क्राईमठाणेताज्या बातम्याबीड जिल्हा

बीड मैत्रेयच्या फसवणुकीचा तिढा कधी सुटणार ?४० ते ५० हजार गुंतवणूकदारांचे पैसे कधी मिळणार ?


बीड : (व्रत्तसंस्था )बीड जिल्ह्यात मैत्रेय प्राव्हेट लिमिटेड या कंपनीने, सर्वसामान्य लोकांना दाम-दुप्पट आणि मुदत ठेवीला ११ टक्के व्याजदराचे आमिष दाखवून, कोट्यावधींची माया जमा करुन पलायन केलं आहे.तर या कंपनी विरोधात बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या कंपनीने फसव्या योजनेला बळी पाडून, अंदाजे ४० ते ४५ हजार ग्राहकांना ५० ते ६० कोटी रुपयांचा चुना लावला आहे. या संदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. मात्र ४० कोटींची रक्कम दोषारोपपत्रात फक्त चार कोटी दाखवली, असा आरोप पीडित महिलांनी केला आहे.

सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात कोट्यवधींची माया जमवली आणि मैत्रेय प्रायवेट लिमिटेड ही कंपनी पसार झाली. जास्ती व्याजदराचं आमिष दाखवून या कंपनीने कोट्यावधी पैसे जमा केले. हा आकडा थोडाथिडका नव्हे तर जवळपास ४० कोटींच्या आसपास असल्याचं सांगितलं जातं. पण यापेक्षा वेदनादायी गोष्ट म्हणजे आरोपपत्रात फक्त चार कोटींचा आकडा दाखवण्यात आलाय. पीडितांपैकी अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत, तर अनेकजण आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत.

बीडसह महाराष्ट्रातील हजारो लोकांना गंडा घालणाऱ्या मैत्रेय प्राव्हेट लिमिटेड, या कंपनीविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांपर्यंत मदतीसाठी निवेदने देण्यात आले आहेत. मात्र अद्यापही खातेदारांना एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे अनेकांनी आत्महत्या केल्या तर अनेकजण आत्महत्येच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

बीड जिल्ह्यातून २०१०-११ मध्ये प्रत्येक महिन्याला पाच कोटींचे कलेक्शन होत होते. मैत्रेय फंडमध्ये बीड जिल्ह्यातील २५ ते ३० हजार गुंतवणूकदारांच्या ठेवी अडकल्या आहेत. जास्त व्याजाचे अमिष दाखवून यात कोट्यवधी रुपये गोळा करण्यात आले. एकट्या बीड शहरात ४० कोटी रुपयांची गुंतवणूक लोकांनी केली असल्याची माहिती, पीडित गुंतवणूकदार महिलांनी दिलीय. विशेष म्हणजे या आरोपींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रपती यांचे फोटो, अभिप्राय, पुरस्कार दाखवून ठेवी गोळा केल्याचे महिलांनी सांगितलं. आता पैसे परत मिळत नसल्याने अनेकांवर आत्महत्या करण्याची वेळ आलीय, असं एजंट रत्नमाला नाईक म्हणत असताना पीडित ठेवीदार महिलांच्या डोळ्यांमध्ये अक्षरश: पाणी आलं.

२००४ साली मैत्रीय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची, पुण्यामध्ये स्थापना करण्यात आली होती. २०१० साली या कंपनीने बीड शहरात ऑफिस उघडून एजंटची नेमणूक केली होती. बीड शहरातील सावित्री शिंदे, विद्या नाईक यांच्यासारख्या असंख्य महिलांनी शहरातील घर काम, शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांना कंपनीबद्दल सांगून जवळपास ५ ते ७ कोटींची गुंतवणूक करून दिली आहे. मात्र पैसे मिळत नसल्याने आता काय करायचे ? असा प्रश्न या महिलांसमोर उभा ठाकलाय. असं सावित्री शिंदे म्हणाल्या. यादरम्यान त्यांना अश्रू अनावर झाले.

