प्रियकरासोबत पळाली पत्‍नी; अल्‍पवयीन मुलीही फरार..

0
186

हिंगोली : शहरातील महादेववाडी भागातून प्रियकरासोबत पळालेल्या पत्नीने नंतर आपल्या दोन अल्पवयीन मुलीही पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून पत्नी व प्रियकरावर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात काल (मंगळवार) रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, कळमनुरी येथील इंदिरानगर भागातील एक जोडपे मिस्त्री काम करतात. या कामासाठी ते काही वर्षापुर्वी पुणे येथे गेले होते. त्या ठिकाणी जोडपे व त्यांच्या दोन मुली राहात होत्या. त्या ठिकाणी महिलेची पुण्यातच काम करणाऱ्या उत्तर प्रदेशातील अमितकुमार उर्फ जितू पाल (रा. आग्रा, उत्तरप्रदेश) याच्यासोबत ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर अमितकुमार याने महिलेस पळविले. या घटनेमुळे महिलेचा पती दोन लहान मुलींसह हिंगोलीत महादेववाडी भागात राहण्यासाठी आला होता.

दरम्यान, मंगळवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या दोन्ही मुली साक्षी (वय ९), प्रणिता (वय ८) अचानक बेपत्ता झाल्या. दोन्ही मुली घरी नसल्याचे पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांचा शोध सुरु केला. मुलींची नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र त्या ठिकाणीही मुली आढळून आल्या नाहीत. त्यामुळे रात्री उशीरा मुलीच्या वडिलांनी हिंगोली शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यामध्ये अमितकुमार पाल व त्याच्या पत्नीने दोन्ही मुलींना अमिष दाखवून फूस लाऊन पळवून नेल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. यावरून पोलिसांनी अमितपालसह तक्रारदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले, उपनिरीक्षक सुवर्णा वाळके, उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार संजय मार्के हे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here