ताज्या बातम्या

मला माझ्या कृत्याबद्दल खेद वाटत नाही”, बांगलादेशविरुद्धच्या रागावर अखेर हरमनचं स्पष्टीकरण


नवी दिल्ली : भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर आयसीसीने कारवाई केली असून तिच्यावर दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ती आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेतील दोन सामन्यांना मुकणार आहे.बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात अम्पायरसोबत केलेलं गैरवर्तन हरमनला भोवलं अन् तिला आयसीसीनं शिक्षा ठोठावली. दरम्यान, या सर्व प्रकारावर हरमनप्रीतने मौन सोडलं असून ढाका इथं झालेल्या सामन्यातील कृत्याचा कोणताही खेद वाटत नसल्याचं तिनं म्हटलं आहे.

 

खरं तर बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात अम्पायरने बाद दिल्यानंतर हरमनने गैरवर्तन करत बॅट स्टम्पवर मारली होती. तसेच सामन्यानंतर बोलताना भारतीय कर्णधाराने अम्पायरवर सडकून टीका केली होती. याची दखल घेत आयसीसीनं हरमनप्रीत कौरवर कारवाई केली. हरमनप्रीत सध्या ‘द हंड्रेड’मध्ये खेळत असून एका मुलाखतीत बोलताना तिनं म्हटलं, “मी असं म्हणणार नाही की मला कोणत्याही गोष्टीचा खेद वाटतो कारण एक खेळाडू म्हणून तुम्हाला सर्व गोष्टी ठीक आहेत की नाही हे पाहणं गरजेचं आहे. एक खेळाडू म्हणून तुम्हाला नेहमीच स्वतःला व्यक्त करण्याचा, म्हणजेच तुम्हाला जे वाटतं ते सांगण्याचा अधिकार आहे.” भारतीय महिला संघ आता थेट आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणार आहे.

 

हरमन का संतापली?

दरम्यान, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या वादग्रस्त विकेटने अनेकांचे लक्ष वेधलं. अम्पायरने बाद देताच हरमनने संताप व्यक्त करत स्टम्पच्या दिशेने बॅट भिरकावली. स्वीप मारण्याच्या प्रयत्नात असलेली हरमन फसली अन् बांगलादेशी खेळाडूंनी विकेटसाठी अपील केली. खरं तर स्लिपमध्ये झेलचा दावा केला त्यासाठी अपील केली गेली. मात्र, अम्पायरनं तिला LBW बाद घोषित करताच हरमनचा राग अनावर झाला.

 

भारतीय कर्णधाराचा आरोप

“मला वाटते की या सामन्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. क्रिकेटशिवाय इथं अम्पायरिंगचा हा प्रकार पाहून मी थक्क झाले. जेव्हा आम्ही पुढच्या वेळी येऊ तेव्हा आम्ही अशा प्रकारच्या अम्पायरिंगसाठी आधीच तयार असू. मी या आधीही सांगितलं होतं की, इथं अत्यंत खराब अम्पायरिंग आहे. काही निर्णयांमुळे मी दुखावले आहे”, असे भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने सामन्यानंतर म्हटले होते.

 

आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघ –

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष, अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तितास साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहूजा, उमा छेत्री, अनुषा बरेड्डी.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *