Satara: पोलीस ठाण्यातच आरोपीकडून आत्महत्येचा प्रयत्न, कऱ्हाडातील घटना

0
53
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

– संजय पाटील कऱ्हाड – खंडणी प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीने पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केला. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात ही घटना घडली. या घटनेने पोलीस ठाण्यात धावपळ उडाली.

अखेर पोलिसांनी रात्री उशिरा संबंधित आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

पवन देवकुळे (रा. बुधवार पेठ, कऱ्हाड) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, शहरातील मंडईत फळविक्री करणाऱ्या विलासराव जावळे यांना शस्त्राचा धाक दाखवून पवन देवकुळे याने खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, उपनिरीक्षक राजू डांगे, पोलीस नाईक शशी काळे, कुलदीप कोळी, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे यांच्या पथकाने आरोपी पवन देवकुळे याला ताब्यात घेऊन कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर फिर्यादी विलासराव जावळे यांची फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू असतानाच पोलिसांसमोरच आरोपीने टेबलवरील काचेवर जोरात डोके आपटून तसेच फुटलेल्या काचेने स्वतःवर वार करून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

या प्रकारानंतर सहाय्यक निरीक्षक गोरड, उपनिरीक्षक डांगे, शशी काळे, कुलदीप कोळी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाईगिरीची भाषा वापरून खंडणी मागण्याचा प्रकार होत असल्यास तातडीने कऱ्हाड शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन उपअधीक्षक अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी केले.

खंडणीसह आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा
कऱ्हाड शहर पोलिसांनी पवन देवकुळे याला खंडणीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. मात्र, त्याने पोलीस ठाण्यातच टेबलवर डोके आपटून स्वतःला दुखापत करून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्यावर खंडणीसह आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here