ताज्या बातम्या

लोणावळा थंड हवेचे ठिकाण माहिती


लोणावळा  हे महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सर्वात आवडीचे ठिकाण आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून विश्रांतीसाठी लोणावळा हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. सह्याद्रीच्या अप्रतिम सौंदर्याची अनुभूती येथे आल्याशिवाय होणार नाही. त्यामुळेच या थंड हवेच्या ठिकाणाला सह्याद्रीचे रत्न असेही म्हटले जाते.

तुम्हालाही निसर्गाच्या सानिध्यात यायचे असेल तर लोणावळा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. लोणावळा आणि लागुनच असलेला खंडाळा या भोवतीचा निसर्गरम्य परिसर, किल्ले, धरणे, तलाव, खोल दऱ्या, उंच टेकड्या हे हौशी पर्यटकांना याठिकाणी आकर्षित करतात. येथून जवळच असलेल्या खंडाळा देखील पर्यटकांचे आवडीचे पर्यटन स्थळ आहे. मित्रांनो आजच्या या लेखात आपण महाराष्ट्रातील लोणावळा या थंड हवेच्या ठिकाणाबाबत माहिती जाणून घेऊ या.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर असलेले लोणावळा समुद्रसपाटीपासून सुमारे 630 मीटर उंच आहे. पुणे जिल्ह्यात असलेले हे थंड हवेचे ठिकाण पुण्यापासून सुमारे 64 किमी तर मुंबई पासून 96 किमी आहे.

लोणावळ्यातील पर्यटन स्थळे

1.टायगर लीप / टायगर पॉइंट :

टायगर लीप हे लोणावळ्यातील सर्वात जास्त भेट दिल्या जाणारे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी सरळ अशी सुमारे 650 मीटर खोल दरी आहे. स्थानिक लोक टायगर लीपला वाघदरी असे म्हणतात. या ठिकाणी असलेल्या दरीचा आकार झेपावणाऱ्या वाघासारखा असल्याने वाघदरी हे नाव पडले. हा पॉइंट उंच ठिकाणी असल्याने येथून दिसणारा निसर्गरम्य परिसर खूप सुंदर दिसतो. सूर्योदय आणि सूर्यास्त येथून बघण्यासारखे आहे.

2. राजमाची पॉइंट :

लोणावळ्यापासून जवळपास 6.5 कि.मी. लांब राजमाची पॉइंट आहे. या ठिकाणाहून आजूबाजूचा अप्रतिम परिसर पाहून मन प्रसन्न होते. राजमाची किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 2710 फुट उंचीवर वसलेला आहे. या किल्ल्यावर प्राचीन गुफा आणि मंदिरे पण आहेत.

 

3. लोहगड किल्ला :

येथून जवळच छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसिद्ध लोहगड किल्ला आहे. मळवली रेल्वे स्टेशनपासून सुमारे 11 कि.मी. चढाईच्या रस्त्याने हा किल्ला येतो. लोहगडपासून जवळच विसापुरचा किल्ला आहे. जवळच असलेला तिकोणा हा देखील किल्ला बघता येईल.

4. कार्ला लेणी आणि भाजा लेणी :

मळवली या ठिकाणी जगप्रसिद्ध कार्ला लेणी आहे. कार्ला लेणीपासून भाजा 8 कि.मी.अंतरावर आहे. या लेण्यांची निर्मिती इ.स. पूर्व दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकात झाली आहे. या दोन्ही लेण्यांमध्ये असलेले स्तूप,चैत्य बघण्यासारखे आहेत. याच ठिकाणी असलेले एकविरा मातेचे प्रसिद्ध मंदिर आहे.

5. भुशी डॅम / भुशी धरण :

भारतातील नौदलाचे तांत्रिक प्रशिक्षण देणारे सर्वोत्कृष्ट केंद्र असलेले आयएनएस शिवाजी आणि लोणावळा यांच्यामध्ये भुशी धरण आहे. इंद्रायणी नदीच्या तीरावर बांधण्यात आलेला हे धरण डोंगराळ प्रदेशाने वेढलेले आहे.येथील धबधबा बघण्याकरिता पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. सभोवती असलेल्या टेकड्यांवरून पडणारे पाणी, आजूबाजूची हिरवळ चित्तवेधक आहे. याच ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे रेल्वे टर्मिनस उभारले जाणार आहे.

6. ड्युक नोज  :

ड्युक नोज हे लोणावळ्यातील भेट देण्यासाठी एक सर्वोत्तम पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणाहून श्वास रोखून धरायला लावणारे खंडाळा घाटाचे विहंगम दृश्य दिसते. स्थानिक लोक या ड्युक नोजला नागफणी असे म्हणतात. ड्युक नोज हे नाव  याच्या नावावरून पडले आहे.

या ठिकाणी असलेल्या शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची नेहमीच वर्दळ असते. त्याचप्रमाणे निसर्गप्रेमी, हौशी गिर्यारोहक हे देखील खूप मोठ्या प्रमाणात येथे येतात. निसर्गरम्य परिसर, निरव शांतता , सरळ खोल अशा दऱ्या पर्यटकांना येथे खेचतात.

7. सुनिल सेलिब्रेटी वँक्स म्युझियम लोणावळा (Sunil’s Celebrity Wax Museum) :

सुनिल सेलिब्रेटी वँक्स म्युझियम( Sunil’s Celebrity Wax Museum) हे लोणावळ्यात येण्याऱ्या पर्यटकांचे खास आकर्षण आहे. हे सेलिब्रेटी वँक्स म्युझियम सुनील कंडलूर यांनी सुरु केले. या सेलिब्रेटी वँक्स म्युझियममध्ये विविध क्षेत्रातील महान व्यक्तींची मेणाची शिल्पे बनविलेली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज, साई बाबा , स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, चार्ली चाप्लिन, कपिल देव अशा महापुरुषांची मेणाची शिल्पे या ठिकाणी आहेत.

8. कुणे धबधबा :

लोणावळ्याला येणाऱ्या हौशी पर्यटकांचे कुणे धबधबा हे आकर्षणाचे स्थळ आहे. सह्याद्रीच्या पर्वतावर सुमारे 622 मी. हा धबधबा आहे. येथे पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. साहसी पर्यटक या ठिकाणी रॅपलिंग  आणि झीपलायनिंगचा आनंद घेवू शकतात.

9. रायवूड पार्क :

रायवूड पार्क हे लोणावळ्यातील सिद्धार्थ नगरमध्ये आहे. लहान मुलांसाठी उद्यान, लॉन, सुंदर बगीचा हे येथील आकर्षण आहे. सुमारे 25 एकरात रायवूड पार्क पसरला आहे. या ठिकाणी जुन्या प्रजातीची वृक्ष आहेत.

10. कॅनियन व्हॅली:

कॅनियन व्हॅली हे लोणावळ्यातील  आणखी एक आकर्षणाचे पर्यटन स्थळ आहे. कॅनियन व्हॅली  हे उल्हास नदीच्या तिरी  वसलेले आहे. हौशी गिर्यारोहक या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने येत असतात.

लोणावळ्यात आल्यावर आपण आपला मानसिक थकवा नक्की दूर करू शकतो. लोणावळ्यात गेल्यावर तेथील प्रसिद्ध चिक्की आणि इतर गोड पदार्थ याचा नक्कीच आस्वाद घ्यायला पाहिजे. याशिवाय या ठिकाणी लाकडी खेळणी, बांबूच्या टोपल्या आणि इतर हस्तकलेच्या वस्तू विकत मिळतात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *