बंगला खरेदी करण्याच्या बहाण्याने बँकेतून तब्बल 2 कोटी 21 लाखांचे गृहकर्ज मंजूर करून घेत केली फसवणूक

पुणे : बंगला खरेदी करण्याच्या बहाण्याने बँकेतून तब्बल 2 कोटी 21 लाखांचे गृहकर्ज मंजूर करून घेत फसवणूक करणार्‍या चौघांवर मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिलींद भुसारी (रा. गुरूवार पेठ), बनावट प्रकाश भारवाणी, राजेश रमेश खंडेलवाल आणि त्यांचा एक साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रकाश प्रितमदास भारवाणी (75, रा. सहानी सुजन पार्क, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश भारवाणी आणि त्यांच्या पत्नीच्या नावे बिबवेवाडी येथील सहानी सुजन पार्कमध्ये बंगला आहे. मिलींद भुसारी याने तो बंगला विकत घेतो सांगुन फिर्यादी यांच्याकडून बंगल्याच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती घेतल्या. त्यानंतर त्या प्रतीमधील सिटीएस नंबरमध्ये फेरफार करून बनावट मालमत्तापत्र तयार केले. फिर्यादी व त्यांच्या पत्नीचे आधारकार्ड, पॅनकार्ड यावर इतर आरोपी यांचे फोटो लावून त्यांची बनावट कागदपत्रे तयार केली. त्या आधारे महापालिकेत बंगल्याचे बांधकाम चालु करण्याचा दाखला व बांधकाम पुर्ण झाल्याचा दाखला यांचा वापर करून बंगला राजेश खंडेलवाल यांना विक्री केला.

तसेच खंडेलवाल यांनी त्या आधारे बँकेतून 2 कोटी 21 लाखांचे कर्ज मंजुर करून घेतले. याबाबत आपली फसवणूक झाल्याचे समजातच प्रकाश भारवाणी यांनी पोलिस ठाणे गाठून यासंबंधी फिर्याद दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here