भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम असलेल्या चांद्रयान-३ कडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. नुकतेच चांद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असून येत्या काही दिवसांत चांद्रयान पुढील कक्षेत प्रवेश करणार आहे.
भारताने गेल्या महिन्यात १४ जुलै रोजी चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो दुसऱ्यांदा चंद्रावर अंतराळ यान उतरवण्याचा प्रयत्न करत आहे.
चांद्रयान ३ मोहिम यशस्वी झाल्यास त्याचा भारतासह जगभरातील देशांना फायदा होणार आहे. शिवाय भारतीय अर्थव्यवस्थेला मदत करण्याची क्षमता त्यात आहे. मोहीम यशस्वी झाल्यास या क्षेत्रामध्ये भरपूर गुंतवणूक येण्याची आशा आहे. हे भारताची अंतराळ मोहीम, अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्षमता आणि कुवत दर्शविणारे आहे. या प्रयत्नामुळे भारतीय खासगी अंतराळ उद्योगांसाठी अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.२०२२ मध्ये जागतिक अंतराळ संशोधन बाजार ४८६ अब्ज डॉलर एवढा होता, तो २०३२ पर्यंत १,८७९ अब्जांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या मोठ्या गुंतवणूक संधीमुळे भारतीय कंपन्या आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.
चांद्रयान- ३ यशस्वी झाल्यास, भारत अमेरिकेसह अव्वल देशांच्या पंक्तीत जाऊन बसेल. चांद्रयान-३ च्या माध्यमातून चंद्रावर यशस्वीरित्या पाऊल ठेणारा भारत हा अमेरिका, चीन आणि रशियानंतर चौथा देश ठरेल, असे मत देशांतर्गत आघाडीची एरोस्पेस कंपनी स्कायरूट एरोस्पेसचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पवन चंदना यांनी व्यक्त केले.
चांद्रयान ३ या महत्त्वाकांक्षी मोहिमेत भांडवली बाजारात सूचीबद्ध असलेल्या काही आघाडीच्या कंपन्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.