ताज्या बातम्यामहाराष्ट्र

विखे-पाटलांच्या प्रवरा नगर साखर कारखान्यात 191 कोटींचा घोटाळा, मिंधे सरकारमधील मंत्र्यांचे भ्रष्टाचारसत्र


मिंधे सरकारमधील आणखी एका मंत्र्याशी संबंधित साखर कारखान्यातील घोटाळा उघडकीस आला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अधिपत्याखालील प्रवरा नगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील साखर कारखान्यातीत कर्ज व्यवहार बनावट कागदपत्रांद्वारे झाले आहेत.

हा तब्बल 191 कोटी रुपयांचा घोटाळा आहे. या घोटाळ्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून कारखान्याच्या नफा-तोटय़ात फेरबदल करण्यात आले. कारखान्याला ऊस पुरवणारे शेतकरी, जिल्हा बँक व इतर कर्जदार संस्थांची ही उघडउघड फसवणूक असून त्यासंदर्भात शेतकऱयांनी तक्रारी करूनही कारवाई केली जात नाही. साखर संचालकांनी यासंदर्भात खुलासा मागूनही कारखान्याने तो दिलेला नाही. त्यामुळे या कारखान्यास कर्जपुरवठा बंद करण्यात यावा, अशीही मागणी शेतकऱयांनी जिल्हा बँकेकडे केली आहे.

ऊस उत्पादक सभासदांच्या प्रवरा शेतकरी मंडळाचे अध्यक्ष अरुण कडू, सहअध्यक्ष एकनाथ चंद्रभान पाटील घोगरे आणि बाळासाहेब केरनाथ विखे यांनी या घोटाळ्याबाबत नगर जिल्हा बँक तसेच साखर संचालकांकडे तक्रार केली आहे. विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याने 2021-22च्या वार्षिक अहवाल व ताळेबंदात 31 मार्च 2021पूर्वीच्या रकमांमध्ये फेरबदल केले आहेत.

साखर आयुक्त, साखर सहसंचालकांकडे आम्ही तक्रार केल्यानंतर सातत्याने याबाबत पाठपुरावा करत आहोत, पण साखर सहसंचालकांनी तीन वेळा खुलासा मागूनही कारखान्याने दिलेला नाही, असे अरुण कडू यांचे म्हणणे आहे. साखर सहसंचालक यांनी आमचा तक्रार अर्ज अवलोकनार्थ शासकीय ऑडिटरकडे अभिप्रायासाठी पाठविला आहे. या आठवडय़ात हा अभिप्राय येणे अपेक्षित आहे, असे कडू यांनी सांगितले.

– विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने 2020-21चा वार्षिक अहवाल सर्वसाधारण सभेत मंजूर केला. त्यानुसार 2020-21च्या ताळेबंदात कारखान्याचा तोटा 170 कोटी 19 लाख 6 हजार 327.74 रुपये इतका आहे, परंतु 2021-22च्या वार्षिक अहवाल व नफा-तोटा पत्रकात ती तोटय़ाची रक्कम निरंक दाखवण्यात आली आहे.

– 21 मार्च 2021च्या आर्थिक पत्रकाप्रमाणे कारखान्याचा संचित नफा निरंक दाखवण्यात आला आहे. त्याच जागी 21 मार्च 2022च्या आर्थिक पत्रकात मात्र संचित नफा 21 कोटी 43 लाख 85 हजार 652.18 रुपये दाखवण्यात आला आहे.

– ही फसवेगिरी पाहता 2020-21 आणि 2021-22च्या वार्षिक अहवालात 191 कोटी 62 लाख 91 हजार 979.92 रुपये इतक्या रकमेची सभासद व जिल्हा बॅंकेची तसेच कारखान्याला कर्जपुरवठा करणाऱया अन्य संस्थांची घोर फसवणूक झाली आहे.

– 2020-21च्या अहवालातील तोटा 170 कोटींवर असताना 2021-22च्या अहवालात 21 कोटींच्या वर नफा दाखवण्यात आला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *