणि सुलतानी या कोंडीत पुढील दोन-तीन महिने आपला श्वास गुदमरणार, अशी भीती मुंबईकर जनतेला वाटत आहे. शनिवारी रात्री मुंबईत एका तासात 70 मिलिमीटर पाऊस कोसळला हे खरे असले तरी राणाभीमदेवी थाटात केलेले सरकारचे नालेसफाईचे दावे पोकळच ठरले.
यंदा पाणी तुंबणार नाही, मुंबईकरांना त्रास होणार नाही, असेही वादे मिंधे-फडणवीस सरकारने जोरशोरात केले होते. मात्र हे वादे म्हणजे फेकूगिरी होती हे शनिवारी दिसले. 70 मिलीमीटर पावसामुळे जर मुंबईची ही दशा होत असेल तर पुढील दोन-तीन महिन्यांत आपली काय दुर्दशा होणार? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. त्यात मुंबईकरांना आश्वस्त करण्याऐवजी त्यांनाच उफराटे सवाल करून धारेवर धरणारे राज्यकर्ते मिंधे सरकारच्या रूपाने महाराष्ट्रात आहेत. तुंबलेल्या पाण्यामुळे हवालदिल झालेल्या जनतेला ‘तक्रारी काय करता, पावसाचे स्वागत करा,’ असा अजब ‘सल्ला’ मुख्यमंत्री मिंधे यांनी दिला आणि जनतेच्या जखमेवर मीठच चोळले.
तुमचे काम चोख असते तर पहिल्याच पावसात 1200 तक्रारी करण्याची वेळ सामान्य मुंबईकरांवर आलीच नसती. जलमय झालेल्या मीलन सब-वेची पाहणी करण्याची नौटंकी करण्याची वेळ तुमच्यावरही आली नसती. पुन्हा विरोधकांनी तुमच्या या शिरजोरपणावर बोट ठेवले तर त्यातही तुम्हाला तुमची बदनामी दिसते. मुळात पहिल्याच पावसाने तुमच्या दाव्यांचे झालेले वस्त्रहरण हे तुमचेच पाप आहे. निदान यापुढील काळात तरी ते कसे झाकता येईल आणि मुंबईकरांना कमीत कमी त्रास कसा होईल, याचा विचार करा. नुसत्या पाहणी दौऱ्यांनी ते साध्य होणार नाही.