ताज्या बातम्या

सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती


सिंधुदुर्ग जिल्हा म्हटलं कि डोळ्यासमोर उभं राहत निसर्ग सौंदर्य. हिरवागार निसर्ग, अथांग समुद्र आणि आंबोली घाट हे सिंधुदुर्गचे मुख्य आकर्षण. केवळ नैसर्गिक सौंदर्यच नाही तर फार मोठा ऐतिहासिक वारसा देखील या जिल्ह्याला लाभलेला आहे.

असाच एक ऐतिहासिक वारशाचा नमुना म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या भुईकोट, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग यांपैकी जलदुर्ग प्रकारातील किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग. मालवण येथील एका खडकाळ बेटावर सुमारे ४८ एकर क्षेत्रफळात पसरलेला हा किल्ला. किल्ल्याची तटबंदी अशाप्रकारची आहे कि शत्रू असो किंवा खवळलेला समुद्र, कुणीही तिला भेदू शकत नाही.

सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास –

स्वराज्यामध्ये पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि इतर परकीय सत्तांची नजर होती. हे परकीय लोक विशेषतः समुद्रमार्गाने हल्ला करत होते. मग स्वराज्याला आणि येथील रयतेला सुरक्षित ठेवायचे म्हणजे सर्वप्रथम समुद्रकिनारे सुरक्षित करावे असा महाराजांचा हेतू असावा. आणि मग सुरुवात झाली सिंधुदुर्गच्या निर्माणकार्याची.

कुणी समुद्रात एखादी वास्तू निर्माण करायची म्हटले तर ते शक्य आहे का? परंतु हा इतिहास छत्रपतींनी घडविलेला आहे. समुद्रात किल्ला बांधणे ही संकल्पना नवीन होती. या निर्माणकार्यासाठी अरबी समुद्रातील एक खडकाळ बेट निवडण्यात आले. यानंतर हजारो मजूर, शेकडो स्थापत्यकलातज्ञ यांनी सुमारे तीन वर्षे सतत मेहनत करून उभा केला सिंधुदुर्ग.

या किल्ल्याने अनेक मोहीमा आणि अनेक युद्ध बघितले आहेत. परंतु त्याने कधीही मराठयांची साथ सोडली नाही. सरतेशेवटी १७६५ साली ब्रिटिशांनी हा किल्ला काबीज केला. आजही सिंधुदुर्ग किल्ला हा समुद्रामध्ये मोठ्या डौलाने आणि ताठ मानेने उभा आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे –

सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल म्हटले तर सर्वात पाहण्याजोगे आहे किल्ल्याचे बांधकाम. किल्ल्याचा भक्कम पाय उभारण्यासाठी ‘शिसे’ या धातूचा उपयोग करण्यात आला. गडाच्या भिंती जवळजवळ ३०-३५ फूट उंच आणि सुमारे १२-१५ फूट जाड आहेत. एकूण ४८ एकरात या किल्ल्याची निर्मिती झालेली आहे.

यांशिवाय किल्ल्याचे प्रचंड मोठे प्रवेशद्वार, किल्ल्यावरील अनेक बुरुज हे देखील आकर्षक आहेत. किल्ल्यावरील देखरेखेकरिता असलेले दोन उंच मनोरे आहेत. किल्ल्याच्या आत गोड पाण्याच्या विहिरी आणि घरे आहेत. तसेच समुद्रातील पाणी आतमध्ये साचणार नाही याकरिता योग्य योजना केलेली दिसते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *