विनायक दामोदर सावरकर (१८८३–१९६६) हे हिंदू महासभेतील प्रमुख नेते होते. हिंदुत्वाच्या हिंदू राष्ट्रवादी तत्त्वज्ञानाची मांडणी करणारे म्हणून त्यांना ओळखतात. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानामुळे ते स्वातंत्र्यवीर सावरकर या नावाने प्रसिद्ध आहेत.
पुणे महानगरपालिकेने २०१०–२०११ मध्ये बांधलेले सावरकर स्मारक किंवा स्वा. विनायक दामोदर सावरकर स्मारक हे विदेशी मालाची (ब्रिटीश मालाची) पहिली होळी जिथे झाली ते स्मरणस्थळ आहे. भारतातील राष्ट्रीय पुढारी आणि स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेते लोकमान्य टिळक हे स्वदेशी चळवळीचे एक प्रमुख शिल्पकार होते. या स्वदेशी चळवळीचा भाग म्हणून सावरकरांनी ७ ऑक्टोबर १९०५ रोजी इथे विदेशी वस्तूंच्या होळीचे आयोजन केले होते. बंगालच्या फाळणीचा निषेध आणि विदेशी मालावर बहिष्कार टाकून स्वदेशीचा प्रसार करणे हे या चळवळीचे उद्दिष्ट होते. सावरकर त्यावेळी फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. त्यांच्या या कृत्याबद्दल महाविद्यालयाने त्यांना दंड ठोठावला आणि महाविद्यालयातून निलंबित केले. महाविद्यालयाने घेतलेल्या या भूमिकेवर टिळकांनी त्यांच्या केसरी या वृत्तपत्रातून कडक टीका केली.सिमेंट कॉन्क्रीटचा वापर करून बांधलेले हे स्मारक तीनमजली असून, यामध्ये विदेशी होळीचा देखावा साकारण्यात आला आहे. या शिल्पाच्या देखाव्याच्या दोन्ही बाजूंना फलक लावलेले असून त्यावर या घटनेसंबंधी आणि सावरकरांच्या जीवनाविषयी माहिती लिहिलेली आहे. या स्मारकाच्या आवारात सावरकरांचा अर्धपुतळादेखील बसविण्यात आला आहे. हे स्मारक कर्वे रस्त्यावर, विमलाबाई गरवारे शाळेच्या समोर आहे. या स्मारकाच्या शेजारी स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र आहे. हे एक स्मारक सभागृह असून यामध्ये दृक-श्राव्य सुविधा, काही शिल्पपट्ट आणि काही चित्रे आहेत. या सभागृहाचे उद्घाटन १९ डिसेंबर २०१६ रोजी त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.