करमल घाटात झालेल्या कारच्या अपघातात एक जण ठार झाला आहे. ही कार टँकरला धडकून दरीत कोसळल्याचे सांगितले जात आहे. अरूण गांधी (वय 19) असे मृताचे नाव आहे. उर्वरीत चार जण जखमी झाले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अंधेरी (मुंबई) येथून हे पाच जण कारमधून गोव्यात फिरण्यासाठी आले होते. त्यांनी मडगावहून ‘रेंट अ कार’ बुक केली होती. सोमवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास ते पाळोळे येथून मडगावच्या दिशेने निघाले होता.
करमल घाटात अरुंद रस्ता व धोकादायक वळणावर त्यांची कार पोहोचली असता मडगावहुन कारवारच्या दिशेने निघालेल्या टँकरची त्यांच्या कारला जोरदार धडक बसली. त्यामुळे कार सुमारे 10 मीटर खोल दरीत कोसळली.
त्यात अरुण गांधी जागीच ठार झाला. तर मेद पाटवा (19), अमेय जनत्रे (19), सिया चोरडीया (19) व सेहावी लोढा हे चौघे जखमी झाले. त्यांना काणकोणच्या सरकारी रूग्णालयात प्राथमिक उपचारानंतर मडगाव येथील जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.