महत्वाचे

लेकीच्या लग्नासाठी लॉकरमध्ये ठेवलेले 18 लाख वाळवीने खाल्ले अन..


उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील बँक ऑफ बडोदाच्या आशियाना शाखेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे 18 लाख रुपये बराच काळ लॉकरमध्ये ठेवले होते मात्र ते वाळवीने खाऊन टाकले. लॉकरमध्ये पैसे ठेवलेल्या महिलेने लॉकर उघडलं असता हा प्रकार उघडकीस आला.

कुलूप उघडताच महिलेला धक्का बसला. कारण वाळवीने सर्व नोटा खराब केल्या होत्या. याबाबत महिलेने ब्रांच मॅनेजरकडे तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. आता याप्रकरणी बँकेचे लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर विशाल दीक्षित यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विशाल दीक्षित म्हणाले की, आतापर्यंत फक्त एवढंच समोर आलं आहे की, महिलेने बरेच पैसे बँकेत ठेवले होते, जे वाळवीने खाऊन गेले. नोटांवर कोणत्या कारणांमुळे वाळवी लागली, याचा शोध घेण्यासाठी या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. लॉकर पॉलिसीबाबत सामान्यतः बँकांमध्ये नियम असा आहे की नैसर्गिक आपत्तीच्या वेळीच नुकसान भरपाई दिली जाते. ही अपघाती घटना (एक्सीडेंटल केस) आहे. आतापर्यंत अशी एकही घटना घडल्याचं माझ्या निदर्शनास आलेलं नाही. सध्या बँक स्तरावर तपास सुरू आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, बँकेच्या लॉकरमध्ये रोख रक्कम, शस्त्रे, धोकादायक पदार्थ यासारख्या गोष्टी ठेवता येत नाहीत. दागिने, कागदपत्रे इत्यादी तिथे ठेवता येतात. मुरादाबादमधील अलका पाठक या महिलेचा दावा आहे की तिने तिच्या मुलीच्या लग्नासाठी बँक लॉकरमध्ये 18 लाख रुपये रोख ठेवले होते, परंतु ते सर्व आता वाळवीने खाल्ले आहेत.

अलका पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक ऑफ बडोदाच्या रामगंगा विहार शाखेत ऑक्टोबर 2022 मध्ये मुलीच्या लग्नासाठी दागिन्यांसह 18 लाख रुपये लॉकरमध्ये ठेवण्यात आले होते. गेल्या सोमवारी त्या ते तपासण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना दिसले की सर्व नोटा वाळवीने खाल्ल्या आहेत. बँकेच्या लोकांनी त्यांना लॉकर एग्रीमेंटचं रिन्यूवल आणि केवायसी करण्यासाठी बोलावले होतं

अलका सांगतात की, त्यांचा छोटासा व्यवसाय आहे. लहान मुलांना देखील शिकवतात. सर्व बचत लॉकरमध्ये ठेवली होती. पहिल्या मुलीच्या लग्नातील सर्व रोख रक्कम, दागिने इ. तिथे ठेवण्यात आले होते. आता दुसऱ्या मुलीच्या लग्नासाठी हे पैसे बाहेर काढायचे होते पण त्याआधीच ही घटना घडली. लॉकरमध्ये रोख ठेवता येणार नाही, हे त्यांना अगोदर माहीत नव्हते. त्यांनी स्वतः दागिन्यांसह 18 लाख रुपये लॉकरमध्ये ठेवले होते. गेल्या सोमवारी केवायसी करण्यासाठी बँकेत बोलावले असता लॉकर उघडल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *