ताज्या बातम्या

स्वामी दयानंद सरस्वती माहिती

स्वामी दयानंद सरस्वती हे एका युगपुरूषाचे नाव आहे. एकोणीसाव्या शतकातली ती एक महान व्यक्ती नव्हे, शक्ती होती. ते एक महान धर्मसुधारक व समाजसुधारक होते. अंधारात सापडलेल्या व दिशा हरवून बसलेल्या समाजाला व देशाला आधार असतो तो केवळ समोरच्या क्षीतिजावर चमकणाऱ्या ध्रुवताऱ्याचा. स्वामी दयानंद सरस्वतींनी स्वातंत्र्य, स्वत्व आणि स्वाभिमान हरवून बसलेल्या भारतीयांना आत्मभान दिले. काहरात्रीत सापडलेल्या लोकांसमोर त्यांनी उष:काल उभा केला.

महर्षी दयानंदांचा जन्म गुजरातमधील टंकारा या गावी १८२४ मध्ये झाला होता. त्यांचे मूळ नाव मूळशंकर होते. त्यांचे आई-वडील औदिच्य ब्राह्मण होते. समाजात त्यांना सन्मानाचे स्थान होते. घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. घराण्यात ज्ञानाची परंपरा होती. मूळशंकर हा कुशाग्र बुद्धीचा संवेदनशील मुलगा होता. वयाच्या चौदाव्या वर्षी यजुर्वेद त्यांना पूर्ण कंठस्थ होता. तीन प्रसंग असे घडले की त्यामुळे त्यांचे मन अस्वस्थ झाले. पहिला प्रसंग शिवरात्रीच्या दिवशी घडला. शिवमंदिरात व्रत, उपवास करत असता रात्रीच्या सामसूम झालेल्या क्षणी शिवपिंडीवर उंदीर चढला. त्याचा कुठलाच प्रतिकार पिंडीकडून होत नव्हता. वडिलांकडून भगवान शिवाबद्दल बरेच ऐकले होते, तसे होताना दिसले नाही. दुसरे, बहिणीचा मृत्यू व तिसरा प्रसंग चुत्याचा मृत्यू. या प्रसंगांनी खूप दु:ख झाले. मलाही असेच मरण येईल. मृत्यू काय आहे तेही जाणणे आवश्यक वाटून मूलशंकरनी एकेदिवशी गृहत्याग केला व तो पुन्हा कधी घरी परतला नाही. लग्नाच्या बेडीतही अडकला नाही.सत्य ज्ञानासाठी मूळशंकरने घरदार सोडले. त्यावेळी मूळशंकरचे वय २१ वर्षे होते. मूळशंकरांनी खूप भटकंती केली.गुरूचा शोध घेतला. हिमालयातदेखील तो गेला. पूर्णानंद सरस्वती या महाराष्ट्रीय सन्याशाकडून त्याने संन्यास दीक्षा घेतली. दयानंद सरस्वती हे नाव धारण केले. सन्यास म्हणजे पुनर्जन्म! सन्यास म्हणजे सर्वस्वाचा त्याग! सन्यास घेतल्यानंतरही योग्याचा शोध हा तरूण घेतच राहिला. नर्मदा ओलांडून हा तरूण सन्यासी उत्तर भारतात गेला. सबंध आर्यावर्त त्याने पायाखाली तुडवला. हरिद्वार, ऋषिकेश अशा ठिकाणच्या साधू-संतांना तो भेटला. चर्चा केली, पण समाधान होत नव्हते. आणि शेवटी समाधान झाले ते मथुरेतील वितराग सन्याशी स्वामी विरजानंदाकडे. ते योग्य असे गुरू भेटले. ते अत्यंत तपस्वी होते. व्याकरणसूर्य होते. ते अंध होते, पण अज्ञानाच्या अंधारात बुडालेल्या जगाला ज्ञानाचा प्रकाश दाखवीत होते. स्वामी दयानंद १८६०मध्ये हे ज्ञान घेत होते. अडीच वर्षांनी स्वामी दयानंद सरस्वतींनी आपल्या गुरूचा निरोप घेतला. स्वामी विरजानंदांची सेवा त्यांनी श्रद्धेने केली. गुरुदक्षिणा देण्याचा प्रसंग आला. स्वामी दयानंदांनी लवंगा भेट दिल्या, पण स्वामी विरजानंदांना दानाच्या रुपात वेगळेच काही हवे होते. गुरू विरजानंदांनी आदेश दिला, ‘लोकांना सत्य ज्ञानाचा प्रकाश द्या व देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करा.’ या आदेशाचे पालन करण्याचा त्यांनी संकल्प केला.

