महत्वाचे

खलिस्तान समर्थकांबाबत कठोर भूमिका, भारतविरोधी पोस्टर हटवण्याचे आदेश


खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणी कॅनडाने आरोप केल्यानंतर भारताने सडेतोड उत्तर दिलं. जशास तसं अशी भूमिका भारताने घेतल्यानंतर आता कॅनडा मवाळ झाल्याचं दिसत आहे.

खलिस्तानी फुटीरतावादी आणि दहशतवादी समर्थकांविरुद्ध भारताच्या दबावानंतर कॅनडा प्रशासनाने होर्डिंग आणि बॅनर हटवण्याचे आदेश दिले आहेत. ब्रिटिश कोलंबिया प्रांतात महत्त्वाच्या ठिकाणी खलिस्तानी समर्थकांनी आपला प्रोपगंडा रेटण्यासाठी होर्डिंग, बॅनर लावले होते. आता हे होर्डिंग आणि बॅनर हटवले जात आहेत.

स्थानिक अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर कॅनडातील सरेमध्ये एका गुरुद्वारात भारतीय राजदूतांची हत्या करण्याचं आव्हान करणारी पोस्टर्स हटवली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांना मुद्द्याचे गांभीर्य आणि कॅनडातून येणाऱ्या अशा संदेशांच्या शक्यतेची जाणीव झाल्यानंतर सरे गुरुद्वाराला तीन भारतीय राजदूतांच्या हत्येसाठी भडकावणारी पोस्टर्स हटवण्यास सांगितले होते. तसंच गुरुद्वारा व्यवस्थापनाला इशाराही दिला आहे की कोणत्याही कट्टरपंथीय घोषणेसाठी लाउडस्पीकरचा वापर करू नये.

ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे हा प्रमुख भाग असून या भागातले भारतविरोधी घोषणा आणि भावना भडकावणाऱ्या गोष्टी हटवल्या जात आहेत. याशिवाय कॅनडा-अमेरिका सीमावर्ती भागातील खलिस्तानी समर्थक संघटनांना अशी पोस्टर्स काढण्यासाठी सांगण्यात आलंय. खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्या प्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर भारत कॅनडा यांच्यातील संबंधात कटुता निर्माण झाली आहे. भारताने कॅनडाच्या व्हिसा अर्जांना सस्पेंड केलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *