चंद्रपूर: चिमूर तालुक्यातील दोघा सरपंचासह उपसरपंचास ४१ हजारांची लाच घेताना अटक

0
108
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

चंद्रपूर, : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बांधकामासाठी साहित्य पुरविणाऱ्या ठेकेदाराकडून कमिशन मागणाऱ्या दोघा सरपंचासह एका उपसरपंचास लाचलुचपत विभागाने 41 हजार रूपयाची लाच घेताना अटक केली.

आरोपीमध्ये चिमूर तालुक्यातील बोरगाव (बुट्टी) चे सरपंच रामदास चौधरी (वय 39), उपसरपंच हरीश गायकवाड (वय 45) व आंबेनेरीचे सरपंच संदीप दोडके यांचा समावेश आहे. लाचलुचपत विभागाने मंगळवारी ही कावाई केली. जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Chandrapur Bribery Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील आंबेनेरी ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अन्य बांधकामाकरीता उमरेड येथील तक्रारदार ठेकेदाराला साहित्य पुरविण्याचे टेंडर मिळाले होते. तक्रारदाराने शाळेच्या बांधकामाला लागणारे सर्व साहित्य पुरविले. सदर पुरविलेल्या साहित्याचे देयक धनादेश मागणी केली होती. आंबेनेरीचे सरपंच संदीप दोडके यांनी 5 टक्के कमिशननुसार 78, 600 रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 41 हजार रूपये देण्याचे ठरले. दरम्यान, मंगळवारी संदीप दोडके यांना चिमूर येथे स्वतः करीता 2 टक्के व उपसरपंच यांच्या करीता 1 टक्के कमिशनची रक्कम रूपये 41 हजार रूपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यासोबत असलेले बोरगाव बुटीचे सरपंच रामदास चौधरी, उपसरपंच हरीश गायकवाड यांचाही त्यामध्ये सहभाग असल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. चिमूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नागपूर लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे, पर्यवेक्षण अधिकारी अनामिका मिर्झापुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वर्षा मते, पोलीस निरीक्षक आशिष चौधरी, सहायक फौजदार सुरेंद्र शिरसाट, पोलीस हवालदार अनिल बहिरे, पोलीस नाईक अमोल मेंघरे, अस्मिता मल्लेलवार, अश्लेंद्र शुक्ला, शारिक अहमद यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here