ताज्या बातम्या

कर्नाटकचे मुख्यमंत्री आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर; भाजपविरोधी आघाडीला बळ


मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करून काँग्रेस पक्षाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उद्या रविवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.

त्यांच्या उपस्थितीत सांगली येथे कार्यकर्ता मेळावा होणार असून त्याला महानिर्धार २०२४ असे नाव देण्यात आले आहे. त्यानंतर बारामती येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बरोबर सिद्धरामय्या उपस्थित राहणार आहेत.

सिद्धरामय्या यांचा महाराष्ट्राचा दौरा म्हणजे राज्यातील काँग्रेसला आणि भाजपविरोधी आघाडीलाही राजकीय बळ देण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जाते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने सांगली येथे दुपारी १२ वाजता महानिर्धार २०२४ शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात सिद्धरामय्या यांचे प्रमुख भाषण होणार आहे. कर्नाटकमधील विजयाबद्दल प्रदेश काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या वेळी राज्याचे प्रभारी व कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत. सांगलीतील कार्यक्रम संपवून सिद्धरामय्या बारामतीला रवाना होणार आहेत. बारामती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला शरद पवार यांच्याबरोबर सिद्धरामय्या उपस्थित राहणार आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *