ताज्या बातम्यामहत्वाचे

भारताच्या मानवयुक्त समुद्रयान मोहिमेची चाचणी मार्चपर्यंत


भारताच्या महत्त्वाकांक्षी समुद्रयान मोहिमेची पहिली चाचणी पुढील वर्षी होणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन तज्ज्ञांसह पाचशे मीटरवर आणि त्यानंतरच्या दुसर्‍या टप्प्यात 6 हजार मीटर खोलवर पाणबुडी पाठविण्यात येणार आहे.

‘मत्स्य 6000’ ही अत्याधुनिक तंत्रज्ञानासह खनिजांचा शोध घेणारी मानवयुक्त पाणबुडी आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास अमेरिका, चीन, रशिया, जपान आणि फ्रान्स या विकसित देशांच्या पंक्तीत भारताला स्थान मिळणार आहे. निकेल, मॅग्नीज, कोबाल्टसह अन्य दुर्मीळ खनिजसाठ्यांचा या मोहिमेद्वारे शोध घेण्यात येणार आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीचे (एनआयओटी) संचालक डॉ. जी. ए. रामदास यांनी ही माहिती दिली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, समुद्रायन मोहीम दोन टप्प्यांत पार पाडली जाणार आहे. पहिल्या टप्प्याची चाचणी 2024 च्या मार्चपर्यंत घेण्यात येईल. या टप्प्यात 500 मीटर अंतरापर्यंत खोल पाणबुडी पाठविली जाईल. त्यानंतर 2025 मध्ये दुसर्‍या टप्प्याची चाचणी घेण्यात येईल. 2026 पर्यंत समुद्रयानाची मोहीम पार पाडली जाईल. 6000 मीटर खोलवर जाणार्‍या मत्स्य या पाणबुडीचे प्रमाणिकरण नॉर्वेतील समुद्रयान करणार्‍या एजन्सीकडून करण्यात येणार आहे. नॉर्वेत 10,000 मीटरपर्यंत खोलवर पाणबुड्या पाठवून दुर्मीळ खनिजांचा अभ्यास केला जातो. जूनमध्ये टायटन पाणबुडी दुर्घटनाग्रस्त होऊन 5 अब्जाधीशांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे आम्ही आमच्या पाणबुडीच्या तांत्रिक बाबींची नव्याने पाहणी केली. सुरक्षेच्या द़ृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेतली आहे, असेही रामदास यांनी सांगितले.

टायटन पाणबुडीसारखी दुर्घटना होऊ नये, याद़ृष्टीने आम्ही या पाणबुडीचा नव्याने तांत्रिक आढावा घेतला. नॉर्वेतील एजन्सींकडून सुरक्षेविषयीचा अहवाल घेतला आहे. त्यामुळे या मोहिमेत मानवाच्या जीवितास धोका उत्पन्न होणार नाही.
-जी. ए. रामदास, संचालक, एन.आय.ओ.टी.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *