गेल्या काही दिवसांपासून आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी चर्चेत असलेले कालीचरण महाराज यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांनी रायपूर पोलिसांकडून कालीचरण यांना ताब्यात घेतले.
खडकमाळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्यात पुणे पोलिसांनी कालीचरण यांना अटक केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली.
धार्मिक भावना दुखवल्याच्या आरोपाखाली कालीचरण महाराज आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात पुण्यातील खडकमाळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
19 डिसेंबर रोजी पुण्यात एक कार्यक्रम झाला होता. त्यात मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखवल्याप्रकरणी पोलीस नाईक सोमनाथ ढगे यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रायपूर पोलिसांनी केली होती अटक
हरिद्वारच्या धर्मसंसदेत महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असणाऱ्या कालीचरण महाराजांना रायपूरमधून अटक करण्यात आली होती. छत्तीसगड राज्यातील रायपूर पोलिसांनी 30 डिसेंबर रोजी मध्यप्रदेशातून कालीचरण महाराजांना अटक केली.
रायपूरचे पोलीस अधिक्षक प्रशांत अग्रवाल यांनी सांगितलं, “बागेश्वर धामजवळील एका घरातून पहाटे चार वाजता कालीचरण यांना अटक करण्यात आली. त्यांनी जवळच्या एका लॉजमध्येही बुकींग केलं होतं.”
प्राथमिक तपासाच्या आधारावर पोलिसांनी कालीचरण महाराजांविरोधात देशद्रोहाची कलमंही लावली आहेत.
कालीचरण यांना मध्यप्रदेशातून अटक केल्यानंतर पोलिसांची टीम आता रायपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. रायपूरच्या स्थानिक न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे अशी माहिती प्रशांत अग्रवाल यांनी दिली.
कालीचरण यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथकं वेगवेगळ्या राज्यात पाठवण्यात आली होती.
एएनआय या वृत्तसंस्थेनेही याबाबत ट्वीट केलं होतं. “मध्य प्रदेशातील खजुराहो येथून कालीचरण महाराज यांना रायपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात रायपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता,
काय आहे प्रकरण?
अकोल्याच्या कालीचरण महाराजांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. छत्तीसगडमध्ये भरलेल्या धर्मसंसदेमध्ये महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना कालीचरण महाराज यांनी गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेला वंदन केलं. त्यावेळी काही उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.महात्मा गांधींबाबत अपशब्द काढणाऱ्या कालीचरण महाराजांविरोधात रायपूर महापालिकेचे सभापती आणि काँग्रेस नेते प्रमोद दूबे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे प्रमोद दूबे हे या धर्मसंसदेचं आयोजन करणाऱ्यांपैकीच एक होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही कालीचरण महाराज यांच्याविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांनीही ट्वीट करून यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “फॅसिजम विरुद्ध मैदानात उतरून लढावंच लागेल. गोडसेच्या पाठीराख्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार अद्दल घडवावी लागेल,” असं त्यांनी तक्रार दाखल करण्यापूर्वी ट्विटवर म्हटलं.
कालीचरण महाराजांविरोधात प्रशांत गावंडे यांच्या तक्रारीवरून कलम 294, 505(2) यांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, गुन्ह्याचं घटनास्थळ रायपूर (छत्तीसगड) असल्यानं तिथं शून्य कलमाअंतर्गत वर्ग करण्यात आलाय. त्यामुळे पुढील तपास रायपूर पोलीस करतील, अशी माहिती अकोला पोलिसांनी दिली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार मोहन मरकाम यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. “या व्यासपीठावरून महात्मा गांधींबाबत ज्याप्रकारे शिवराळ भाषा वापरण्यात आली, ती आम्हाला अपेक्षित नव्हती. हे ठरवून अजेंड्यानुसार करण्यात आलं असावं,” असं प्रमोद दुबे बीबीसीशी बोलताना म्हणाले.
कालीचरण महाराज कोण आहेत?
यापूर्वी शिवतांडव स्त्रोताचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं कालीचरण महाराज प्रकाशझोतात आले होते. कालीचरण महाराज नावाने प्रसिद्ध असलेल्या या महाराजांचं मूळ नाव हे अभिजित सराग असं आहे.
ते मूळचे अकोल्याचे असून येथील शिवाजीनगर भागात भावसार पंचबंगला याठिकाणी ते राहतात आणि अकोल्यामध्ये त्यांचं बालपण गेलं आहे, असं स्थानिक पत्रकार उमेश अलोणे सांगतात.
कालीचरण महाराजांच्या शिक्षणाबाबत नेमकी माहिती मिळाली नाही मात्र आठवीपर्यंत त्याचं शिक्षण झालं असल्याचं काही स्थानिकांनी सांगितलं आहे. त्यांच्या जुन्या आयुष्याविषयी माहिती देणं ते शक्यतो टाळतात असं स्थानिकाचं म्हणणं आहे.
कालीचरण महाराजांनी स्वतः माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, “लहानपणापासूनच मला शाळेत जायला आवडत नव्हतं, शिक्षणात मन लागत नव्हतं. बळजबरीने शाळेत पाठवलं तर मी आजारी पडायचो. सगळ्यांचा लाडका असल्यानं सगळे माझं सगळं ऐकत होते. त्यानंतर धर्माविषयी आवड निर्माण झाली आणि अध्यात्माकडे वळालो.”