ताज्या बातम्यापुणे

आधी नातेवाइकाचं लग्न लावा, मगच पुण्यात हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळवा!

स्त्री-शिक्षणाचा डंका आज जाेरजाेरात वाजवला जाताे; मात्र शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ राेवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातच आज मुलींना शिक्षण घेणे अवघड झाले आहे

चांगले गुण मिळवले, वसतिगृहासाठी पात्र ठरले तरीही पुण्यात राहणारं विवाहित नातेवाईक काेणी नाही म्हणून प्रवेश नाकारले जाऊ शकते, हे विदारक चित्र ‘लाेकमत’च्या पाहणीत समाेर आले आहे. वसतिगृहाचीही दुरवस्था, जेवणात निकृष्ट दर्जा, पिण्यासाठी अशुद्ध पाणी अन् सुरक्षिततेविषयी तर बाेलायलाच नकाे, अशी स्थिती अनेक वसतिगृहांत पाहायला मिळाली.

उच्च शिकण्यासाठी पुण्यात येणाऱ्या बहुतांश मुलींना सुरक्षित, स्वच्छ आणि परवडेल अशा दरात राहण्याची सुविधा मिळवणे हेच सर्वात माेठे आव्हान आहे. माेठ्या प्रयासाने येथील शासकीय, धर्मदाय, खासगी शिक्षण संस्थांच्या वसतिगृहांत प्रवेश मिळालाच तर या विद्यार्थिनींना चांगले जेवण, पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. सुरक्षितता देण्याच्या नावाखाली त्रासच जास्त दिला जाताे, असेही काही मुलींचे म्हणणे आहे. शिकून जिद्दीने पुढे जाण्यासाठी शहरात येणाऱ्या या विद्यार्थिनींना वसतिगृहासाठी अनेक अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. याचेच दाेन उदाहरण म्हणजे कल्पना आणि अनुष्का. शासकीय वसतिगृहांची अवस्था तर अतिशय वाईट असल्याचे दिसून आले आहे.

पालक नव्हे व्यावसायिक :

शहरात होस्टेलची पाहणी करत असताना काही होस्टेलमध्ये नियमावली लावण्यात आलेली. मुलींसाठी नियम लावण्यात कोणतीही हरकत नाही, परंतु ते नियम जाचक वाटते. जसे की, वस्तूंची जबाबदारी मुलींचीच, मॅनेजमेंट जबाबदार नसणार. तीन महिन्याच्या आत होस्टेल सोडल्यास डिपॉझिट रक्कम मिळणार नाही. कार्डने पेमेंट केल्यास दाेन टक्के कर आकारण्यात येईल, विनाकारण नियमावलीवरून वाद घालू नये, ॲडमिशन पावती हरविल्यास डिपॉझिटमधून ५०० रूपये वगळण्यात येतील. मुली घरदार सोडून शिक्षणासाठी, नोकरीसाठी राहतात. कुठे तरी होस्टेल मालकांनी पालक म्हणून वागणूक देण्याऐवजी व्यावसायिक पद्धतीने हे सर्व सुरू आहे.

मुलींच्याच शब्दात…

१) मी काेल्हापूर जिल्ह्यातली. दहावीनंतर पुढचं शिक्षण पुण्यात करायचं ठरवून प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. मेरिट चांगलं असल्याने अकरावीसाठी डेक्कन परिसरातील एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळाला आणि वसतिगृहासाठीही पात्र ठरले. वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया करताना त्यांनी लाेकल पॅरेंट्सची (स्थानिक विवाहित नातेवाईक) अट घातली. मी तर इथे पहिल्यांदाच आलेली. त्यामुळे माझे येथे कुणीच नव्हते. तसे सांगूनही लाेकल पॅरेंट्सशिवाय तुम्हाला होस्टेल मिळणार नाही, असे होस्टेल प्रशासनाकडून सांगण्यात आले. अनेक फाेनाफाेनीनंतर एक दूरचे मामा येथे राहत असल्याचे कळाले. त्यांच्याशी संपर्क साधला आणि होस्टेल मिळाले.

– कल्पना (नाव बदलले आहे), काेल्हापूर

२) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कॅम्पसमध्ये प्रवेश मिळाला, मात्र यायलाच उशीर झाल्याने होस्टेलची प्रवेश प्रक्रिया संपली हाेती. त्यामुळे खासगी होस्टेलचा शाेध घेणे गरजेचे हाेते. आमच्या मूळ काॅलेजचा असलेल्या एका सिनिअर्सला घेऊन काही खासगी होस्टेल्स गाठले. यावेळी काही होस्टेल्स डिपाॅझिटपाेटी अव्वाच्या सवा रक्कम मागत हाेते; तर काही होस्टेल्समध्ये तिथल्याच मेसला जेवण करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात येत हाेते. जेवायचे नसले तरी होस्टेलसाठीच्या शुल्कात जेवणाचे पैसे द्यावेच लागतील, असे स्पष्ट केले जात हाेते. काही ठिकाणी अगदी हिंडण्याफिरण्यालाही, कपड्याचे प्रकार अशी बंधने हाेती. अखेर राहायचे तर हाेते त्यामुळे पेईंग गेस्ट म्हणून एका ठिकाणी राहण्याचे निश्चित केले.- अनुष्का, छत्रपती संभाजीनगर

नवगण न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे🪀क्लिक करा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button