लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपविरोधकांची बंगळूरूत दोन दिवस बैठक पार पडली. यात विरोधकांनी निवडणुकीची रणनीतीवर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व विरोधकांच्या आघाडीला इंडिया हे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला.यापुढे भाजपविरोधात इंडिया याच नावाखाली देशभर लढणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. मात्र एखाद्या आघाडीचे ‘इंडिया I.N.D.I.A.’ असे नाव कसे असू शकते, असा प्रश्न उपस्थित करून बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी या नावास विरोध दर्शवल्याची माहिती आहे.
भाजपविरोधकांच्या आघाडीत नव्याने तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टीसह इतर काही पक्ष सहभागी झालेले आहेत. त्यामुळे या आघाडीचे ‘यूपीए’ असलेले नाव बदल्याचे संकेतच बैठकीच्या सुरुवातीलाच देण्यात आले होते. त्यानुसार दुसऱ्या दिवशी बैठकीत ‘इंडिया’ अर्थात ‘इंडियन नॅशनल डीव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलाएन्स’ या नावावर सर्वपक्षीय नेत्यांनी शिक्कामोर्तब केला.
नावाबाबत सुरू असलेल्या चर्चेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधी आघाडीचे नाव ‘इंडिया’ कसे असू शकते, असा सवाल केला. तसेच त्यांनी या नावातील ‘एन, डी, आणि ए’ वरून असलेल्या अक्षराबाबतही आक्षेप घेतला होता. यावेळी त्यांच्या ‘एन.डी.ए.’ मध्ये ‘आय’ असल्याचे कुणीतरी निदर्शनास आणून दिले. यावेळी डी च्या संक्षिप्त रुपाबाबतची चर्चा करण्यात आली. ‘डी’ ला ‘डेमॉक्रेटिक’ (लोकशाही) आणि ‘डिव्हलपमेंट’ (विकासात्मक) असे शब्द सूचवण्यात आले होते. त्यातील ‘डिव्हलपमेंट’ हा शब्द स्वीकारण्यात आला.
अशीही नावे सूचवली होती
या आघाडीला नितीश कुमार यांनी ‘इंडिया मेन फ्रंट’ आणि ‘इंडिया मेन अलायन्स’ अशी नावे सुचवली होती. तर डाव्या पक्षांच्या नेत्यांनी ‘सेव्ह इंडिया अलायन्स’ आणि ‘वुई फॉर इंडिया’ असे पर्याय सूचवले होते. मात्र बहुतेक पक्षांनी ‘इंडिया’ या नावाला मान्यता दिली. त्यामुळे नितीश कुमार यांच्यासह इतरांनीही त्याला होकार दिला. या बैठकीत भाजपविरोधक २६ पक्षांचे नेते उपस्थित होते. इंडियातील समन्वयासाठी ११ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. प्रचाराच्या व्यवस्थापनासाठी दिल्लीत इंडियाचे कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे.