ताज्या बातम्या

बदलत्या वातावरणासोबतच कोरोनाही पुन्हा जिल्हावासीयांना धडकी


यवतमाळ : बदलत्या वातावरणासोबतच कोरोनाही पुन्हा जिल्हावासीयांना धडकी भरवत आहे. बुधवारी आरोग्य विभागाच्या अहवालानुसार १०८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येने नागरिकांच्या चिंतेत भर पाडली आहे.प्रशासकीय स्तरावरून संसर्ग थांबविण्यासाठी नियमावली लागू झाली आहे. मात्र, याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळेच संसर्गाचा दैनंदिन दर ९.१० वर पोहोचला आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने बुधवारी एक हजार १७८ नमुन्यांचा अहवाल जाहीर केला. यामध्ये १०८ जण पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये ७४ पुरुष व ३४ महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील ५३ जणांचा समावेश आहे. आर्णी तालुक्यातील तीन, दारव्हा आठ, घाटंजी दोन, कळंब सहा, महागाव एक, नेर सहा, पांढरकवडा १३, पुसद सहा, राळेगाव तीन, उमरखेड तीन, वणी तीन व जिल्ह्याबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे.
कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी शारीरिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यावर तसेच लसीचे डोस देण्यावर प्रशासनाचा भर आहे. त्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. मात्र, ही नियमावली केवळ कागदोपत्रीच अंमलात आहे.

नियम पाळतंय कोण ?
– जिल्ह्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी आहे. प्रत्यक्षात मात्र याचा अंमल होताना दिसत नाही. आदेश निघाला तेव्हा पहिल्या दिवशी दंडात्मक कारवाईचा देखावा करण्यात आला. संसर्ग वाढत असतानाही राजकीय पक्षांचे आंदोलन, मेळावे भरगच्च संख्येने सुरू आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी राजकीय पक्षासह विविध संघटनांनी हजेरी लावली. ही गर्दी सुद्धा नियमात बसणारी होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर नावाला
– जिल्हा प्रशासनाने अजूनही कोविड केअर सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे एकाच वेळी रुग्ण वाढल्यास स्थिती गंभीर होऊ शकते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *