हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा आमदार अमोल मिटकरींना अधिकार आहे काय ?- आशिष देशमुख
बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे सदस्य आ. अमोल मिटकरी यांनी एका जाहीर सभेत बेताल वक्तव्य करून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण केलेले आहे व धार्मिक रितीरिवाज व हिंदूंच्या वैदिक मंत्राचे विडबंन केले आहे. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर ठिकठिकाणी या घटनेचा तिव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त होतो आहे. महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने महाराष्ट्रभर शासन आणि पोलीस प्रशासन दरबारी शेकडोंनी निवेदने दिलेली आहेत. तरी अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाही आ. अमोल मिटकरी यांच्यावर झालेली दिसत नाही.
आ.अमोल मिटकरी यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतांना त्यांनी राज्य घटने प्रमाणे समता, बंधूता, सर्वांना समान न्याय मिळेल असे वर्तन करण्याची शपथ घेतलेली आहे. परंतु आ. अमोल मिटकरींचे हे वर्तन शपथेच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांना या पदावर रहाण्याचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार राहिलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील या आमदाराला पाठीशी न घालता त्याचा राजीनामा घ्यावा. हा प्रकार घडून 5 ते 6 दिवस उलटून गेले आहेत तरी पण सरकारच्यावतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने त्यांना हिंदू धर्मियांच्या भावना दुखविण्याचा व भडकाविण्याचा अधिकार दिला आहे की काय? असा संतप्त सवाल भारतीय महाक्रांती सेनेचे बीड जिल्हाप्रमुख तथा मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे नेते आशिषआण्णा देशमुख यांनी केला आहे.