ताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

वारकऱ्यांसोबत घडलेला प्रकार संतापजनक, कणकवलीत शिवसेनेचे आंदोलन; सरकारचा केला निषेध


कणकवली : श्री क्षेत्र आळंदी येथे दिंडी सोहळ्यासाठी आलेले वारकरी अन् पोलिसांच्यात झालेली झटापट ही घटना संतापजनक आहे. याप्रकरणी दोषींची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी. अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) पक्षाच्यावतीने करण्यात आली. सोमवारी कणकवली तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार आर.जे.पवार यांना निवेदनही देण्यात आले.

या आंदाेलनात ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन अनेकांनी वारकऱ्यांची वेशभूषा केली होती. टाळ, मृदंगाच्या गजरात मोर्चा कणकवली तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. शिवसेना आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत, संदेश पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हा प्रमुख सुजित जाधव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, राजू राणे, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, तेजस राणे, कन्हैया पारकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, सचिन सावंत, रुपेश आमडोसकर, मंगेश सावंत, सचिन आचरेकर, तानाजी कांबळे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

आमदार वैभव नाईक म्हणाले, आम्ही शिंदे-फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करतो. आळंदी येथील श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या दरम्यान वारकरी व पोलिसांमध्ये मंदिर प्रवेशावरुन वाद उपस्थित झाला होता. त्याही पुढे जाऊन भगवा ध्वज खांद्यावर घेऊन हरिनामाचा गजर करणाऱ्या वारकऱ्यांसोबत पोलिसांची झटापट झाली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याने थोडी तरी लाज बाळगावी. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी असे सांगितले.

सतीश सावंत व संदेश पारकर यांनी मनोगत व्यक्त करताना याप्रकरणी संबंधितावर कारवाई न झाल्यास भविष्यात जनआंदोलन उभारणार असल्याचे सांगितले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *