थंडीत 8 दिवसांच्या अर्भकाला सोडून आई – वडील फरार

पुणे : जिल्ह्यातील इंदापूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. कडाक्याच्या थंडीत ८ दिवसांच्या नवजात बालकाला रस्त्यावर सोडून देत त्याचे आई-वडील पसार झाले आहेत. पुणे-सोलापूर महामार्गाजवळ बाभुळगाव पाटी येथे हे नवजात अर्भक सापडलं.
बाळाचं दैव बलवत्तर म्हणून पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका दाम्पत्याला हे बाळ बेवारस पद्धतीने ठेवल्याचं लक्षात आलं.

सकाळी कामावर जात असताना सविता खनवटे या आपला पती सोमनाथ यांच्यासोबत कामावर जात होत्या. बाभुळगाव पाटी रस्त्यावरुन जात असताना या दोघांनाही बाळाच्या रडण्याचा आवाज आला. ज्यानंतर त्यांनी नीट तपासून पाहिलं असता एका कपड्यात लहान मुलाला गुंडाळून ठेवण्यात आलं होतं. थंडीमुळे या बाळाचं पूर्ण शरीर गारठून गेलं होतं. यानंतर सविता यांनी शेजारीच शेकोटी पेटवून बाळाला उब दिली. दरम्यानच्या वेळेत सोमनाथ यांनी इंदापूर येथे डॉक्टरांना याबद्दलची माहिती दिली.प्रकार कळल्यानंतर या बालकाला तात्काळ उपजिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी या बाळावर उपचार केले असून त्याची प्रकृती आता चांगली आहे. दरम्यान बाळाला पहिल्यांदा बघितलेल्या सविता खनवटे यांनी हे बाळ अनाथआश्रमात न देता आपल्याला सांभाळण्यासाठी द्यावं अशी मागणी केली आहे. मी या बाळाला आईसारखं प्रेम करेन असं सविता खनवटे म्हणाल्या आहेत. कडाक्याच्या थंडीत आपल्या पोटच्या जीवाला सोडून दिल्यानंतर कोणतही नातं नसताना या बालकाला जीवदान देणाऱ्या खनवटे दाम्पत्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here