४ सामन्यांत ४२९ धावा करणाऱ्या पृथ्वी शॉ याच्यावर नशीब रुसलं; अचानक घ्यावी लागली माघार

0
63
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी पृथ्वी शॉ कसून मेहनत घेतोय. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वन डे कप स्पर्धेत त्याने एक द्विशतक अन् शतकासह ४ सामन्यांत ४२९ धावा चोपल्या.पण, नॉर्थहॅम्पटनशायर क्लबकडून खेळणाऱ्या पृथ्वीला दुर्दैवाने स्पर्धेतून अचानक माघार घ्यावी लागली आहे. रविवारी डरहॅम संघाविरुद्ध सराव करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्याच्या दुखापतीचं स्कॅन केलं गेलं अन् ही दुखापत गंभीर असल्याचे समोर आले. नॉर्थहॅम्पटनशायरने याबाबत निवेदन प्रसिद्ध केलं अन् आता पृथ्वीच्या दुखापतीवर बीसीसीआयची वैद्यकीय टीम उपचार करणार आहे.

पृथ्वीने लंडनमध्ये सुरू असलेल्या वन डे कप स्पर्धेत ४ इनिंग्जमध्ये दोन शतकं झकावली आहेत. त्याने सोमरसेटविरुद्ध १५३ चेंडूंत २४४ धावांची खेळी केली आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये इंग्लंडमधील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. त्याने १२५*, २६ आणि ३४ धावांची खेळी करून चार इनिंग्जमध्ये ४२९ धावा कुटल्या. ”पृथ्वीने अल्पावधीतच क्लबसाठी खूप मोठं योगदान दिलं, परंतु उर्वरित स्पर्धेत आता तो संघासोबत नसणार आहे. हा आमच्यासाठी धक्का आहे,”असे नॉर्थहॅम्पटनशायरचे प्रशिक्षक जॉन सॅडलर यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले,”तो अत्यंत नम्र खेळाडू आहे, तो सर्वांचा आदर करतो आणि नॉर्थम्प्टनशायरचे प्रतिनिधित्व करण्याच्या संधीबद्दल तो खूप कृतज्ञ आहे. तसेच मैदानावरील त्याच्या कामगिरीचा आमच्या ड्रेसिंग रुमवर मोठा प्रभाव पडला. तो संघाला विजय मिळवून देण्यासाठी अधिक भुकेला होता. आम्ही त्याला शुभेच्छा देतो आणि त्याला लवकरच पुन्हा धावा करताना पाहण्याची आशा आहे.”

चांगल्या फॉर्मात परतला असताना पृथ्वीला दुखापत झाल्याने चाहते नाराज नक्की झाले असतील. आयपीएल २०२३ मध्ये तो पूर्णपणे अपयशी ठरला. जुलै २०२१ मध्ये तो भारताकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता. यावर्षी फेब्रुवारीत तो ट्वेंटी-२० संघात परतला होता, पण आयपीएल २०२३ मधील निराशाजनक कामगिरीमुळे त्याचा पुन्हा ट्वेंटी-२० संघासाठी विचार केला गेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here