बीड शहरात राहणाऱ्या विद्या नाईक या महिलेचे पती मोलमजुरी करतात. विद्याताई स्वत: घरगुती मेस चालवतात. विद्या यांना २ मुली आहेत. त्या मुलींच्या लग्नासाठी त्यांनी १ लाख रुपये मैत्रीमध्ये गुंतवले होते. तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना सांगून इतर नातेवाईकांचे देखील ५ लाख रुपये भरले होते. मात्र पैसे गोळा केल्यानंतर कंपनी बंद झाली. त्यामुळे मुलीच्या लग्नासाठी व्याजाने पैसे काढावे लागले. तर अनेक लोक रोज घरी येऊन शिव्याशाप देतात. सुख-दुःखाच्या कार्यक्रम असला तरी लोक पैशांसाठी हिणकस वागणूक देतात. पैसे न मिळाल्याने आज त्यांच्यावर घर विकायची पाळी आली आहे. ते आज पैसे मिळतील, उद्या मिळतील याच अपेक्षेवर जगत आहेत. जर पैसे मिळाले नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असं विद्या नाईक यांनी सांगितलं

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात मैत्रीय प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मोठं नेटवर्क होतं. बीड शहरामध्ये मोठं ऑफिसदेखील होतं. या ठिकाणाहून प्रत्येक वर्षी २० ते २५ कोटी रुपयाची उलाढाल होत असायची. मात्र अचानक कंपनी बंद पडल्यामुळे ४० ते ४५ हजार गुंतवणूकदारांचे ५० ते ६० कोटी अडकून पडले आहेत. या फसवणुकीमुळे अनेकांनी आत्महत्या केल्या आहे. तर अनेकजण आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. सरकारने ताबडतोब कंपनीची मालमत्ता जप्त करुन त्यांचे पैसे द्यावेत. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवी शिंदे यांनी केली. तर हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी दिलीय.

तक्रारीनंतर चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून संनियंत्रण समिती स्थापन केली होती. वर्षा मधुसुदन सतपालकर हिने स्थापन केलेल्या मैत्रेय समूहाने गेल्या १२ वर्षात हॉटेल्स, रिसॉर्ट, गृहप्रकल्प उभारुन राज्यभरातील ठेविदारांना आकर्षित केलं होतं. या फसवणुकीबद्ल २०१८ मधे ३० ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. मैत्रेय समुहाच्या ३०७ मालमत्ता जप्त करण्याचे आदेशीत करण्यात आलं होतं. फसवणुक झालेल्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत संपर्क करण्याचं आवाहन अप्पर महासंचालकांकडून करण्यात आलं होतं. मुळच्या सातारा जिल्ह्यातील मैत्रेय समुहाने केलेल्या फसवणूकीचा आढावा घेण्यासाठीच सनियंत्रण समिती गठीत झाली होती.

वर्षा मधुसुदन सतपालकर हिने स्थापन केलेल्या मैत्रेय समुहामधे जनार्दन परुळेकर यांचीही भागीदारी आहे. या प्रकरणातील पहीली तक्रार ४ फेब्रुवारी २०१७ रोजी शंकरराव जाधव यांनी दिली होती. त्यानंतर वर्षा सतपालकर आणि तिचा साथीदार पुरळेकर यांना अटक करण्यात आली होती. मैत्रेय समूहाच्या फसवणुकीप्रकरणी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्था) हितसंबधी संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) १९९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार विविध ठिकाणच्या ३०८ मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

त्यामधे रिसॉर्ट, हॉटेल, फ्लॅट आणि भूखंडाचा समावेश आहे. मैत्रेयची मालमत्ता जप्तीची न्यायालयीन प्रक्रीया सुरु आहे. त्यानंतर त्या मालमत्ता विकून ठेवीदारांच्या देणी सक्षम अधिकाऱ्यांमार्फत दिल्या जातील. त्यामुळे ठेवीदारांना चार वर्ष, सहा वर्षाच्या गुंतवणुकीवर २५ ते ५० टक्के व्याज जमा केल्या आहेत त्याबाबत फसवणुक झाल्याच्या रितसर तक्रारी आणि ठेवीच्या मागण्या विहीत नमुन्यात भरुन घेतल्या जात आहे.

दरम्यान मुलीचे लग्न, मुलाचे शिक्षण, भविष्यासाठी गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्यामुळे अनेकांचे स्वप्न भंग झाले असून घरामध्ये कलह निर्माण झाला आहे. अनेक पती-पत्नीमध्ये भांडण झाले तर कित्येक गुंतवणूकदार एजंटला येऊन मारहाण देखील करत आहेत. त्यामुळं या ४० ते ५० हजार गुंतवणूकदारांचे पैसे कधी मिळणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून आता या मैत्रेयच्या फसवणुकीचा तिढा कधी सुटणार ?


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *