18.6 C
New York
Monday, April 29, 2024

Buy now

११ हजार शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतिक्षेत; पीकविम्याची रक्कमही लटकली

- Advertisement -

कोल्हापूर : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून जिल्ह्यातील ११ हजार ७३८ शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. जिल्ह्यातील १ लाख ७५ हजार ८२२ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असताना अकरा हजार शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवले आहे. उद्या (ता. १३) कोल्हापूर दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची दखल घेणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच ९ जुलै २०२२ ला भुईमूग, सोयाबीनसाठी घेतलेल्या पिकविम्याची रक्कम देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून चालढकल केली जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिक आणि वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले आहे. नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२०२० या तीन वर्षात घेतलेल्या कर्जापैकी सलग दोन वर्ष वेळेत पिककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा फायदा होणार आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात या योजनेचाला लाभ मिळावा यासाठी ३ लाख ९४४ शेतकऱ्यांचे अर्ज अपलोड झाले होते. मात्र, यापैकी १ लाख ७५ हजार ८२२ शेतकऱ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आत्तापर्यंत ६३९ कोटी ५५ लाख रुपये जमा झाले आहेत. शासनाने जाहीर केलेली पहिली, दुसरी आणि तिसऱ्या यादीत अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. आता जिल्ह्यातील ११ हजार ७३८ शेतकरी अनुदानाची रक्कम कधी मिळणार यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालय, तहसलिदार कार्यालय आणि सहकारी सेवा संस्थांमध्ये विचारणा करत आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयसह कोणतीही संस्था याबद्दल ठोस आणि योग्य उत्तर देत नाही. त्यामुळे ही रक्कम मिळणार की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

या अकरा हजार शेतकरी शासकीय सर्व नियम आणि अटींमध्ये पात्र ठरले असतानाही त्यांना अनुदानाच्या रक्कमेपासून वंचित ठेवले जात आहे. आधार प्रमाणीकरण, बँक खाते क्रमांक, बँकेचा आएएफसी कोड नंबर भरताना चूक केली असल्यास खात्यावर पैसे जमा केलेले नसल्याचे कारण सांगितले जात होते. आता या शेतकऱ्यांचे खाते किंवा आधार प्रमाणीकरण होवूनही या शेतकऱ्यांच्या नावावर रक्कम जमा झालेली नाही.

ज्यांचे खाते प्रमाणीकरण झालले आहेत, त्यांना तत्काळ ही रक्कम मिळाली पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे. गेल्या अधिवेशनातही शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान दिल्याची माहिती सरकारच्यावतीने दिली होती, यात दुमत नाही. आता ज्या-ज्या शेतकऱ्यांना पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या यादीत नावे आलेली नाही, अशा सर्व शेतकऱ्यांची चौथी यादी प्रसिध्द केली पाहिजे. याशिवाय, सर्व यादीत पात्र असूनही ज्यांना रक्कम मिळालेली नाही. त्या सर्व शेतकऱ्यांना ताबडतोब रक्कम दिली पाहिजे.

दरम्यान, गेल्या वर्षी सोयाबी आणि भुईमुग पिकासाठी पिक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांचे पिक पुरामध्ये गेले आहे. त्याचा पंचनामा झाला. शासनाने ही रक्कम ताबडतोब देण्यास सांगितले असतानाही राष्ट्रीयकृत बँका शासनाच्या आदेशाला जुमानत नाहीत, असे चित्र आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रोत्साहनपर अनुदानाची सद्य:स्थिती :

शेतकऱ्यांचे एकूण अर्ज – ३ लाख ९४४

अनुदानास पात्र शेतकरी – १ लाख ८७ हजार ५६०

अनुदान वाटप झालेले शेतकरी – १ लाख ७५ हजार ८२२

अनुदानाच्या प्रतिक्षेत असणारे शेतकरी – ११ हजार ७३८

एकूण अनुदान जमा – ६३९ कोटी ५५ लाख रुपये

शासनाकडून वारंवार घोषणा करुनही पिककर्ज प्रोत्साहनात्मक आणि पिक विम्याची रक्कम दिली जात नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी यापासून वंचित आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles