ताज्या बातम्या

पन्हाळा किल्ला माहिती

पन्हाळा किल्ला  म्हटले की आपल्या नजरेसमोर येतात बाजीप्रभु देशपांडे आणि त्यांचा पावनखिंडीतील पराक्रम, शिवा काशिद आणि त्यांचे धैर्य.सिद्दी जोहरचा पन्हाळ्याला अभेद्य वेढा आणि त्यातून शिवरायांनी केलेली सुटका या रोमांचक ऐतिहासिक घटनांचा पन्हाळा किल्ला साक्षीदार आहे.

पन्हाळा किल्ला आणखी एका बाबतीत महत्वपूर्ण ठरतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर याच किल्ल्यावरून छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याचा कारभार आपल्या हाती घेतला.

पन्हाळ्याचा इतिहास :

असे म्हटले जाते की पन्हाळा किल्ला  हा प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह यांच्या कारकिर्दीत बांधला गेला. हा किल्ला नाग वंशीय लोकांकडेही होता असे म्हटले जाते. पुरातनकाळात या किल्ल्याला ब्रम्हागिरी म्हटले जात असे. शिवकालीन संस्कृत ग्रंथात पन्हाळा किल्ल्यास  पर्णालदुर्ग असा उल्लेख आहे. तर मुघल या किल्ल्याला शहानबी दुर्ग म्हणत असत. कोल्हापुरच्या छत्रपतीनी आपल्या संस्थानाचा कारभार काही काळ पन्हाळा किल्ल्यावरूनच पहिला.

पन्हाळा किल्ल्यावरील प्रेक्षणीय ठिकाणे :

राजवाडा :

पन्हाळा किल्ल्यावरील राजवाडा हा महाराणी ताराबाई यांचा वाडा आहे. महाराणी ताराबाई यांनी हा वाडा १७०८ मध्ये बांधला. हा वाडा बघण्यासारखा आहे. ह्या वाड्यातील देवघर आपले चित्त आकर्षित करून घेते. सध्या या राजवाड्यात नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कुल आणि मिलिटरी बॉइज हॉस्टेल आहे.

अंबरखाना :

पुर्वीचा बालेकिल्लाच हाच अंबरखाना होय. या अंबर खान्याभोवती खंदक आहे.त्याठिकाणी गंगा,यमुना,आणि सरस्वती अशी तीन धान्याची कोठारे आहेत. त्यात सुमारे २५ हजार  खंडीधान्य मावत असे. त्याठिकाणी धान्याच्या कोठाराशिवाय दारुगोळ्याची कोठारे, सरकारी कचेऱ्या आणि एक टाकसाळ होती.

सज्जाकोठी :

सज्जाकोठी याच ठिकाणाहुन युवराज संभाजी राजे या प्रांताचा कारभार बघत होते. येथेच छत्रपती शिवाजी महाराज आपल्या निवडक लोकांसोबत  गुप्त मसलती करीत असत. सज्जाकोठी ही राजवाड्याहुन पुढे गेल्यावर आपल्या दृष्टित पड़ते.

राजदिंडी :

राजदिंडी ही पन्हाळा किल्ल्यावरील एक दुर्गम वाट आहे जी गडाच्या खाली उतरते. नेमक्या याच वाटेद्वारे छत्रपती शिवाजी महाराज  सिद्दी जौहरचा वेढ्यातून निसटुन विशालगडाकडे गेले होते.

चार दरवाजा :

चार दरवाजा हा पूर्वदिशेकडील अत्यंत मोक्याचा आणि लष्करीदृष्टया महत्वाचा आहे. या दरवाज्याजवळच  शिवा काशीद यांचा पूतळा आहे. चार दरवाजा १८४४ इंग्रजांनी पाडून टाकला. आज तेथे काही भग्नावशेष दिसतात.

सोमाळे तलाव :

किल्ल्याच्या पेठेजवळ एक मोठा तलाव आहे. हाच सोमाळे तलाव होय. या तलावाच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. असे म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांनी सोमेश्वराला लक्ष चाफ्याची फुले वाहिली होती.

रामचंद्रपंत अमात्य आणि त्यांच्या पत्नीची समाधी :

सोमाळे तलावाच्या थोडे समोर गेल्यावर रामचंद्रपंत अमात्य आणि त्यांच्या पत्नीची समाधी आहे.

रेडे महाल :

रामचंद्रपंत अमात्य  यांच्या समाधीच्या बाजूला एक आडवी इमारत आहे, त्या इमारतीस रेडे महाल म्हणतात. वास्तविक ही जागा पागा म्हणून वापरात होती. नंतर तेथे जनावरे बांधत म्हणून त्या इमारतीचे नाव रेडे महाल पडले.

संभाजी मंदिर :

संभाजी मंदिर म्हणजे एक छोटी गढ़ी आहे. छत्रपती राजाराम यांचा पुत्र संभाजी  यांचे हे मंदिर आहे. मंदिराच्या आवारात एक विहीर आणि पागा आहे.

धर्मकोठी :

संभाजी मंदिराच्या समोर गेल्यावर जी इमारत आहे ती धर्मकोठी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी धान्य आणून दानधर्म केल्या जात होता.

महालक्ष्मी मंदिर :

नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजुस महालक्ष्मी मंदिर आहे.हे एक प्राचीन मंदिर आहे. साधारणत: १००० वर्षापुर्वी हे मंदिर बांधले असावे. असे म्हणतात की, राजा गंडारित्य भोज यांचे हे कुलदैवत आहे.

तीन दरवाजा :

हा दरवाजा पश्चिम दिशेला आहे. या दरवाज्यावर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे. १६७६ साली कोंडाजी फर्जद (kondaji Farjad) यांनी याच दरवाज्यातून प्रवेश करुन अवघ्या ६० मावळ्यांनिशी हा किल्ला जिंकला होता.

बाजीप्रभु देशपांडे यांचा पुतळा :

बस स्टॉप वरून थोड़े खाली आल्यावर चौकात बाजीप्रभु देशपांडे यांचा पूतळा आहे.

याशिवाय गडावर कलावंतिणीचा महाल, साधोबा दर्गा आणि प्रसिद्ध चवदार पाण्याची अंदरबांव किंवा कापुरबांव विहीर इ. ठिकाणे बघण्यासारखी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button