पाखंडाविरुद्ध त्यांनी शंखनाद केला. कुप्रथांचा विरोध केला. अनेक ठिकाणी शास्त्रार्थ केले. अनिष्ट प्रथा-परंपरेचे जाळे देशभर पसरले होते. प्रत्येक पावलावर कर्मकांड. त्यात सबंध हिंदू समाज अडकला होता. त्यांची विचारशक्तीच क्षीण झाली होती. बहुजनांना शिक्षणाची दारे बंद होती. जातीप्रथेने समाजाला विळखा घातला होता. हजारो जाती, पोटजातींमध्ये देश विभागला होता. त्याचे प्रचंड प्रमाणात विघटन झाले होते. जातीव्यवस्था जन्माधिष्ठित झाली होती. अस्पृष्यतेला अमानुष स्वरूप प्राप्त झाले होते. बालविवाह सर्रास होत होते. विधवा-विवाहाला बंदी होती. जरठ विवाह मोठ्या प्रमाणात होत होते. सतीप्रथा बंद पडली नव्हती. लोक नशीबावर हवाला ठेवून जगत होते. पूर्वजन्मीच्या पापामुळेच हे सर्व भोग आहेत असा समज समाजात पसरला होता. स्वामी दयानंदांच्यासमोर असा हा दुबळा भारत उभा होता. प्राणच नव्हता त्याच्या अंगात. राजेराजवाडे इंग्रजांचे गुलाम होते. ऐषआरामात स्वाभिमानशून्य जीवन ते जगतहोते. आपल्या प्रजेविषयी त्यांच्या मनात कसलीच आच नव्हती. हे चित्र बदलायचे कसे आणि कोणी या प्रश्नाने स्वामी दयानंद सरस्वतींना अस्वस्थ केले होते. स्वामीजी एकटेच होते, पण पूर्ण आत्मविश्वासाने भरलेले होते. पुरुषार्थाने या परिस्थितीवर त्यांनी मात दिली‘वेदाकडे चला’ हा स्वामी दयानंदांचा संदेश होता. तो संदेश लोकांपर्यंत नेण्याचे काम आर्यसमाजाने केले. आर्य समाजाची वेदभक्ती ही जणू राष्ट्रभक्ती होती. राष्ट्रभक्तीचे प्रकटीकरण म्हणजे राष्ट्रवाद. स्वामी दयानंद सरस्वती हे भारतीय राष्ट्रवादाचे उद‌्गाते होते. त्यांना राष्ट्रवादाच्या प्रेरणा वेदातून प्राप्त झाल्या होत्या. स्वराज्याची संकल्पना मांडणारे पहिले भारतीय म्हणून स्वामीजींचा उल्लेख करावा लागेल. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना १८८५मध्ये झाली. आर्य समाजाची स्थापना झाल्यानंतर दहा वर्षांनी राष्ट्रीय काँग्रेसने स्वराज्याचा विचार केला. मला स्वराज्य शब्दाचा बोध दयानंदाच्या ग्रंथातून झाला, असे दादाभाई नौरोजींनी म्हटले होते. दादाभाई नौरोजी हे भारतीय राष्ट्रवादाचे जनक मानले जातात.
आर्यसमाजाचे दहा नियम आहेत. ते महर्षी दयानंदांनी अनेकांशी चर्चा करून तयार केले. त्यातील नियम सहा असा आहे, संसाराचा उपकार करणे या समाजाचा मुख्य उद्देश आहे. अर्थात, शारीरिक, आत्मिक आणि सामाजिक उन्नती करणे. महान उद्देश मनात ठेऊन त्यांनी एक एक नियम तयार केले. त्यांना १७ वेळेस विषपान देण्यात आले. शेवटी या महान समाजसुधारकाचे, एका सच्च्या राष्ट्रभक्ताचे, एका क्रांतिकारकाचे महानिर्वाण १८८३मध्ये अजमेर येथे झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button